अभय कुलकर्णी, मस्कत
मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीत हवाई वाहतूक ठप्प झालेल्या काळात ओमानने मस्कत विमानतळ सुरक्षित केंद्र म्हणून खुले करून हजारो आंतरराष्ट्रीय प्रवाशांना दिलासा दिला.
इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे सध्या मध्य पूर्वेतील संपूर्ण हवाई वाहतूक कोलमडली आहे. युद्धजन्य परिस्थिती, ड्रोन हल्ल्यांचे सावट आणि क्षेपणास्त्रांचा धोका यामुळे अनेक देशांनी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. अशा अत्यंत कठीण आणि असुरक्षित वातावरणात ओमानने घेतलेली भूमिका जगासाठी एक मोठा दिलासा ठरली आहे. हजारो आंतरराष्ट्रीय प्रवासी विविध देशांच्या विमानतळांवर अडकून पडलेले असताना ओमानने मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सुरक्षित केंद्र म्हणून खुले केले आणि अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली.
युद्ध सुरू झाल्याच्या पहिल्या आठवड्यात मध्य पूर्वेतून सुमारे 36 हजार उड्डाणे नियोजित होती. यातील 20 हजारपेक्षा जास्त उड्डाणे रद्द करावी लागली. यामुळे प्रवाशांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या परिस्थितीत ओमान सरकारने तत्परतेने पावले उचलली. ओमान एअर आणि इतर आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक भागीदारांशी समन्वय साधून त्यांनी विशेष चार्टर सेवा सुरू केल्या. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत ओमानमार्गे 250 विशेष उड्डाणे चालवली. याचा फायदा जगभरातील 12 हजार प्रवाशांना झाला. भारतीय प्रवाशांसाठी ही मदत अत्यंत मोलाची ठरली आहे. मध्य पूर्वेतील विविध देशांत अडकलेल्या हजारो भारतीयांना मायदेशी परतण्यासाठी ओमान सरकारने स्थानिक कंपन्यांच्या सहकार्याने विशेष चार्टर उड्डाणे उपलब्ध करून दिली. यामुळे युद्धग्रस्त भागातून भारतीय नागरिक सुरक्षितपणे आपल्या घरी पोहोचू शकले. केवळ भारतच नव्हे, तर ब्रिटन सरकारनेही आपल्या नागरिकांसाठी, विशेषतः कुटुंबातील लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मस्कतमधून विशेष चार्टर सेवा सुरू केली. यूएई, सौदी अरेबिया आणि बहरीन येथील प्रवाशांनाही युरोप आणि आशिया खंडात पोहोचण्यासाठी ओमान हा एकमेव सुरक्षित मार्ग ठरला.
आज मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ एक ट्रान्झिट पॉईंट राहिले नसून ते युद्धात अडकलेल्या लोकांसाठी आशेचे एक मोठे प्रतीक बनले आहे. प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्याच्या या मोहिमेमुळे ओमानची जागतिक स्तरावर एक ‘सुरक्षित आणि मदतीचा देश’ म्हणून ओळख अधिक दृढ झाली आहे. ओमानने बजावलेली ही भूमिका एका जागतिक शांततादूताची आहे. ज्या काळात इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे हवाई क्षेत्रातील अनिश्चितता वाढली होती, तेव्हा ओमानने आपल्या आधुनिक पायाभूत सुविधांचा वापर करून प्रवाशांना आधार दिला. मस्कत विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांसाठी निवास, भोजन आणि वैद्यकीय मदतीची चोख व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे युद्धजन्य भीतीमध्ये असलेल्या हजारो पर्यटकांना आणि कर्मचार्यांना मानसिक दिलासा मिळाला. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी ओमान सरकारने दाखवलेली संवेदनशीलता ही आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणली जात आहे. भारतासारख्या मित्रदेशासाठी तर ओमानचा हा पुढाकार अत्यंत महत्त्वाचा ठरला. कारण खाडी देशांमध्ये राहणार्या लाखो भारतीयांच्या सुरक्षित परतीचा हा एकमेव मार्ग उरला होता.
भविष्यात हा संघर्ष अधिक तीव्र झाल्यास मध्य पूर्वेतील हवाई वाहतुकीचे केंद्र म्हणून मस्कतचा वापर वाढण्याची दाट शक्यता आहे. ओमानच्या या सक्रियतेमुळे आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांचा मस्कत विमानतळावरील विश्वास वाढला असून, अनेक देशांनी आता आपली पर्यायी उड्डाणे ओमानमार्गे वळवण्याचे नियोजन सुरू केले आहे. युद्धकाळात एखाद्या देशाने आपली संसाधने अशा प्रकारे मानवी कल्याणासाठी खुली करणे, हे जागतिक कूटनीतीमधील एक उत्तम उदाहरण ठरले आहे. ओमानच्या या धोरणी पावलामुळे केवळ प्रवासीच सुरक्षित घरी पोहोचले नाहीत, तर जागतिक विमान वाहतूक साखळी पूर्णपणे कोलमडण्यापासून वाचली आहे. आगामी काळात ओमानचे हे सुरक्षित हवाई क्षेत्र आणि मस्कत विमानतळ मध्य पूर्वेतील संकटात आशेचा सर्वात मोठा किरण म्हणून ओळखले जाईल.