File Photo
संपादकीय

ध्येयसिद्धीची आसक्ती!

पुढारी वृत्तसेवा
देविदास लांजेवार

कोलंबसला काय हवे आहे, यात स्पेनची राणी इसाबेलास स्वारस्य नव्हते. किंबहुना, पृथ्वी गोल आहे की सपाट याबद्दलही तिला उत्सुकता नव्हतीच. कोलंबस नवनवीन प्रदेश किंवा भूभागांचा शोध लावेल की नाही, याबद्दल तिला काळजी नव्हती. तिला फक्त संपत्ती, समृृद्धी आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसार हवा होता. तिला आशियाच्या व्यापारातून प्रचंड नफा मिळवून समृद्धीचा महामार्ग तयार करायचा होता. त्यासाठीच इसाबेलाने राजा फर्डिनांड यांची संमती मिळवली होती.

पोर्तुगीज शेजारी आफ्रिकेतील सोन्याच्या व्यापारातून बक्कळ नफा कमावत असून राणी इसाबेला हिला असाच व्यापार करायचा आहे, हे चाणाक्ष कोलंबसने अचूकपणे हेरले होते. राणीचे ध्येय कोणते, तिला कोणते इप्सित साधायचे आहे, हे कोलंबसने ओळखले होते. हेतू किंवा उद्देश न सांगता जगप्रसिद्ध ‘भारत शोध’मोहिमेस तिची परवानगी मिळवली होती. राणीनेही त्याच्या जगप्रसिद्ध मोहिमेस अर्थपुरवठा केला आणि तो एक ऐतिहासिक व्यक्ती बनला. तात्पर्य, तुम्हास ज्या क्षेत्रात यश मिळवायचे आहे, त्या क्षेत्रास पूरक ठरणार्‍या व्यक्ती, संस्थांचा तुम्हास मदत करण्यामागचा हेतू लक्षात घेऊनच स्वत:चे उद्दिष्ट गाठावयास हवे. केवळ स्वतःच्या फायद्याच्याच गोष्टी सांगून यशस्वी व्हायचे असेल तर ते शक्य नसते. जर तुम्ही दुसर्‍यांच्या गरजांचा विचार केला तर ते आपणहून तुम्हास जास्त प्रतिसाद देतात.

प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. मॉस्लो यांच्या मते मानवी गरजा खालीलप्रमाणे असतात...

मनुष्यास जीवन प्रिय आहे, त्यामुळे त्यास सामर्थ्य बांधणी आणि आरोग्यासाठी अन्नाची गरज भासते.

त्यास दुसर्‍यावर प्रेम करणे आणि करून घेणे आवडत असल्याने कुटुंब ही त्याची गरज बनते.

त्यास एकाकीपणाचा तिटकारा असल्याने सामाजिक संस्था त्याच्या गरजेच्या ठरतात.

स्वत:चे संरक्षण करण्यासाठी त्यास अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या साधनांची गरज पडते.

अनेकांना गरजेपेक्षा जास्त साधनसंपत्तीची गरज आणि स्वतःचे महत्त्व सिद्ध करायचे असते. यातूनच त्यांना सत्तेची हाव निर्माण होते.

वरील सर्व गरजांतूनच मानवी ध्येय, महत्त्वाकांक्षा, यश आणि अधिकारपदाबाबतची आसक्ती निर्माण होते. यातूनच प्रत्येकजण एकमेकास प्रभावी करण्याचा प्रयत्न करतो. तहान लागलेल्या घोड्यास तुम्ही पाण्यापर्यंत नेऊ शकाल; पण तेथे गेल्यानंतर घोड्यानेच पाणी प्यायचे असते. तुमची धाकटी बहीण, भाऊ स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी त्यास तुम्ही सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्थेत प्रवेश मिळवून द्याल, त्यास आवश्यक सर्व पुस्तके, नोटस्, गाईडस् यांची उपलब्धता कराल, पण यश शेवटी त्या बहीण-भावानेच मिळवायचे असते. सक्ती, दबाव आणि जबरदस्तीचा काहीच उपयोग होत नाही. बर्‍याचदा त्याचा उलटा परिणाम होतो. म्हणून जर तुम्हाला घोड्यास पाणी पाजायचे असेल तर त्याला आधी तहानेने व्याकूळ बनवा. ज्यावेळी त्यास तहान लागेल त्यावेळी तो आपोआपच पाण्याच्या शोधार्थ निघेल आणि आपली तहान भागवेल. तात्पर्य, एखादे कार्य करायचे असल्यास, यश मिळवायचे असल्यास, त्यासंबंधी नेमकी नस ओळखून ती गोष्ट तडीस न्यावयास शिकले पाहिजे. प्रा. हेन्री ओव्हरस्टिटच्या मते, एखाद्या व्यक्तीस प्रोत्साहित किंवा प्रभावित करायचे असेल तर त्या व्यक्तीत तुमच्याबद्दल, त्याच्या ध्येयाबद्दल आसक्ती निर्माण केली पाहिजे, ती त्याची गरज बनली पाहिजे.

पंढरपूरनजीकच्या एका शेतवस्तीतील एका वासराचा हा किस्सा. शेतकरी व त्याचा मुलगा शेतीच्या गोठ्यात बांधलेले वासरू त्याच्या जागेवरून उठवू पाहत होते. शेतकर्‍याने वासरास पुढे ओढायचा प्रयत्न केला. मुलगा पाठीमागून वासरास ढकलायचा प्रयत्न करू लागला. बराच वेळ दोघांनी मेहनत, आरडाओरड करून बघितली, पण वासरू तसूभरही हलेना! हा तमाशा पाहून मोलकरीण पुढे झाली आणि तिने वासराच्या तोंडात स्वत:चे बोट घातले. वासराने ते बोट चाटायला सुरुवात करताच बाईने चालायला सुरुवात केली. वासरू आपोआप उठून त्या बाईबरोबर चालू लागले. थोडक्यात, एखाद्या गोष्टीची गरज वगैरे पाहून तिच्याबद्दल आसक्ती निर्माण केल्यास तुम्ही अपेक्षित साध्य गाठू शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT