मानवाला आदिम काळापासूनच प्रकाशाचे आकर्षण. दहा लाख वर्षांपूर्वी विकसित झालेला ‘होमो इरेक्टस’ आदिमानव असो किंवा सध्याच्या संगणक युगातील आधुनिक मानव, त्याचे प्रकाशाचे आकर्षण तिळमात्र घटलेले नाही. दिवसा आकाशात तेजाने तळपत असलेला सूर्य, रात्री शीतल प्रकाश देणारा चंद्र व तारका नेहमीच मानवी मनाला आकर्षित करीत आलेल्या आहेत. अग्नीचा शोध हा मानवी इतिहासातील सर्वात आद्य आणि महत्त्वाच्या शोधांपैकी एक. अग्नीचा प्रकाश आणि उष्णता यामुळे मानवी जीवन सुकर झाले. सध्याच्या काळात विजेचे दिवे, सौरदिवे असे अनेक प्रकारचे दीप माणसाचे दैनंदिन जीवन उजळवत आहेत. आपला सर्वात मोठा सण मानल्या जाणार्या दीपावलीमध्येही असाच प्रकाशाचा उत्सव असतो. ‘दीपावली’ या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘दिव्यांची ओळ’. अंधारावर प्रकाशाच्या, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय याचे सुंदर प्रतीक म्हणजे दीपावली हा चैतन्यमय सण.
शुक्ल यजुर्वेदाचा एक भाग असलेल्या ‘बृहदारण्यक’ नावाच्या अत्यंत प्राचीन उपनिषदात ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ ही प्रार्थना आढळते. त्याचा अर्थ ‘हे सर्वात्मक परमेश्वरा, आम्हाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जा’. या प्रार्थनेचा वाच्यार्थ सहज समजण्यासारखा आहे. मात्र, त्याचा लक्ष्यार्थही समजून घेणे गरजेचे आहे. इथे ‘अंधःकार’ म्हणजे केवळ भौतिक अंधार नव्हे. बद्ध जीवाला अविद्येच्या, अज्ञानाच्या ज्या अंधःकाराने घेरलेले असते, त्या मायिक अंधारातून प्रकाशमय आत्मज्ञानाकडे घेऊन जाण्यासाठीची ही आर्त प्रार्थना आहे. ज्ञान आणि अग्नी दोन्हीही प्रकाश देतात. जगातील आद्य पारमार्थिक ग्रंथ असलेल्या ऋग्वेदाचा प्रारंभही ‘अग्नी’ या शब्दानेच झालेला आहे. गीतेतही भगवंतांनी ‘ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते’ असे म्हटले आहे. आत्मज्ञानाच्या धगधगत्या अग्नीत जीवाची सर्व बरी-वाईट कर्मे जळून खाक होतात, असा त्याचा अर्थ. अग्नी कोणत्याही स्थितीत अपवित्र होत नाही व त्याची ज्योत नेहमी उर्ध्वगामीच असते. त्यामुळे ज्ञानाला नेहमीच अग्नीची उपमा दिलेली आढळते.
‘नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी’ असे संत नामदेवांनी म्हटले होते. तोच हा ज्ञानाचा दीप, तोच आत्मदीप. तो मनोमनी उजळण्याची हाक देणारी ही दीपावली. अग्नीची उपमा ही जीवातील अदम्य ऊर्जेचे प्रतीक. चिरंतन चैतन्याचा तो सांगावा. तो घेऊन ती येते आणि ओंजळ रिती करून जाते. हेच चैतन्य वसुबारसपासून दिवाळीच्या पाडव्यापर्यंत आणि भाऊबीजेपर्यंत प्रत्येक क्षणाक्षणात सामावलेले असते, तोच गंध, दरवळ या दिव्यांच्या उत्सवात दारोदारी अन् नभांगणी सर्वत्र अनुभवणे हाच या सणाचा आशयघन अर्थ! आपल्या अनेक सणांना कृषी संस्कृतीचे सुंदर अधिष्ठान आहे. माणसाच्या परिपूर्ण जगण्याला याच संस्कृतीचे कोंदण. पावसाळा संपलेला असतो, शेतात नवीन धान्याची रास आलेली असते.
बळीराजाचे हिरवे स्वप्न साकारताना लक्ष लक्ष दिव्यांनी साजरा होणारा हा उत्सव. या समृद्धीबद्दल निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि सुगीचा (कापणीचा) आनंद साजरा करण्यासाठी हा दीपोत्सव साजरा केला जातो. कोजागिरी पौर्णिमा, जी दिवाळीच्या आधी येते, तिला काही ठिकाणी ‘नवान्न पौर्णिमा’ असेही म्हणतात. शेतकरी आपल्या नवीन पिकांच्या कणसांची पूजा करून देवीकडे कृतज्ञता व्यक्त करतात. कोकणात नव्याने आलेल्या धान्याचे ताटवे अर्पण करत पूजा बांधली जाते. दिवाळीची सुरुवात वसुबारस (गोवत्सद्वादशी) ने होते. गायीची आणि वासराची पूजा करत या पशुधनाबद्दलची कृतज्ञता व्यक्त झाली. भारतीय कृषी संस्कृतीत गायीला विशेष स्थान, कारण ती शेतीच्या कामात शेतकर्याची सोबती असते, दुध-दुभत्यातून घरादाराचे पोषण करते. तिची पूजा म्हणजे कृषी जीवनाच्या आधारस्तंभाप्रती माणसाने व्यक्त केलेला आदर.
दिवाळीच्या मुख्य दिवशी देवी लक्ष्मी (संपत्तीची देवी) आणि कुबेर (धनाचा अधिपती) यांची पूजा केली जाते. सोमवती असामवस्येला नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानाने खर्या अर्थाने या प्रार्थनेची सुरुवात होईल आणि लक्ष्मी-कुबेर पूजनाने दर्श अमावस्येला त्याची पूर्ती होईल. शेतकर्यांसाठी शेत आणि त्यातील पीक हेच खरे धन. त्यामुळे शेतीत मिळालेल्या उत्पन्नाबद्दल आणि पुढील वर्षासाठी अधिक समृद्धी मिळावी, यासाठी ही पूजा केली जाईल. व्यापार-उदिमातील माणूस भरभराटीसाठी लक्ष्मी-कुबेराला मनोभावे हात जोडतो. दिवाळीच्या चौथ्या दिवशी बलिप्रतिपदा. बळीराजा हा दानशूर आणि लोककल्याणकारी राजा होता. आजही ग्रामीण भागात शेतकरी आपल्या शेतात बळीचे मातीचे राज्य तयार करतात आणि ‘इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’ अशी प्रार्थना करतात.
बळीराजाच्या स्मरणातून न्यायी आणि समृद्ध कृषी जीवनाची आकांक्षा व्यक्त केली जाते. आपल्या संस्कृती आणि परंपरेची मुळे कशी...किती खोलवर रुजली आहेत, याचा संदेश त्यातून मिळतोच, शेती आणि शेतकर्याशिवाय जीवन नाही, याचाही अर्थ कळतो. कृषी जीवनाशी एकरूप झालेली ही दिवाळी जगण्याचा हा प्रवाह अखंडितपणे सुरू राहण्याची आशा जागवतेच, त्याहून ती अधिक आश्वस्तही करते. दिवाळीपूर्वी केली जाणारी स्वच्छता आणि दिव्यांची रोषणाई, हे केवळ धार्मिक विधी नाहीत, तर घरातील घाण (जी अलक्ष्मी मानली जाते) दूर करून मांगल्य आणि प्रकाश स्थापित करणे, अनारोग्याला हद्दपार करून आरोग्याला आमंत्रण देणे... शेतीतही नवीन हंगामापूर्वी शेत आणि घराची स्वच्छता करण्याची परंपरा रुजली ती याच कारणासाठी. सुगीच्या काळात कामातून मिळालेल्या विश्रांतीमुळे लोक एकत्र येऊन गोडधोड खातात, भेटवस्तूंची देवाण-घेवाण करतात आणि सामुदायिक आनंद साजरा करतात, ज्यामुळे ग्रामीण समाजात एकोपा टिकून राहतो. या आनंदाला, समाधानाला व्यापक आणि सर्वस्पर्शी अर्थ देते ती दिवाळी. मनामनात माणुसकीचे आणि मानवतेचे दीप उजळवण्याचा संदेश ती देते. यावर्षी महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकर्यांवर अस्मानी संकट आले. मात्र, दिवाळीच्या आधीच सरकारने पूरग्रस्तांना, शेतकर्यांना आर्थिक आधार दिला. अन्नदात्या शेतकर्याची दिवाळी गोड होणे आवश्यक होते. दिवाळी साजरी करताना संकटात सापडलेल्या या भावंडांची आठवण ठेवावी लागेल. सर्वांना ही दीपावली आनंददायी व भरभराटीची ठरो, हीच त्या सर्वात्मक परमेश्वराकडे प्रार्थना..!