तानाजी खोत
जागतिक तंत्रज्ञानाच्या, विशेषतः रोबोटिक्सच्या क्षेत्रात सध्या अत्यंत वेधक घडामोडी घडत आहेत. चीनमधील ‘युनिट्री रोबोटिक्स’च्या प्रयोगशाळेत तयार झालेला जी1 हा ह्युमनाईड रोबो 92 टक्के अचूकतेसह मानवासारखा वावरताना दिसत आहे. तो धावू शकतो, पायर्या चढू शकतो आणि पडला तरी पुन्हा उभा राहू शकतो. दुसरीकडे, शांघायमधील ‘ड्रॉईड-अप’ कंपनीने ‘मोया’ नावाचा जगातील पहिला ‘बायोमिमेटिक’ रोबो सादर केला आहे. मोयाचे वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ यंत्रासारखा काम करत नाही, तर तो मानवासारखा डोळ्यांचा संपर्क ठेवू शकतो आणि चेहर्यावर स्मितहास्यही आणू शकतो.
सध्या जगभरात रोबोंची ‘अचूकता’ आणि ‘किंमत’ यावर संशोधनाचा मोठा भर आहे. अमेरिकेतील बोस्टन डायनॅमिक्स आणि टेस्ला रोबोंची लवचिकता वाढवण्यासाठी प्रयोग करत आहेत; तर चीनने हे रोबो 14 ते 15 लाख रुपयांच्या, म्हणजे एका मध्यमवर्गीय कारच्या किमतीत आणण्याचे वेगाने प्रयत्न चालवले आहेत. एकदा का हे तंत्रज्ञान खिशाला परवडणारे झाले की, घरकाम, हॉटेल किंवा कारखान्यातील कामांसाठी रोबो थेट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतील.
लाखोंच्या संख्येत रोबो बाजारात उतरवण्यासाठी अमेरिका आणि चीनमध्ये मोठी चुरस लागली आहे. ज्याप्रमाणे गेल्या शतकात कारने जगाची जीवनशैली बदलली, तसेच किंवा त्याहून अधिक व्यापक असे आता रोबोटिक्सच्या बाबतीत घडू शकेल. या स्पर्धेत लास वेगासमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ‘नाडा’ शोमध्ये ‘फॅराडे फ्युचर’ने एकाच वेळी तीन प्रकारचे व्यावसायिक रोबो लाँच करून खळबळ उडवून दिली आहे. यामध्ये ‘फ्युचरिस्ट’ हा व्यावसायिक कामांसाठी, तर एजिस हा सुरक्षिततेसाठी सज्ज आहे.
या जागतिक शर्यतीत भारत प्रत्यक्षात कुठे दिसत नाही. हार्डवेअरमध्ये चीन आघाडीवर असला, तरी या रोबोंना चालवणारे एआय मेंदू तयार करण्यात भारतीय इंजिनिअर्स मोलाची कामगिरी बजावत आहेत. पुढील पाच-दहा वर्षांत भारतीय स्टार्टअप्स या शर्यतीत स्वतंत्र स्थान निर्माण करतील, अशी आशा आहे.
‘रोबोट’ हा शब्द 1920 मध्ये कारेल चॅपेक या झेक लेखकाने वापरला, ज्याचा अर्थ वेठबिगारी किंवा सक्तीचे श्रम असा होतो. मात्र, आजचा ह्युमनाईड रोबो या वेठबिगारीचा अंत करतोय. हा यंत्र-मानव विजेवर चालतो, त्याला भावना नाहीत आणि थकवा तर मुळीच नाही. झोप किंवा विश्रांतीची गरज नसलेला हा रोबो मानवासाठी सक्तीचे असलेले ओझे विना तक्रार आणि शंभर टक्के कार्यक्षमतेने पूर्ण करू शकतो. रोबोच्या सार्वत्रिकरणातून निर्माण होणारे चित्र वरवर पाहता सुखावह असले, तरी याचे परिणाम मानवी समाजावर गंभीर होऊ शकतात. जर यंत्रांनी 92 टक्क्यांपेक्षा जास्त अचूकतेने काम करण्यास सुरुवात केली, तर सेवा क्षेत्रातील रोजगाराचे गणित पूर्णपणे कोलमडेल. नोकर ठेवण्याऐवजी ‘वनटाईम इन्व्हेस्टमेंट’ म्हणून रोबोकडे पाहिले जाईल. यामुळे समाजात एक मोठा युजलेस क्लास निर्माण होईल. श्रमाचे मूल्य कमी झाल्यामुळे निर्माण होणारी आर्थिक दरी हा भविष्यातील सर्वात मोठा यक्षप्रश्न असेल, याबाबत जागतिक विचारवंत इशारा देत आहेत.