युवराज इंगवले
काही अपवाद असले, तरी देश कोणताही असो त्या देशातील सर्वोच्च राजकीय नेते आपला उत्तराधिकारी बहुंताश वेळा आपल्याच अपत्याला नेमत असतो. ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. अशातच उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन हे आपला उत्तराधिकारी म्हणून किम जू ए हिलाचा नेमणार असल्याचे आता संकेत मिळत आहेत. त्याला कारणही तसेच घडले आहे. उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांच्यासह त्यांची कन्या किम जू ए हिने चीनमधील विजय दिनाच्या परेडला हजेरी लावली. देशाबाहेरील कार्यक्रमात किम जू ए हिची ही पहिलीच उपस्थिती लक्षवेधी ठरली आहे. किम जू ए हिला भविष्यात किम जोंग उन यांच्या उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात आहे.
सध्या 12 वर्षांच्या असलेली किम जू ए ही 2022 पासून वडिलांसोबत लष्करी संचलन, शस्त्रास्त्र चाचण्या आणि विविध महत्त्वपूर्ण कार्यक्रमांत सहभागी होत आहे. किम जोंग उन यांना तीन मुले असून त्यात किम जू ए व्यतिरिक्त एक मुलगा आहे. तिसर्या अपत्याबाबत, ते मुलगा की मुलगी याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. किम जू ए हीच्या चीन दौर्यामुळे तिच्या वाढत्या महत्त्वाचा आणि संभाव्य वारसदार म्हणून केलेल्या तयारीचा संकेत मिळत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.
बीजिंग रेल्वे स्थानकावर वडिलांसोबत तिची उपस्थिती पाहता विदेशातही तिला उत्तर कोरियामधील दुसर्या क्रमांकाचे स्थान दिले जात असल्याचे स्पष्ट झाले. याद्वारे किम जोंग उन यांनी जू ए ही उत्तराधिकारी असेल, असा संदेश जागतिक समुदायाला दिला आहे. किम जोंग उन कुटुंबाविषयी अत्यंत गोपनीयता बाळगतात. त्यामुळे त्यांच्याबाबत फारच मर्यादित माहिती उपलब्ध आहे.
नुकतेच चीनमधील तियानआनमेन चौकात झालेल्या लष्करी परेडपूर्वी मात्र किम जू ए दिसल्या नव्हत्या. 2022 मध्ये ती प्रथमच सार्वजनिकरीत्या दिसली. त्यावेळी तिने वडिलांसोबत आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या (आयसीबीएम) प्रक्षेपणाला उपस्थिती लावली होती. 2023 मध्येही ती विविध लष्करी कार्यक्रमांत दिसल्या. सध्या तिचे शिक्षण घरूनच सुरू असून जू ए हिला घोडेस्वारी करणे, पोहणे आणि स्कीईंगची विशेष आवड आहे. लग्नानंतर काही काळ किम जोंग उन यांनी पत्नी री सोल जू यांनाही गुप्त ठेवले होते. त्या प्रथमच 2012 मध्ये सार्वजनिक कार्यक्रमात दिसल्या. दोघांचा विवाह 2009 मध्ये झाले. 2012 मध्ये री सोल जू गर्भवती असल्याची माहिती पुढे आली होती. त्या काळात समोर आलेल्या छायाचित्रात त्यांनी स्कर्ट घातलेला असून, त्यामध्ये गर्भावस्था लपवण्याचा प्रयत्न केला. उत्तर कोरियामध्ये विदेशी माध्यमांवर पूर्णतः बंदी असल्यामुळे तेथील माहिती जगापर्यंत अगदीच कमी प्रमाणात पोहोचते. माजी बास्केटबॉल खेळाडू डेनिस रॉडमन यांनी सांगितले होते की, किम जोंग उन यांना कन्या असून तिचे नाव किम जू ए ठेवले आहे. किम जोंग उन यांना तीन अपत्ये असून त्यामध्ये किम जू ए सर्वाधिक चर्चेत असते.