एखाद्या गोष्टीचा सातत्याने चांगला प्रचार केला तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. उदाहरणार्थ, सिगारेट-बिडी पिणे आरोग्याला धोकादायक आहे, असे इशारे पाकिटावर आणि बिडीच्या बंडलवर छापल्यामुळे आजकाल धूम्र पानाचे प्रमाण कमी झाले आहे. पूर्वी रेल्वेमध्ये, दवाखान्यात, बस स्टँडवर असंख्य लोक सिगारेट - बिडीचा धूर काढताना दिसत होते. त्यांची संख्या कमी झालेली आहे, असे तुमच्या लक्षात येईल. हीच गोष्ट हुंडा पद्धतीबद्दलही लागू होते. हुंडा पद्धती ही वधू पित्याचे कंबरडे मोडणारी प्रथा असून त्यामुळे अनेक शेतकर्यांना आत्महत्या करावी लागलेली आहे. हुंडा पद्धतीला विरोध अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि त्याचे चांगले परिणाम आता दिसायला लागले आहेत. विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून होणारा जाच, त्रास, त्यातून हत्या किंवा आत्महत्या अशा हुंडाबळीच्या घटना आपण नेहमी ऐकत असतो. या चुकीच्या परंपरेला छेद देणारी सुखद घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे.
वधू पक्षाने हुंडा किती द्यावा यासाठी बोलाचाली केल्या जातात. बरेचदा वराचा नाईलाज असतो. कारण त्याला स्वतःच्या आई-वडिलांना मान द्यावा लागतो. शहाबुद्दीनपूर येथील एका लग्न समारंभात नवरदेवाने हुंडा घेण्यास स्पष्ट नकार देत तब्बल 21 लाख रुपयांची रक्कम मुलीच्या कुटुंबाला परत केली. त्याच्या या अनोख्या आणि सकारात्मक कृतीने वधूच्या कुटुंबालाच नाही तर लग्न मंडपातील उपस्थित पाहुण्यांना आणि सर्वसामान्यांनाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
आदिती सिंग नावाच्या वधूचा विवाह अवधेश राणा यांच्याशी पार पडला. आदितीचे वडील हयात नसल्यामुळे तिच्या मामाने आणि आजोबांनी हे लग्न लावून दिले. लग्नाचे विधी सुरू असताना नवरदेव अवधेश राणा अचानक जागेवरून उठले आणि त्यांनी वधूच्या मामाजवळ जाऊन 21 लाख रुपयांची हुंड्याची रोख रक्कम परत केली. हा अचानक घडलेला प्रसंग पाहून आदिती भावुक झाली. यावेळी अवधेश राणा यांनी सांगितले की, मी सुरुवातीपासूनच हुंडा घेणार नसल्याचे सांगितले होते. हे पैसे आदितीच्या वडिलांनी कष्टाने कमावलेले आहेत आणि तो तिचा हक्क आहे, माझा नाही. असा समाजसुधारक जावई मिळाल्याबद्दल सर्वांनी आदितीच्या कुटुंबाचे अभिनंदन केले आहे.
असाच आणखी एक चांगला प्रकार सहारनपूर येथे घडला. कॅग ऑफिसर असलेल्या रजनीश नागर यांनीही हुंडा न घेता केवळ एक रुपया आणि नारळ स्वीकारून हुंडामुक्त विवाहाचा आदर्श ठेवला. अशा प्रकारच्या सकारात्मक घटनांमध्ये वाढ झाली पाहिजे, जेणेकरून हुंडा पद्धत पूर्णपणे बंद होईल. जिथे जमेल तिथे अशा प्रकारचे विषय मांडून आपणही हुंडा पद्धत बंद करण्यासाठी आपला सहभाग नोंदवला पाहिजे हे निश्चित.