मुरलीधर कुलकर्णी
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड झालेले नितीन नवीन हे बिहारच्या राजकारणातील एक महत्त्वाचे, संघटनकुशल आणि तळागाळातून पुढे आलेले नेतृत्व मानले जाते. विद्यार्थिदशेपासून राजकारणाशी जोडले गेलेले नितीन नवीन यांचा प्रवास हा भाजपच्या संघटनात्मक संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून त्यांनी सार्वजनिक जीवनात पाऊल टाकले. विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून त्यांनी नेतृत्वगुण, संघटनकौशल्य आणि विचारधारेची बांधिलकी आत्मसात केली.
नितीन नवीन यांचा जन्म 1980 मध्ये पाटणा येथे झाला. ते भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार नवीन किशोर प्रसाद सिन्हा यांचे सुपुत्र आहेत. वडिलांच्या राजकीय वाटचालीमुळे घरातच त्यांना राजकारणाचे प्राथमिक धडे मिळाले. मात्र, केवळ वारसा म्हणून नव्हे, तर स्वतःच्या कष्टांवर आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या थेट संवादावर त्यांनी आपली ओळख निर्माण केली. विद्यार्थिदशेत असतानाच संघटनात्मक कामात सक्रिय झाल्यामुळे त्यांचा पक्षातील प्रवास वेगाने घडत गेला.
2006 मध्ये बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून झालेल्या पोटनिवडणुकीत विजय मिळवत त्यांनी बिहारच्या विधिमंडळात प्रवेश केला. त्यानंतर सलग पाचवेळा ते याच मतदारसंघातून निवडून आले, ही बाब त्यांच्या जनाधाराची आणि स्थानिक पातळीवरील कामाची साक्ष देणारी आहे. आमदार म्हणून त्यांनी मतदारसंघाच्या विकासावर भर दिला आणि शहरी पायाभूत सुविधा, रस्ते, नागरी सेवा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. बिहार सरकारमध्ये त्यांनी विविध महत्त्वाची खाती सांभाळली. रस्तेविकास, नगरविकास व गृहनिर्माण तसेच विधी आणि न्यायमंत्री म्हणून काम करताना त्यांनी प्रशासकीय अनुभव मिळवला. निर्णयक्षमता, कामाचा वेग आणि जबाबदारीची जाणीव, ही त्यांची वैशिष्ट्ये म्हणून ओळखली जातात.
मंत्रिपदासोबतच पक्षसंघटनेतील कामातही ते तितकेच सक्रिय राहिले. भारतीय जनता युवा मोर्चाचे बिहार प्रदेशाध्यक्ष आणि नंतर राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून त्यांनी युवा कार्यकर्त्यांना संघटित करण्याचे मोठे काम केले. बिहार भाजपचे जनरल सेक्रेटरी आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदार्या पार पाडल्या. विविध राज्यांतील निवडणुकांमध्ये प्रभारी म्हणून काम करताना त्यांच्या संघटनकौशल्याची दखल घेतली गेली. सिक्कीम आणि छत्तीसगडमधील निवडणूक कामगिरीत त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी त्यांची निवड ही भाजपमधील पिढीजात बदलाचे प्रतीक मानली जात आहे. युवक, संघटन आणि प्रशासन या तिन्ही पातळ्यांवर अनुभव असलेले नितीन नवीन आगामी काळात पक्षाच्या राष्ट्रीयस्तरावरील कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.