भारत-अमेरिका संयुक्त सहकार्यातून साकारलेला निसार उपग्रह ही एक नवी उपलब्धी आहे. प्रगत अभियांत्रिकी तंत्रज्ञानातील उच्च गुणवत्तेचे शिखर आहे. हा उपग्रह पृथ्वीच्या भूपृष्ठावरील सर्व हालचालींचा आलेख आपल्या समोर ठेवेल. उपग्रह क्षेत्रातील भारताचा हा सर्वात मोठा शक्तिशाली प्रयोग असून, त्यामुळे अंतराळ क्षेत्रांतील भारताचे वर्चस्व अमेरिकेनेसुद्धा मान्य केले आहे, असा याचा अर्थ होतो.
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर
पृथ्वीच्या पोटातील हालचालींचे मापन करून भावी संकटांची सूचना देणार्या निसार उपग्रहाचा अर्थ मोठा मौलिक आहे. निसार शब्दाचा विस्तार असा होतो की, ‘नासा-इस्रो सायंटिफिक सिंथेटिक अपर्चर रडार’. या उपग्रह मोहिमेच्या माध्यमातून निसर्ग क्रिया-प्रक्रियांचे मापन केले जाणार आहे. त्यामुळे याला निसर्ग उपग्रह असेही म्हटले आहे. 30 जुलै रोजी श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित झालेला हा उपग्रह भारत-अमेरिका यांच्यातील अंतराळात सहकार्यातून प्रक्षेपित झाला आहे. हा अनोखा उपग्रह इमेजिंग क्षेत्रात मोठी क्रांती करणारा ठरेल. कॅलिफोर्नियातील जेट प्रयोगशाळेचे वैज्ञानिक पॉल रोसेन यांच्या मते उच्च वैज्ञानिक महत्त्वाकांक्षेतून एक प्रभावी जीवनरक्षक प्रणाली उदयास आली आहे.
विज्ञानातील अनुप्रयोग आणि प्रगत जीवनद़ृष्टीचा हा आविष्कार आहे. हवामान बदलाच्या संकटांतून उभ्या मानव जातीला वाचविण्यासाठी हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. दुहेरी स्वरूपाच्या म्हणजेच ड्युअल बँड रडारमुळे या उपग्रहाद्वारे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे मिलिमीटरनुसार अचूकपणे निरीक्षण करता येईल, तसेच त्यामुळे भूखंडांतील हालचाली, टेक्टॉनिक शिफ्ट, हिमनद्यांच्या उलथापालथी, जैववनस्पती, बायोमास बदल आणि भूस्खलन, सागराच्या अंतरंगातील हालचाली याबाबत अचूक निदान करणे शक्य होईल. पृथ्वीच्या आणि सागराच्या हालचालींबाबत आपण उत्तम थ्रिडी चित्रपटही या आधारे निर्माण करू शकतो. दोन तरंग लहरी एकापेक्षा अधिक अचूक मापन देऊ शकतील. या उपग्रहाला पृथ्वीची एक प्रदक्षिणा करण्यास 97 मिनिटे लागतात, तर 12 दिवसांत सर्व सातही समुद्रांचे चित्रण हा उपग्रह करू शकेल.
उपग्रह क्षेत्रातील भारताचा हा सर्वात मोठा शक्तिशाली प्रयोग असून, त्यामुळे अंतराळ क्षेत्रातील भारताचे वर्चस्व अमेरिकेनेसुद्धा मान्य केले आहे, असा याचा अर्थ होतो. निसारमध्ये दोन प्रमुख पेलोड आहेत. एक ‘नासा’ने विकसित केलेला आणि दुसरा ‘इस्रो’ने विकसित केलेला. दोघेही तुल्यबळ असून, समसमान आहेत. नासा-इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार सेटेलाईट म्हणजे निसार हा एक निरीक्षण उपग्रह आहे. आजवरचा हा सर्वात खर्चिक आणि महागडा असा हा उपग्रह आहे. त्यावर उभय राष्ट्रांचा 1.3 अब्ज डॉर्ल एवढा खर्च होत आहे; पण त्याचे अनेकविध लाभ पाहता हा खर्च मानव जातीच्या कल्याणासाठी होत आहे, हे तेवढेच खरे आहे. भूकंप आणि त्सुनामी, हिमनद्यांच्या हालचाली तसेच धुळीचे वादळ, प्रचंड वेगाने येणारे हरिकेन, कार्बन उत्सर्जन आणि शोषणामुळे निर्माण होणार्या समस्या या सर्व बाबतीत या उपग्रहामुळे संकटांची जाणीव होईल आणि प्रश्न सोडवणे अधिक सोपे जाईल.
‘इस्रो’चे अध्यक्ष संचालक डॉ. व्ही. नारायण यांनी म्हटल्याप्रमाणे हा उपग्रह एक जीवनरक्षक उपग्रह म्हणून ओळखला जाईल. अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताच्या वाढत्या नेतृत्वाचे हा उपग्रह प्रतीक बनला आहे. स्वदेशी क्रायोजेनिक स्टेजसह जी.एस.एल.व्ही. या यानाचे हे नवे ऑपरेशनल उड्डाण आहे. सूर्य समकालिक ध्रुवीय कक्षेत उपग्रह जीएसएलव्हीचा वापर करणारे हे पहिलेच मिशन आहे. एक जीवनरक्षक उपग्रह म्हणून याचे महत्त्व तीन कारणांमुळे अधिक आहे. पहिले कारण म्हणजे, या उपग्रहामुळे मानव जातीवर येणार्या संभाव्य नैसर्गिक संकटांची आधीच चाहूल लागेल आणि शेकडो लोकांचे प्राण त्यामुळे वाचविले जातील. दुसरे म्हणजे, भूकंप, त्सुनामी, वादळे आणि भूस्खलन तसेच मोठमोठ्या भूमिपटलांचे स्थलांतर यांसारख्या आपत्तींची पूर्वसूचना मिळेल आणि जीवन सुरक्षित करता येऊ शकेल. तिसरे म्हणजे, या उपग्रहामुळे पृथ्वीच्या अंतरंगात होणारे बदल अभ्यासता येतील तसेच समुद्राच्या पोटात होणार्या हालचाली, हिमनद्यांचे बदलणारे प्रवाह यासारख्या दुर्घटनांचेसुद्धा चित्रण होईल आणि त्यापासून बोध घेता येऊ शकेल. मानवी जीवनाची नैसर्गिक संकटांतून मुक्तता करण्यात विश्वमानव समाजाला यश येईल, ही खरोखर मोठी उपलब्धी होय. हा उपग्रह शिपिंग मार्ग तसेच हवाई वाहतूक सुरक्षा यासाठीसुद्धा पथदर्शक आणि हितकारक ठरणार आहे.
‘इस्रो’ आणि ‘नासा’ यांनी संयुक्तपणे विकसित केलेला हा प्रकल्प 1.5 अब्ज डॉलर्स एवढ्या खर्चाचा आहे. विशेषतः भारताने अंतराळ क्षेत्रात घेतलेली ही मोठी झेप एवढी विलक्षण आहे की, त्यामुळे सबंध जगाला त्याचे मानवी कल्याणाच्या द़ृष्टीने अनेक विविध लाभ होणार आहेत. असे लाभ लक्षात घेता या बहुउद्देशीय उपग्रहाचा प्रामुख्याने दुहेरी फायदा आहे. पहिले म्हणजे, त्यामुळे नैसर्गिक आपत्तींचे स्वरूप आणि त्याची भयावहता आधीच लक्षात येईल आणि जीवित तसेच वित्तहानी त्यामुळे टाळता येऊ शकेल. दुसरे म्हणजे, या उपग्रहामुळे वैज्ञानिक जगतामध्ये संशोधनासाठी सामग्री डेटा उपलब्ध करणे शक्य होईल आणि पृथ्वीच्या अंतरंगात होणार्या हालचाली या शास्त्रीय पद्धतीने अभ्यासता येतील. भारतीय आणि अमेरिकन अभियांत्रिकीचे हे उत्कृष्ट आणि अखंड मिशन होय. भविष्यातसुद्धा ही आदान-प्रदानाची क्रिया अखंडपणे चालू राहील. ‘नासा’च्या जेट प्रोफेशन लॅबोरेटरी तसेच बंगळूरमधील ‘इस्रो’च्या यू.आर.एस.सी. उपग्रह केंद्र तसेच ‘नासा’च्या अहमदाबाद येथील स्पेस अॅप्लिकेशन सेंटरमध्ये हा उपग्रह विकसित करण्यात आला आहे. भारतीय उपग्रह यंत्रणेने आपली विश्वासार्हता पुन्हा एकदा जगासमोर सिद्ध केली आहे.
या उपग्रहाला बारा मीटर उंचीच्या न फडफडणार्या सोन्याचा जाळीदार अँटेना आहे. तो पृथ्वीच्या खालच्या कक्षात अशा प्रकारचा सर्वात मोठा अँटेना आहे. त्यामुळे हे एक प्रगत आणि स्वयंपूर्ण तंत्रज्ञान बनले आहे. प्रक्रिया केल्यानंतर सर्व डेटा सार्वजनिकपणे उपलब्ध होईल आणि त्यामुळे सर्व संशोधन करणे शक्य होईल. ही एक मोठी उपलब्धी आहे. तांत्रिक आणि सांस्कृतिक द़ृष्टीने समृद्ध असा वारसा त्यामुळे तयार होईल. या दोन्ही संस्थांची विचारशैली वेगवेगळी असली, तरीही त्यांनी एकत्र येऊन समांतर पद्धतीने काम केले. त्यामुळे हा प्रकल्प नवी दिशा देऊ शकला आहे. चौरस किलोमीटरला डेटाने भागले असता फक्त दोन अमेरिकन सेंट एवढा खर्च होतो. म्हणजे ‘नासा’ व ‘इस्रो’च्या भागीदारीमुळे हे शक्य झाले आहे. त्यामुळे या उपग्रहाला महागडा, खर्चिक असे म्हणणे रास्त ठरणार नाही. सर्व प्रकारच्या अभियांत्रिकी आव्हानांना सामोरे जाऊन तांत्रिक द़ृष्टीने परिपूर्ण अशी निर्मिती करण्यात उभयताना यश आले, हे अधोरेखित केले पाहिजे.