New Year celebration Pudhari
संपादकीय

New Year Celebration: नववर्षाचं आनंदगान

नवं वर्ष म्हणजे केवळ दिनदर्शिकेचं पान उलटणं नाही, तर नात्यांची, माणूसपणाची आणि संवेदनशीलतेची नव्याने उजळणी आहे

पुढारी वृत्तसेवा
विधिषा देशपांडे

नवं वर्ष म्हणजे केवळ दिनदर्शिकेचं पान उलटणं नाही, तर नात्यांची, माणूसपणाची आणि संवेदनशीलतेची नव्याने उजळणी आहे. प्रगतीच्या धावपळीत हरवत चाललेला संवाद, प्रेम आणि स्नेहबंध पुन्हा शोधण्याचं हे नववर्षाचं आनंदगान आहे.

दिनदर्शिकेचे एक एक पान उलटत जाते आणि वर्ष कधी संपते, हे कळतही नाही. आणखी काही तासांनी कॅलेंडरीय गणनेनुसार नव्या वर्षाचा प्रारंभ होईल आणि नव्या आशा-आकांक्षांचा सूर्योदय नव्या क्षितिजांकडेे वाटचाल करू लागेल. मावळत्या वर्षाच्या कडू-गोड आठवणींची शिदोरी गाठीशी घेऊन पुनश्च एकदा मर्त्यमानव आणि त्या जोडीला यंत्रमानव नव्या दिशेने प्रयाण करू लागेल. ऋतू यावेत, जीवनात त्यांनी रंग भरावेत आणि मानवी आयुष्य समृद्ध करावे, अशी एक साधारण अपेक्षा असते. ऋतूंचे सोहळे आपल्या मनपटलावर रुजत असतात आणि त्यांचे अर्थ नव्याने उमगत असतात.

खरे तर, वर्षाचा बदल होणे ही निव्वळ आकडेमोडीची प्रक्रिया नसते. आयुष्यातले एक वर्ष कमी होत असताना त्या वर्षाने दिलेल्या अनुभवांनी अवघे जीवन समृद्धीकडे जात असते. प्रश्न असतो तो या अनुभवांसाठी आपल्याला नेमकी काय किंमत मोजावी लागते, याचा. ही किंमत किती आणि ती आपण कशा प्रकारे स्वीकारतो, यालाही महत्त्व असते. एका राजाने पुढच्या पिढीला संदेश देण्यासाठी राज्यातील सर्व विचारवंतांना थोडक्यात तत्त्वज्ञान लिहायला सांगितले, तेव्हा खूप मंथनानंतर एकच वाक्य तयार झाले, ते म्हणजे ‌‘येथे प्रत्येक गोष्टीची किंमत चुकवावी लागेल.‌’ याचा गांभीर्याने विचार केला, तर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील.

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात, छोट्या कुटुंबांमध्ये प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या आहेत. घरातल्या कोणाचे दुखले-खुपले, तर कपाळाला बाम लावून मायेची बोटं फिरवणारी माणसे आज मिळत नाहीत. घरातल्यांची इच्छा असूनही कोणाकडे तसा वेळ नाही. आई-बाबा हे कुटुंबाचे मुख्य खांब; पण रोजचा जीवनव्यवहार चालवण्याच्या व्यापात ते इतके व्यग््रा आहेत की, त्यांना आपल्या पिलांकडे लक्ष द्यायलाही सवड नाही. दुसरीकडे, प्रत्येकाला स्वतःची ‌‘स्पेस‌’ हवी आहे; पण ही स्पेस आनंदात जगता यावी, यासाठी मायेचा भक्कम आधारही हवा आहे. पैसा मिळवणे आणि करिअरच्या नादात यशाची शिखरे सर करताना पायाखालचा आधार मात्र पोखरत चालला आहे. आपल्या बाळाच्या वाढत्या वयातील लीला बघायला पालकांकडे वेळ नाही. अशा वेळी रस्ता चुकलेले मूल पालकांना शरमेने मान खाली घालायला लावेल की काय, अशी भीती वाटते. येथे दोष कोणाचा नसून तो परिस्थितीचा आणि आयुष्यात नेमके काय हवे आहे, हे न कळलेल्या पिढीचा आहे.

नव्या वर्षात ही विसंगती टळावी आणि कुटुंबे अधिक एकसंध व्हावीत. प्रगतीच्या वेगवान चक्रात माणसाकडे भौतिक साधने वाढली; पण हृदय मात्र संकुचित होत गेले. माहिती-तंत्रज्ञानाच्या विस्फोटामुळे रोजगाराचे प्रमाण वाढले, पगार वाढले, जगातील अब्जाधीशांच्या यादीत भारतीयांची संख्या वाढली; पण इंटरनेटच्या स्क्रीनवरचा संवाद जेवढा वाढला, तेवढाच मनातला संवाद तुटत गेला. गेल्या वर्षात आत्महत्या करून सोशल मीडियावर स्वतःलाच श्रद्धांजली वाहणारे तरुणही आढळले. ज्या वयात जीवन कळायला हवे, त्या वयात टोकाचे पाऊल उचलले जात आहे, हे न पचणारे आहे. बोगद्याच्या काळ्या वातावरणात जसा प्रकाशाचा किरण हवा असतो, तसाच आयुष्यातही स्नेहबंधांचा प्रकाश हवा आहे.

वैयक्तिक जीवनासोबतच 2025 हे वर्ष भारतीयांसाठी लक्षणीय ठरले. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा टॅरिफ बडगा असो, जीएसटीमधील सुधारणा असोत, सोन्या-चांदीच्या भावांमध्ये झालेली ऐतिहासिक वाढ असो किंवा प्रयागराजमधील महाकुंभमेळा असो किंवा क्रिकेटसह क्रीडाविश्वामध्ये भारतीय प्रतिभावंत तरुण-तरुणींनी उमटवलेली छाप असो किंवा अपघातांच्या दुर्दैवी मालिका असोत... या कडू-गोड आठवांच्या स्मृती घेऊन आपण नव्या वर्षात प्रवेश करणार आहोत.

नव्या वर्षात राजकीय आणि सामाजिक बदल घडत असताना शांतता, सौहार्द, सलोखा नांदावा ही कोणाही सुजाण नागरिकाची स्वाभाविक अपेक्षा आहे. देशापुरता विचार करायचा झाल्यास प्रत्येक भारतीयाच्या कुटुंबाचे बंध अधिक बळकट व्हावेत, स्वप्ने फुलावीत आणि माणूसपणाच्या खुणा जपत असताना आपल्या हातून कोणाचेही वाईट होणार नाही, इतकी काळजी प्रत्येकाने घेतली, तर सारा समाज सुखी होईल. समृद्धीची शिखरे सर करतानाच परस्परांशी स्नेहाने जोडले जाणे, हेच खऱ्याअर्थाने नव्या वर्षाचे यश ठरेल.

मावळत्या वर्षाने कृत्रिम बुद्धिमत्ता नावाचा जादुई जिन येणाऱ्या काळात कोणकोणते कारनामे दाखवणार आहे, याची झलक दाखवली आहे. या नव्या कालखंडात तंत्रज्ञानाचा वापर केवळ चरितार्थासाठी न होता तो तुटलेली मने जोडण्यासाठी व्हावा, ही काळाची गरज आहे. आपण ‌‘स्मार्ट‌’ उपकरणांच्या विळख्यात इतके अडकलो आहोत की, समोर बसलेल्या माणसाशी डोळ्यांत बघून बोलण्यापेक्षा हातातील मोबाईलवर चॅटिंग करण्यात आपल्याला अधिक धन्यता वाटते. ही आभासी दुनिया आपल्याला तात्पुरता आनंद देऊ शकते; पण संकटाच्या वेळी उभा राहणारा खांदा हा रक्ताच्या आणि प्रेमाच्या माणसांचाच असतो. त्यामुळे या वर्षात किमान जेवताना तरी मोबाईल बाजूला ठेवून एकमेकांच्या सुख-दुःखाच्या गोष्टी ऐकण्याचा संकल्प प्रत्येकाने केला, तर घरातील संवाद पुन्हा जिवंत होईल आणि विस्कळीत होत चाललेली कुटुंबव्यवस्था पुन्हा बळकट होईल.

पैसा आणि यशाची मृगजळे आपल्याला पळवत ठेवतात; पण त्या धावपळीत घराच्या उंबरठ्यावर आपली वाट पाहणाऱ्या त्या थकलेल्या डोळ्यांतील आर्जव आपण वाचायला विसरतो आहोत. नव्या वर्षाच्या पहाटेला केवळ शुभेच्छांचा ओघ नसावा, तर तो आपल्या माणसांच्या कुशीत विसावल्याचा एक सुखाचा उसासा असावा. ज्या दिवशी आपल्या यशाचा आनंद वाटून घेण्यासाठी आपल्याकडे आपली हक्काची माणसं असतील, त्या दिवशी खऱ्याअर्थानं आयुष्यात वसंत फुलला असं समजायला हरकत नाही. आयुष्याच्या वाटेवर चालताना आपली ओंजळ रिकामी राहू नये, याची काळजी निसर्गच घेत असतो.

आपण फक्त ती ओंजळ पसरून घेण्याची वृत्ती जपायला हवी. सत्तेचे सारीपाट बदलतील, अर्थव्यवस्थेचे आकडे वर-खाली होतील; पण माणसाचं माणूसपण मात्र कोणत्याही बाजाराच्या किमतीवर ठरू नये. अंगणातल्या तुळशीला जसं दररोज पाणी घालून आपण तिची मायेने निगा राखतो, तशीच निगा आपल्या संवेदनशील मनाचीही राखायला हवी. नव्या वर्षात आर्थिक प्रगतीबरोबरच दुसऱ्याच्या डोळ्यांतील आसू पुसण्याइतकी विशालता हृदयात निर्माण व्हावी. जेव्हा आपण ‌‘स्व‌’च्या कोषातून बाहेर पडून समाजाच्या दुःखाशी नातं सांगू, तेव्हाच प्रत्येक मनात आनंदाचं ‌‘नंदनवन‌’ फुलेल आणि खऱ्याअर्थानं स्वप्नांची ही फुलं चिरंतन सुगंध देत राहतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT