गणेश काळे, संगणकतज्ज्ञ
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे माहिती-तंत्रज्ञान उद्योगाच्या पारंपरिक व्यवसाय पद्धतीत मोठा बदल घडू लागला आहे. मनुष्यबळावर आधारित सेवा मॉडेलपासून एआयकेंद्रित भागीदारी आणि नव्या मूल्यनिर्मितीकडे भारतीय आयटी कंपन्यांची वाटचाल सुरू झाली आहे.
माहिती-तंत्रज्ञान उद्योगाची मागील तीन दशके प्रामुख्याने मनुष्यबळ, प्रकल्पांचे आऊटसोर्सिंग आणि दीर्घकालीन सेवा करार यांच्या आधारावर विस्तारली. आता कृत्रिम बुद्धिमत्ता या व्यवसायाचे मूळ गणितच बदलू लागली आहे. ग्राहक कंपन्यांना हजारो अभियंत्यांची फौज पुरविण्यापेक्षा त्यांच्या व्यवसायात कृत्रिम बुद्धिमत्ता किती खोलवर रुजवता येते, उत्पादकता किती वाढवता येते आणि निर्णय प्रक्रिया किती स्वयंचलित करता येते, यावर आयटी कंपन्यांचे भविष्यातील मूल्य ठरणार आहे. त्यामुळे पारंपरिक कंपनी अधिग्रहणाऐवजी ग्राहकासोबत मोठा सेवा करार आणि त्याच वेळी त्याच्या तंत्रज्ञानविषयक उपकंपनीचे अधिग्रहण, असे नवे व्यावसायिक प्रारूप आकार घेत आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि पोर्शे यांच्यातील ताजा व्यवहार याच बदलाची खूण आहे.
टीसीएसने जर्मनीतील आलिशान मोटार उत्पादक पोर्शेसोबत पाच वर्षांची धोरणात्मक भागीदारी केली आहे. या कराराचे मूल्य सुमारे १.५ अब्ज डॉलर असल्याचे सांगितले जाते. पोर्शेशी संबंधित माहिती-तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन सल्लागार कंपनी एमएचपी मॅनेजमेंट अँड आयटी बेराटुंगच्या अधिग्रहणाचाही करार केला आहे. त्याचे मूल्य सुमारे ३७.३ लाख डॉलर आहे. पोर्शेसोबतची भागीदारी केवळ पारंपरिक आयटी सेवा देण्यापुरती मर्यादित राहणार नसून तिच्या केंद्रस्थानी औद्योगिक पातळीवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर असेल. विप्रोनेही सिंगापूरस्थित अन्न आणि कृषी क्षेत्रातील ओलम समूहासोबत बहुवर्षीय डिजिटल परिवर्तन करार केला असून त्याचे अंदाजित मूल्य एक अब्ज डॉलर आहे. त्याचवेळी ओलमची आयटी उपकंपनी माईंडस्प्रिंटचे ३७.५ कोटी डॉलरमध्ये अधिग्रहण केले.
या बदलामागील प्रमुख प्रेरणा अर्थातच कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. तिच्या परिणामांची व्याप्ती किती असेल, याबाबत जगातील तंत्रज्ञान क्षेत्रात एकमत नाही. एलन मस्क यांच्या मते पुढील पाच वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्तेची क्षमता मानवी क्षमतेच्याही पुढे जाऊ शकते. बिल गेट्स यांच्या मते कृत्रिम बुद्धिमत्ता आजवरचे सर्वांत मोठे समताकारी साधन ठरू शकते किंवा अन्यायाचा सर्वांत मोठा स्रोतही बनू शकते. एनव्हिडियाचे जेन्सन हुआंग म्हणतात, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे काही रोजगार नष्ट झाले, तरी त्यापेक्षा अधिक नवे रोजगार निर्माण होतील. इतिहासकार युवाल नोआ हरारी विचारतात की, मानवी संस्थांवरील विश्वास अल्गोरिदमकडे किती वेगाने हस्तांतरित होत आहे?
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या मते हा केवळ आणखी एक तांत्रिक बदल नसून मूलभूत आणि सभ्यतागत परिवर्तन आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यमान कामे अधिक कार्यक्षम करेलच; परंतु आज अस्तित्वात नसलेली नवी मागणीही निर्माण करेल. या आशावादाबरोबर रोजगाराचे अवघड गणित येते. जूनमधील टीसीएसच्या वार्षिक सभेत चंद्रशेखरन यांनी आगामी काही वर्षांत कंपनीकडे मानवी कर्मचाऱ्यांच्या जवळपास बरोबरीने कृत्रिम बुद्धिमत्ता एजंट असू शकतात, असे सांगितल होतेे. कारण, भारतीय आयटी उद्योगाची पारंपरिक ताकद मोठ्या प्रमाणातील मनुष्यबळ होती. सॉफ्टवेअर लेखन, चाचणी, ग्राहक सहाय्य, माहिती विलेषण आणि नियमित प्रशासकीय कामांचा मोठा भाग कृत्रिम बुद्धिमत्ता करू लागली, तर विशेषतः प्रारंभिक स्तरावरील भरतीचे स्वरूप बदलणार हे उघड आहे. २०२६-२७ च्या एप्रिल-जून तिमाहीत टीसीएसच्या कर्मचारी संख्येत निव्वळ ९,२७९ची वाढ झाली. एकूण कर्मचारी संख्या ५,९३,७९८वर पोहोचली. सध्यातरी मनुष्यबळ आणि एआय संबंध 'एकाच्या जागी दुसरा’ एवढा सरळ नाही.
स्वस्त आणि कुशल मनुष्यबळाच्या जोरावर भारताने जागतिक आऊटसोर्सिंगमध्ये मिळवलेले स्थान कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात आपोआप टिकणार नाही. तासांच्या हिशेबाने अभियंते पुरविण्याच्या व्यवसायापासून ग्राहकाच्या उद्योगाचे तंत्रज्ञानच बदलून टाकणाऱ्या भागीदारापर्यंत भारतीय कंपन्यांना प्रवास करावा लागेल. पोर्शे-टीसीएस आणि ओलम-विप्रो व्यवहारांचे महत्त्व त्यामुळे त्यांच्या अब्जावधी डॉलरच्या आकारात नाही, तर ते आयटी व्यवसायाच्या बदलत्या दिशेची सूचना देतात. कृत्रिम बुद्धिमत्ता भारतीय आयटी उद्योगासाठी रोजगारांचे संकट ठरणार की नव्या मूल्यनिर्मितीची संधी, याचे उत्तर तंत्रज्ञान स्वतः देणार नाही. ज्या कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्तेला केवळ खर्च कमी करण्याचे साधन न मानता नव्या व्यवसायाची पायाभरणी मानतील, त्यांच्याच हातात पुढील दशकातील आयटी उद्योगाचे नेतृत्व राहण्याची शक्यता अधिक आहे.