Nitin Nabin: भाजपमध्ये ‌‘नवीन‌’ युगाची सुरुवात Pudhari Photo
संपादकीय

Nitin Nabin: भाजपमध्ये ‌‘नवीन‌’ युगाची सुरुवात

भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वात नितीन नवीन यांच्या निवडीने पक्षात पिढीबदलाचा स्पष्ट संकेत दिला आहे

पुढारी वृत्तसेवा
प्रशांत वाघाये

भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वात नितीन नवीन यांच्या निवडीने पक्षात पिढीबदलाचा स्पष्ट संकेत दिला आहे. संघटनात्मक अनुभव, संघनिष्ठ पार्श्वभूमी आणि आधुनिक राजकीय रणनीती यांचा समन्वय साधत भाजप आगामी दशकासाठी तयारी करत असल्याचे या निर्णयातून दिसते. अध्यक्षपद ही नवीन यांच्यासाठी सन्मानासोबतच कठोर राजकीय कसोटी ठरणार आहे.

नितीन नवीन हे मंगळवारी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. ते भाजपचे बिहारमधील नेते. पक्षाने त्यांना आधी कार्यकारी अध्यक्ष आणि त्यानंतर निवडणूक प्रक्रियेतून राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्त करणे हा पक्षाच्या संघटनात्मक धोरणातील एक महत्त्वाचा निर्णय आहे; मात्र हा बदल अचानक झालेला नसून टप्प्याटप्प्याने नेतृत्व तयार करण्याच्या भाजपच्या प्रस्थापित पद्धतीशी सुसंगत आहे. अर्थात, धक्कातंत्र म्हणावे अशी नितीन नवीन यांची निवड आहे. कारण, राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, मनोहर लाल खट्टर अशा अनेक बड्या नावांची चर्चा होती; मात्र भाजपने कुठेही चर्चेत नसलेले नितीन नवीन यांना आधी कार्याध्यक्ष नेमले आणि मंगळवारी त्यांना पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून निवडले गेले. याआधी जे. पी. नड्डा यांनाही अशाच पद्धतीने सुरुवातीला कार्याध्यक्ष आणि नंतर राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले होते. त्यामुळे नितीन नवीन यांची निवड ही प्रयोगात्मक नव्हे, तर विविध बाजू हेरून केलेली नेतृत्व निवड असल्याचे स्पष्ट होते.

भाजपच्या संघटनात्मक परंपरेत राष्ट्रीय अध्यक्षपद नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. आजवर अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कुशाभाऊ ठाकरे, बंगारू लक्ष्मण, जन कृष्णमूर्ती, व्यंकय्या नायडू, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अमित शहा, जगत प्रकाश नड्डा यांनी आतापर्यंत भाजपचे अध्यक्षपद भूषविले आहे. या परंपरेत आता नितीन नवीन यांचे नाव जोडले गेले आहे.

भाजपने नितीन नवीन यांच्या हाती पक्षाची धुरा देण्याच्या निर्णयातून जुनी आणि नवी पिढी यांच्यातील सांगड अधिक ठळकपणे अधोरेखित केली आहे. नितीन नवीन हे वयाने तरुण असले, तरी त्यांच्याकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता युवा मोर्चा, बिहार राज्य सरकार आणि राष्ट्रीय पातळीवरील संघटनात्मक जबाबदाऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे ते केवळ तरुण चेहरा नसून अनुभवी नेतृत्व म्हणून पुढे येतात. नितीन नवीन यांच्या नेतृत्वातून नवीन युग ही संकल्पना केवळ व्यक्तीबदलापुरती मर्यादित राहत नाही. भाजप नेतृत्वाच्या वयोगटात बदल करत असतानाच संघटनात्मक शिस्त, अनुभव आणि वैचारिक सातत्य कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, असे दिसते. नेतृत्व अधिक तरुण करणे, निवडणूक व्यवस्थापनात आधुनिकता वाढवणे आणि पुढील काही दशकांचा विचार करून पक्षाची मांडणी करणे या व्यापक राजकीय रणनीतीचा हा भाग असल्याचे राजकीय निरीक्षक मानतात.

आजचे राजकारण हे वैचारिक संघर्षाचे आहेच शिवाय बूथ पातळीवरील संघटन, आधुनिक प्रचार यंत्रणा, माहितीचे विश्लेषण आणि प्रभावी संवाद हे घटकही निर्णायक ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर नितीन नवीन यांची छत्तीसगडमधील संघटनात्मक कामगिरी महत्त्वाची ठरते. काँग््रेास सरकारविरोधात संघटना उभी करून भाजपला सत्तेत आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. छत्तीसगड हे भाजपसाठी अवघड राज्य मानले जात असतानाही भाजपला मिळालेला विजय हे दाखवून देतो की, नितीन नवीन केवळ बिहारपुरते मर्यादित नेते नाहीत. यावरूनच भाजप आगामी निवडणुकांसाठी दीर्घकालीन तयारी करत असल्याचा संदेशही मिळतो.

देशभरात नव्या पिढीचा विशेषतः जेन-झीचा प्रभाव वाढत आहे. या पिढीसाठी नेतृत्वाचा चेहरा आक्रमकतेपेक्षा संवादकेंद्रित, प्रामाणिक आणि समकालीन असणे महत्त्वाचे ठरते. नितीन नवीन यांचे वय, कार्यशैली आणि संघनिष्ठ पार्श्वभूमी भाजपला नव्या मतदारांशी जोडण्यास मदत करू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांच्या निवडीतून एकनिष्ठता, सातत्य आणि संघटनात्मक कामगिरी या गुणांना प्राधान्य दिल्याचेही दिसते.

नूतन अध्यक्षांसमोर निवडणुकांचे आव्हान

राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर नितीन नवीन यांच्यासमोर असलेली खरी कसोटीही लगेच सुरू झाली आहे. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या दोन महत्त्वाच्या राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुका हे त्यांच्यासमोरचे प्रमुख आव्हान असणार आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग््रेास, तर तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघमच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपला संघटनात्मकदृष्ट्या मोठी उभारणी करावी लागणार आहे. त्यासोबतच या वर्षात आसाम, केरळ, पाँडिचेरी या राज्यांमध्येही विधानसभा निवडणुका होत आहेत. या सर्व निवडणुका नितीन नवीन यांच्यासाठी कठोर परीक्षेच्या ठरणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाची ही कसोटी ठरणार आहे.

अनुभवी नेतृत्वाचे मार्गदर्शन

सध्याच्या राजकीय परिस्थितीत केंद्रातील सरकार किमान 2029 पर्यंत स्थिर असल्याचे चित्र आहे. या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मावळते अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, माजी अध्यक्ष व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांसारख्या अनुभवी नेत्यांचे मार्गदर्शन नितीन नवीन यांना मिळणार आहे. वरिष्ठ नेत्यांकडून धोरणात्मक दिशा आणि स्थैर्य, तर नव्या अध्यक्षाकडून संघटनात्मक गती आणि नव्या पिढीशी संवाद असा समतोल साधण्याचा प्रयत्न या नेतृत्वबदलामागे असल्याचे मानले जाते.

एकूण पाहता नितीन नवीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड ही व्यक्तीपेक्षा प्रक्रियेवर विश्वास ठेवणाऱ्या भाजपच्या राजकारणाचे प्रतिबिंब आहे; मात्र नितीन नवीन यांच्यासाठी अध्यक्षपद ही केवळ सन्मानाची जबाबदारी नसून ती एक कठोर राजकीय परीक्षा आहे. जुनी अनुभवी फळी आणि नवीन नेतृत्वाची पिढी यांच्यातील समन्वय साधण्याचा भाजपचा हा प्रयत्न आगामी निवडणुकांत कितपत यशस्वी ठरतो, हे काळच ठरवेल. विरोधकांच्या ताब्यातील राज्यांतील निवडणुका, संघटनात्मक विस्तार आणि नव्या मतदारांशी नाते जोडणे या सर्व बाबींवरूनच नवीन युग ही संकल्पना प्रत्यक्षात कितपत प्रभावी ठरते, याचा निर्णय होणार आहे; मात्र नेतृत्वबदल करताना अनुभवाचा आधार सोडला न जाता नव्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे, हे निश्चित!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT