कोकणची किनारपट्टी ही सह्याद्री ते अरबी समुद्र अशी साधारणत: 50ते 60 किलोमीटर रुंदीची आहे. या चिंचोळ्या पट्ट्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग आणि सागरी महामार्ग असे दोन महामार्ग सध्या अस्तित्वात आहेत; मात्र हे दोन्ही महामार्ग गेली 14 ते 20 वर्षे रखडलेले असल्याने एकाही महामार्गाचा योग्य उपयोग कोकणवासीयांना होत नाही, असे असताना आणखी एका सुपरफास्ट महामार्गाची घोषणा राज्य सरकारने केली आहे. दोन महामार्ग पूर्ण होत नाहीत, अशी स्थिती असताना तिसरा महामार्ग आणि त्यासाठीचे भूमी संपादन सुरू झाले आहे.
कोकणात चार तासांत पोहोचता येईल, असा हा सुपरफास्ट महामार्ग समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर केला जाईल, असे रस्ते विकास महामंडळाकडून सांगितले जात आहे. या महामार्गाची अधिकृत घोषणा नुकत्याच झालेल्या रत्नागिरी दौर्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. खरे तर कुठलाही महामार्ग होत असेल तर, त्याचे स्वागत सर्वांनी करावे, असे म्हणणार्यांपैकी आम्ही आहोत, परंतु चिंचोळ्या कोकण किनारपट्टीला या तीन महामार्गाची खरेच गरज आहे का, असा प्रश्न कोकणात सार्वत्रिकपणे विचारला जाऊ लागला आहे. एका बाजूला कोकणातील विविध विकास प्रकल्पातील होत असलेले भूमिसंपादन यामुळे 30 टक्के कृषिक्षेत्र घटले आहे. यात या नव्या महामार्गामुळे आणखी भूमिसंपादन होऊ घातले आहे.
हा महामार्ग मुंबई-गोवा महामार्ग आणि सागरी महामार्ग यांच्या मधल्या टप्प्यात होणार असल्याने मोठ्या प्रमाणात कृषी लागवडीची जमीन संपादित होणार आहे. त्यामुळे शेतकरी याला विरोध करताना दिसत आहेत; पण हा विरोध लक्षात न घेता रस्ते विकास महामंडळाने या महामार्गाची आखणी केली आहे. या हायस्पीड महामार्गावर 41 बोगदे, 51 मोठे ब-ीज आणि 68 ओव्हर पास यासाठी 68 हजार 720 कोटी खर्च येणार आहे. हा ग्रीन फिल्ड महामार्ग घोषित करताना अगोदरच्या दोन महामार्गांच्या रखडलेल्या दुखण्यावर उपाय काय, हे मात्र कुणीच सांगत नाही. एका बाजूला मुंबई-गोवा महामार्ग, दुसर्या बाजूला सागरी महामार्ग, तिसर्या बाजूला ग्रीन फिल्ड महामार्ग आणि चौथ्या बाजूला शक्तिपीठ महामार्ग अशा एक ना अनेक महामार्गांची घोषणा एका मागोमाग एक होत आहे आणि त्याला जोडून मुंबई ते मालवण जलमार्ग वाहतूक, विमान वाहतूक असेही पर्याय खुले ठेवले आहेत. एकूण प्रवाशांची चंगळ असलेल्या या असंख्य पर्यायांपैकी आज एकही परिपूर्ण पर्याय कोकणला उपलब्ध झालेला नाही. विमानसेवा बेभरवशी आहे. चिपी विमानतळावर अपवादानेच विमाने उतरतात. मुंबई-मालवण रो-रो सेवा जाहीर झाली; पण अद्याप त्याची चाचणीही व्हायची आहे.
मुंबई-गोवा महामार्ग 14 वर्षे तर सागरी महामार्ग सुमारे 25 वर्षे रखडला आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या नागोठणे ते रत्नागिरी दरम्यानच्या जवळपास 250 किमीचा महामार्ग हा रखडला आहे. सागरी महामार्गावरील रेवस, आगरदांडा, बाणकोट, दाभोळे, जयगड या सागरी पुलांचे काम सुरूच झालेले नाही. असे असताना नवा ग्रीन फिल्ड महामार्ग जाहीर झाला आहे. कोकणच्या गेम चेंजर महामार्गाची घोषणा करत असताना रखडलेल्या महामार्गांचा वनवास कधी संपणार, हे कोणीच सांगायला तयार नाही. त्यामुळे कोकणवासीयांना नवी स्वप्न दाखवण्यापेक्षा पूर्वीची स्वप्ने पूर्ण करू, असा आग्रह धरला आहे. नव्या महामार्गाचे भूमिसंपादन कोकणवासीयांना तरी परवडणारे नाही हे नक्की.