Indian Navy | "नौदल" सामर्थ्याला नवी बळकटी (Pudhari File Photo)
संपादकीय

Indian Navy | "नौदल" सामर्थ्याला नवी बळकटी

भारतीय नौदल ताफ्यात अलीकडेच दाखल झालेले आयएनएस अँड्रोथ हे जहाज पाण्याखालील धोक्यांचा शोध घेऊन ते नष्ट करण्यासाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, सेन्सर आणि कम्युनिकेशन तंत्रज्ञानाने सज्ज आहे.

पुढारी वृत्तसेवा

भारतीय नौदल ताफ्यात अलीकडेच दाखल झालेले आयएनएस अँड्रोथ हे जहाज पाण्याखालील धोक्यांचा शोध घेऊन ते नष्ट करण्यासाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, सेन्सर आणि कम्युनिकेशन तंत्रज्ञानाने सज्ज आहे. उथळ पाण्यात टिकून राहण्याची क्षमता आणि तंत्रज्ञान सुसज्ज यंत्रणा यामुळे दीर्घकालीन ऑपरेशन्स लीलया पार पाडणे यामुळे नौदलाला शक्य होईल.

बिगेडियर हेमंत महाजन

भारतीय नौदलाने अलीकडेच ‌‘आयएनएस अँड्रोथ‌’ हे दुसरे अँटिसबमरीन वॉरफेयर शैलो वॉटरक्राफ्ट आपल्या सेवेत समाविष्ट केले. विशाखापट्टणम येथील नेव्हल डॉकयार्डमध्ये कार्यक्रम झाला. ‌‘आयएनएस अँड्रोथ‌’ हे जहाज भारतीय नौदल सामर्थ्याच्या दृष्टिकोनातून ‌‘आत्मनिर्भर भारत‌’ या संकल्पाचे उत्तम उदाहरण आहे. कारण, या जहाजातील 80 टक्के भाग स्वदेशी आहेत. ‌‘गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स म्हणजेच ‌‘जीआरएसई‌’ तयार करीत असलेल्या अशा आठ पाणबुडीरोधी युद्धनौकांच्या मालिकेतील ही दुसरी युद्धनौका आहे. युद्धनौका बांधणीबाबत संरक्षण मंत्रालय आणि ‌‘जीआरएसई‌’ यांच्यात एप्रिल 2019 मध्ये करार झाला होता. भारतीय नौदलाने ‌‘जीआरएसई‌’ आणि ‌‘कोची शिपयार्ड लिमिटेड‌’ यांच्याकडे अशा 16 युद्धनौकांची मागणी नोंदवली आहे.

आयएनएस अँड्रोथ 77 मीटर लांबीचे असून, सुमारे 1500 टन वजनाचे आहे. हे किनारी व उथळ पाण्यामध्ये अँटिसबमरीन ऑपरेशन्ससाठी डिझाईन केले आहे. हे जहाज पाण्याखालील धोक्यांचा शोध घेऊन ते नष्ट करण्यासाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, सेन्सर आणि कम्युनिकेशन तंत्रज्ञानाने सज्ज आहे. या जहाजाची उथळ पाण्यात स्थिरपणाने टिकून राहण्याची क्षमता आणि तंत्रज्ञान सुसज्ज यंत्रणा यामुळे दीर्घकालीन ऑपरेशन्स लीलया पार पाडता येणे नौदलाला शक्य होणार आहे. या जहाजाला तीन वॉटरजेट प्रॉपल्शन सिस्टम्स आहेत आणि त्या समुद्री डिझेल इंजिन्सद्वारे चालतात. त्यामुळे ‌‘आयएनएस अँड्रोथ‌’ अत्यंत जलद आणि मोनोरेच्युल आहे. हे जहाज अँटिसबमरीन युद्धाबरोबरच समुद्री निरीक्षण, शोध व बचाव कार्य, किनारी संरक्षण मोहिमा, तसेच कमी तीवतेच्या सागरी ऑपरेशन्समध्ये कार्यक्षम भूमिका बजावू शकेल. या जहाजाचे नाव लक्षद्वीप बेटावरून ठेवले असून हे बेट ऐतिहासिक आणि सामरिक महत्त्व असलेले मानले जाते. पूर्वीदेखील ‌‘आईएनएस अँड्रोथ‌’ नावाचे जहाज नौसेनेत होते. त्या जहाजाने 27 वर्षे सेवा दिली. आता नवीन अँड्रोथ त्याची परंपरा पुढे चालवेल.

‌‘अँड्रोथ‌’च्या शस्त्रसज्जतेमध्ये 30 मि.मी. गन आणि दोन 12.7 मि.मी. रिमोट कंट्रोल मशिन गन्स आहेत. तसेच यात उथळ पाण्यातील पाणबुड्या शोधणारे सोनार सिस्टम, डेप्थ चार्जस्‌‍, टॉरपेडोस अशा अत्याधुनिक उपकरणांचा समावेश आहे. जीआरएसई कोलकाता येथे या जहाजाचे बांधकाम झाले असून, यामध्ये 80 टक्के स्वदेशी घटकांचा समावेश आहे. हे भारताच्या ‌‘आत्मनिर्भरता‌’ धोरणाशी संलग्न आहे. यातील अँटिसबमरीन डिफेन्स सूटस्‌‍ महिंद्रा डिफेन्स सिस्टीम्सच्या सहकार्याने विकसित केले आहेत. ही सिस्टीम्स पाण्याखालील धोक्यांचा शोध घेणे आणि संरक्षण निश्चित करण्याचे कार्य करतात.

भारताच्या विस्तीर्ण सागरी किनाऱ्यामुळे आणि भौगोलिक स्थानामुळे समुद्री सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. चीनच्या अण्वस्त्रसज्ज पाणबुड्यांच्या उपस्थितीमुळे भारतीय महासागरात वाढती सुरक्षा आव्हाने निर्माण होत आहेत. परदेशी शक्तींच्या प्रगत पाणबुडी तंत्रज्ञानामुळे उथळ पाण्यांमधील आणि किनारी भागातील सुरक्षा सुनिश्चित करणे आवश्यक बनले आहे. ‌‘आईएनएस अँड्रोथ‌’ या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरते.

हे जहाज भारतीय नौसेनेच्या स्वदेशीकरणाच्या मोहिमेत आणखी एक यशस्वी पाऊल आहे. या जहाजांच्या निर्मितीमुळे नौदल तंत्रज्ञान आणि घरगुती उद्योगाला चालना मिळते. आठ जहाजांच्या एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी मालिकेत ‌‘आईएनएस अर्नाळा‌’ हे पहिले जहाज असून ‌‘आयएनएस अँड्रोथ‌’ दुसरे आहे. यामुळे भारताच्या लिटोरल ऑपरेशन्सची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आजघडीला 100 पेक्षा अधिक सक्रिय युद्धपोत भारतीय नौसेनेत आहेत. यामध्ये अलीकडेच आयएनएस नीलगिरी, आयएनएस सुरत, आईएनएस वाग्शीर, आईएनएस उदयगिरी, आईएनएस हिमगिरी, आईएनएस तमाल, आईएनएस निस्तार या जहाजांचा समावेश झाला. यामुळे भारताचे समुद्री सामर्थ्य आणि रक्षक क्षमता उच्च पातळीवर पोहोचली आहे. ‌‘आईएनएस अँड्रोथ‌’ हे जहाज केवळ शत्रूच्या पाणबुड्यांपासून निर्माण होणाऱ्या धोक्यांना तोंड देण्यासाठीच नाही, तर स्वदेशी संशोधन, तंत्रज्ञान आणि नवकल्पना यांचे आदर्श उदाहरण आहे. भारतीय नौसैनिक इतिहासात ही एक गौरवाची घटना असून, ‌‘आईएनएस अँड्रोथ‌’ देशाच्या समुद्री सुरक्षा व सामरिक क्षमतांचे प्रतीक ठरले आहे.

भारतीय नौदलाला आधुनिक सामरिक परिस्थितीत जलद आणि प्रभावी प्रतिसादाची क्षमता आवश्यक आहे. समुद्रातील धोके आता फक्त मोठ्या युद्ध जहाजांपुरते मर्यादित नाहीत, तर शत्रूच्या लघू, वेगवान आणि अचूक पाण्याखालील उपग््राहांनी निर्माण केलेले धोकेही खूप गंभीर आहेत. अँड्रोथसारखी अँटिसबमरीन शॅलो वॉटर क्राफ्ट जहाजे या धोक्यांचा तातडीने शोध घेऊन त्यावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम आहेत. किनारी आणि उथळ पाण्यांमध्ये, जिथे मोठ्या युद्ध जहाजांची हालचाल मर्यादित असते. विशेष कार्यक्षमतेमुळे ही जहाजे पथदर्शक ठरतात. ही जहाजे समुद्री निरीक्षण, शोध आणि बचाव कार्ये, तसेच तटीय संरक्षण मोहिमा पार पाडण्यासाठीही महत्त्वाची ठरतात. ‌

‘मेक इन इंडिया‌’ उपक्रम केवळ भारताच्या सशस्त्र दलांच्या क्षमता वाढवत नसून आर्थिक प्रगतीसाठी नवीन मार्गदेखील उघडत आहे. आजघडीला देशात सुमारे 1.5 ट्रिलियन रुपये किमतीची 60 मोठी नौदलाची जहाजे बांधली जात आहेत. यामुळे 14,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतात. जहाज बांधणीत गुंतवलेल्या प्रत्येक रुपयाचा आर्थिक परिणाम जवळजवळ दुप्पट होतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. बहुतेक जहाजांचे सुटे भाग देशांतर्गत सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांकडून (एमएसएमई) मिळवले जातात. त्यामुळे रोजगारनिर्मितीसह जीडीपीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या या क्षेत्रालाही संरक्षण क्षेत्राच्या स्वदेशीकरणामुळे चालना मिळत आहे.

गेल्या दशकात नौदलाच्या ताफ्यात 33 जहाजे आणि सात पाणबुड्या दाखल झाल्या. यातील आयएनएस विक्रांत विमानवाहू आणि आयएनएस अरिहंत आणि आयएनएस अरिघाटसारख्या आण्विक पाणबुड्यांची निर्मिती भारतीय शिपयार्डमध्ये झाली आहे. 21 व्या शतकातील बदलत्या आणि वाढत्या आव्हानांच्या दृष्टीने भारतीय सैन्याचे आधुनिकीकरण करण्याचे भारताचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT