राज वर्तक
अजित पवार यांच्या निधनानंतर रंगलेली राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा राजकीय वास्तवामुळे फोल ठरली. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र अस्तित्वाचा निर्णय पक्का झाला, तर शरद पवारांच्या प्रतिक्रियेतून विलीनीकरणाचा अध्याय बंद झाल्याचे स्पष्ट झाले.
अजितदादा पवार यांच्या आकस्मिक अपघाती निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होणे स्वाभाविकच होते. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी ही त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही जाणवत राहणार आहे. त्यामुळेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाची उलटसुलट चर्चा सध्या सुरू आहे. पण, दादांच्या निधनानंतर झालेल्या घडामोडींनी आता ही विलीनीकरणाची शक्यता म्हणजे वावडीच ठरणार आहे आणि त्यावरील उलटसुलट चर्चा कलगीतुर्याची चावडी ठरणार आहे.
दादा अकाली गेले आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. जयंत पाटील यांनी या चर्चेला तोंड फोडले. या पक्षाचे दुसरे नेते शशिकांत शिंदे यांनीही त्याला दुजोरा दिला. महापालिका निवडणुकीवेळी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही पक्ष एकत्र आले होते. त्यावेळी विलीनीकरणासंबंधी अजित पवार यांच्याशी चारवेळा अनुकूल चर्चा झाली होती आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर यावर अंतिम निर्णय घेऊ, असे अजितदादांनी म्हटले होते, अशी माहिती या दोघांनीही उघड केली आहे.
स्वर्गीय अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकट संबंध होते आणि विलीनीकरणासारखी महत्त्वाची बाब अजितदादांनी निश्चितपणाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कानावर घातलीच असती. असा निर्णय घेताना त्यांनी फडणवीस यांना विश्वासात घेतले असते. किंबहुना साधी चर्चा जरी झाली असती तरी अजितदादांनी त्याची कल्पना फडणवीस यांना दिलीच असती. (दुसरे म्हणजे अशा हालचाली फारशा गुप्त राहातच नाहीत.) तथापि, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण होण्यासंबंधी चर्चा झालेली नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणे जाहीरच केले. त्यामुळे जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांचे म्हणणे कितपत विश्वासार्ह, हे लक्षात येतेच. अर्थात त्यांच्यामागे बोलविणारा धनी कोण हे सांगायला नकोच.
राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली होती आणि त्यावेळी आरोप-प्रत्यारोपांचा गदारोळ उडाला होता. नंतर विधानसभेवेळी अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने युगेंद्र पवार या त्यांच्या चुलत बंधूंना उभे केले होते. तेव्हाही आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला होता.
सुनेत्रा पवार यांच्या मनातून हा सल निघून गेला असेल, असे म्हणता येणार नाही. त्यामुळेच अजित पवार यांच्यानंतर पुन्हा जुन्या बंधनात सहभागी व्हायचे काय, याबाबत विचार करता त्यांनी स्वतंत्र राहण्याचाच निर्णय घेतला असणार आणि त्यात काही अस्वाभाविक म्हणता येणार नाही. विलीनीकरण करून काही नवीन साध्य होणार नाही, हाही मुद्दा त्यांनी लक्षात घेतला असणार आणि त्यातून त्यांनी स्वतःच विलीनीकरण न करता पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याचा निर्णय घेतला असणार, यात शंका नाही. अर्थात मग या पक्षाच्या नेतृत्वाची धुरा त्यांच्याकडेच येणार, हेही स्वाभाविकच होते. त्यांच्या या निर्णयाचे संकेत मिळताच वेगाने हालचाली झाल्या आणि त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्याची तयारी झाली. त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आणि लगेच उपमुख्यमंत्रिपदी त्यांचा शपथविधीही झाला.
उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे आल्याची आपल्याला कसलीही कल्पना नाही, ही या सध्या घडामोडीवरील खा. शरद पवार यांची प्रतिक्रिया. ती पुरेशी बोलकी आहे. एक प्रकारे आपली नाराजीच त्यांनी प्रकट केली, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. विलीनीकरणाचे स्वप्न पाहणार्यांनी आणि त्यातून आपल्या हाती सत्ता येण्याची आशा बाळगणार्यांची निराशा झाली. अर्थात, सुनेत्रा पवार यांनी ठामपणे निर्णय घेतला आणि पक्षाचे अस्तित्व स्वतंत्र राखले, अशीच या घटनेची नोंद घेतली जाईल.
पवारांची मुरब्बी प्रतिक्रिया
विलीनीकरणापेक्षा अजित पवार यांच्या निधनाने जे संकट निर्माण झाले, त्या संकटातून मार्ग काढणे हे आता महत्त्वाचे आहे. जयंत पाटील आणि अजित पवार काही विषयावर चर्चा करीत होते. यापेक्षा विलीनीकरण या विषयात अधिक काही नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी या सार्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या वक्तव्यातून विलीनीकरणावर पडदा पडला असे म्हणता येईल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवर यांना संधी मिळाली, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. मुरब्बी राजकारण्यांची ही प्रतिक्रिया म्हटली पाहिजे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलीनीकरण झाले असते तर आपल्याला अपेक्षित महत्त्व मिळेल की नाही, याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) काही धुरीण नेत्यांना शंका आली असावी. ही शंका अस्थानी मानता येणार नाही. शेवटी राजकीय नेते आपली सोय आणि सुरक्षितता पाहतात आणि भवितव्याचाही विचार करतात. दोन्ही पक्षांचे विलीनीकरण झाले तर पुन्हा शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या हाताखाली काम करावे लागेल आणि आपल्याला ‘मम्’ म्हणण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी या ज्येष्ठ नेत्यांची धारणा झाली असेल तर त्यात त्यांच्या द़ृष्टीने काही चुकीचे आहे, असे म्हणता येणार नाही. दोन्ही पक्ष एकत्र आले, तर सध्या जी सत्ता आहे, त्याचे काय होणार, असा प्रश्न सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री, आमदार यांनी केला असेल तर तेही स्वाभाविकच म्हटले पाहिजे. आता अजितदादा नसल्याने भरवसा कोणाचा, हा कळीचा प्रश्न निर्माण झाल्यानेच सत्तेत असलेल्यांनी आपल्या सवत्या सुभ्याकडेच कल दर्शविला असेल, तर ते मानवी बुद्धीला अनुसरूनच झाले, असे म्हटले पाहिजे.
या सार्या घडामोडी लक्षात घेतल्या तर त्यांचा परिणाम सत्तारूढ महायुती आणि सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेसवर त्याचे काही परिणाम होतील, अशी शक्यता नाही. राष्ट्रवादी काँग्रेसवर (शरद पवार) त्याचे काही परिणाम होतील आणि पक्षाच्या अस्तित्वासाठी या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. या पक्षाचे लोकसभेत आठ खासदार आहेत, ही त्यांची जमेची बाजू. या शिदोरीवर त्यांना वाटचाल करावी लागेल. महत्त्वाचे म्हणजे विलीनीकरणाची शक्यता नजीकच्या काळात तरी संपुष्टातच आली आहे असे म्हटले पाहिजे आणि सध्या तरी ती वावडीच ठरली आहे.