आदिशक्तीची आराधना  
संपादकीय

आदिशक्तीची आराधना

पुढारी वृत्तसेवा

अनिल दिवसे

नवरात्र हे केवळ नऊ रात्रींचे धार्मिक पर्व नाही; ते मातीपासून मनापर्यंत जीवनाला जोडणारे सांस्कृतिक पर्व आहे.

भारतीय संस्कृती परंपरेत आदिशक्तीला मोठे स्थान आहे. आदिशक्तीने समाजविघातक आसुरी शक्तींचा नाश केला. त्याच विजयाचा आनंदोत्सव म्हणून देशभरात नवरात्रौत्‍सव साजरा केला जातो. नवरात्राविषयी अशीही आख्यायिका आहे की, महिषासुर नावाचा दानव सर्वांना त्रास देत असे. त्याच्या त्रासाने देवही हैराण झाले. अखेर सर्व देवांनी मिळून ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याकडे जाऊन व्यथा मांडली. तिघांनी मिळून आपापल्या शक्तीद्वारे आदिशक्ती देवी निर्माण केली. देवीने महिषासुर दानवाचा आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस युद्ध करून पराभव केला व सर्वांची महिषासुर दानवाच्या त्रासापासून सुटका केली.

भारतात विविध देवतांच्या रूपात आदिशक्तीची पूजा केली जाते. भाषा, प्रांत जरी वेगवेगळे असले तरी प्रत्येकाचा भाव मात्र एकच असतो. गुजरातमध्ये अंबिकेच्या रूपात पूजा केली जाते. या काळात गुजरातमध्ये गरबा आणि दांडिया नृत्य महत्त्वपूर्ण मानले जाते. बंगालमध्ये दुर्गेला महामाया असेही म्हटले जाते. बंगालमध्ये नवरात्रौत्‍सव इतर राज्याच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. जसे महाराष्ट्रात गणेशोत्सव भव्य स्वरूपात दिसतो तसाचे बंगालमध्ये नवरात्र उत्सव भव्य असतो. उत्तर भारतात देवीची चामुंडीच्या रूपात पूजा केली जाते. देवीच्या उत्सवात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचे विशेष महत्त्व आहे. यामध्ये कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका, वणीची सप्तशृंगी येथेही आदिशक्तीचा नवरात्रौत्‍सव मोठ्या पातळीवर साजरा केला जातो. घरात घटस्थापना करून या उत्सवाची मांगल्यमय सुरुवात होते. या सणाचे महत्त्व कृषिक वर्गासाठीही मोठे असते. बळीराजाची या उत्सवाकडे बघण्याची दृष्टी, श्रद्धा लक्षवेधी आहे. घटस्थापना करताना आपण जे धान्य पेरतो, त्याचे नऊ दिवसांत चांगल्या अंकुरात रूपांतर होते. वर्षभर घाम गाळून पीक जोमाने येण्यासाठी फार कष्ट घेतलेले असतात. घरात स्थापन केलेल्या घटातील धान्याला चांगले अंकुर आले, तर यावर्षी पीक चांगले येणार, अशी बळीराजाची गाढ श्रद्धा असते. स्वामी विवेकानंद व त्यांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांनी देखील आदिशक्तीच्या साधनेत आनंद मानला. नवरात्रीमध्ये आदिशक्तीसमोर नऊ दिवस तेवत राहणारा दीप मानवाच्या जीवनातील अंधकार दूर करणारा प्रतीक मानला जातो. प्रत्येकाचा उत्सवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा. कुणाला पूजा व्रत करण्यात आनंद तर कुणाला या निमित्ताने गरबा, दांडिया खेळण्याचा आनंद. गणेशोत्सवाप्रमाणे अनेक तरुण मंडळे दुर्गादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. कुठे भजन, कीर्तन, जागर, आरती या निमित्ताने एकत्र येऊन विचारांची देवाण-घेवाण होत असते. देशभरातून साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात आदिशक्तीची पूजा-उपासना केली जाते. त्याचबरोबर या उत्सवाच्या माध्यमातून विविधतेत एकतेचे दर्शन, लोकसंस्कृती, पूजा, परंपरा टिकवण्याबरोबर समाजविघातक शक्तींचा नाश करण्यासाठी ऊर्जा, प्रेरणा मिळते. अशा अनेक दृष्टींनी नवरात्रौत्सवाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

नवरात्रौत्सवाचा खरा संदेश केवळ देवीची पूजा करण्यापुरता मर्यादित नाही, तर स्त्रीशक्तीचा सन्मान, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याची प्रेरणा देणाराही आहे. आजच्या काळात महिलांनी शिक्षण, विज्ञान, कला, क्रीडा, उद्योग अशा विविध क्षेत्रांत केलेली प्रगती ही आदिशक्तीच्या सामर्थ्याचे आधुनिक रूपच म्हणता येईल. स्त्रीचा आदर करणे, तिच्या स्वातंत्र्याचा सन्मान राखणे आणि तिला समान संधी उपलब्ध करून देणे, हीच देवीच्या आराधनेची खरी फलश्रुती ठरावी. नऊ दिवसांच्या उत्सवात स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, गरजूंची मदत आणि सामाजिक सलोखा यांसारख्या उपक्रमांनाही महत्त्व दिले पाहिजे. उत्सव साजरा करताना ध्वनिप्रदूषण टाळणे, पर्यावरणपूरक सजावट करणे आणि सार्वजनिक ठिकाणी शिस्त पाळणे, हीदेखील सामूहिक जबाबदारी आहे. भक्तीला सामाजिक जाणिवेची जोड मिळाली, तर नवरात्रौत्सव केवळ परंपरेचे पालन न राहता समाजाला अधिक संवेदनशील, समताधिष्ठित आणि सशक्त बनवणारी चळवळ ठरू शकतो. देवीसमोर लावलेला दीप आपल्या मनातही विवेक, करुणा आणि माणुसकीचा प्रकाश जागवो, हीच या मंगल पर्वानिमित्त अपेक्षा!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT