रंगीबेरंगी नवरात्र!  (Pudhari File Photo)
संपादकीय

Navratri colours 2025 | रंगीबेरंगी नवरात्र!

मित्रा, घटस्थापना झाल्यापासून म्हणजेच पहिल्या माळेपासून बाजारामध्ये दररोज वेगळ्या रंगांच्या साड्या किंवा ड्रेस घालून महिलावर्ग मिरवताना दिसत आहे.

पुढारी वृत्तसेवा

मित्रा, घटस्थापना झाल्यापासून म्हणजेच पहिल्या माळेपासून बाजारामध्ये दररोज वेगळ्या रंगांच्या साड्या किंवा ड्रेस घालून महिलावर्ग मिरवताना दिसत आहे. मला एक सांग, नवरात्राच्या कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी वापरायची, याविषयी पुराणात काही लिहिलेले आहे काय?

अजिबात नाही. कोणत्याही पुरातन ग्रंथामध्ये असा कोणताही उल्लेख नाही. गेल्या दहा-पंधरा वर्षांत हे काहीतरी, कुठून तरी आले आणि प्रसरण पावलेले म्हणजेच व्हायरल झालेले आहे.

तसं नाही, ज्या दिवशी जो रंग असेल तो रंग सगळीकडे दिसला की, ओळखायचे की हाच रंग आजच्या दिवसाचा आहे. बसमध्ये जा, लोकलमध्ये जा, बँकेत , शाळेत किंवा मेट्रोमध्ये जा! ज्या दिवशी निळा रंग आहे त्या दिवशी संपूर्ण समाज निळ्या रंगात भरून गेल्यासारखा दिसतो. अर्थात, महिलांना त्यामुळे दररोज नवीन रंगाची झाडी नेसून मिरवण्याचा योग येतो, हेही महत्त्वाचे आहे.

दुर्गाउत्सव किंवा घटस्थापना ते दसरा हे शारदीय नवरात्र असते. हा खरे तर स्त्री शक्तीला वंदन करण्याचा उपक्रम आहे. आपल्या पुराणांमध्ये आणि इतिहासामध्ये स्त्रियांचा मोठाच सन्मान केलेला आहे. या रंगीबेरंगी साड्यांच्या निमित्ताने बाकी कुणी असो की नसो; परंतु महिलावर्ग या काळात अत्यंत उत्साहात असतो, हेही महत्त्वाचे आहे.

आणखी एक अशीच गंमत परवा झाली. विषय असा आहे की, दसर्‍याच्या दिवशी रामाने रावणाचा वध केला किंवा पांडवांनी शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्रे खाली काढली आणि महाभारताला सुरुवात झाली. रामाने रावणाला मारले असेल; परंतु यामध्ये दसर्‍याच्या दिवशी गाड्या म्हणजेच मोटारसायकल, कार धुण्याचा काय विषय येतो, असा बिनतोड सवाल एकाने मला केला.

अरे, असे काही नसते. दसर्‍याच्या निमित्ताने सर्वत्र स्वच्छता होत असते. घरेदारे स्वच्छ केली जातात आणि रंग लावून उजळून टाकली जातात. स्वच्छता असेल, तर रोगराई दूर राहते म्हणून दसर्‍याला स्वच्छतेचे काम काढले जाते. तसेच गाडी स्वच्छ करण्याची प्रथा कधीतरी सुरू झाली असेल. ती काही मूळ दसर्‍याच्या कथेशी संबंधित नाही; परंतु दसर्‍याच्या निमित्ताने स्वच्छता होत असेल, तर काय हरकत आहे, असे माझे म्हणणे आहे. रोज रंगीबेरंगी साड्या घालायला मिळतात म्हणून महिलावर्गामध्ये येणारा उत्साह असो किंवा वॉशिंग सेंटरवर रांगा लावून गाड्या स्वच्छ करणे असो, दसर्‍याच्या निमित्ताने जसे घरदार, गाडी स्वच्छ होते, तसेच माणसांची मनेही स्वच्छ होतील, तर फार चांगले होईल, हे निश्चित!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT