नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन हे केवळ मुंबईचे किंवा नवी मुंबईचे किंवा महाराष्ट्राचे महा-उड्डाण नव्हे! ब्रिटनसारख्या राष्ट्राला मागे टाकून चौथ्या क्रमांकाचे अर्थसत्ताक बनलेल्या आणि लवकरच तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येणार्या भारताचेही हे महाउड्डाण म्हणावे लागते. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. दिवाळी झाली की, याच महिन्याच्या अखेरीस नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्याही टर्मिनल एकचे लोकार्पण म्हणा की, विश्वार्पण ते करतील. ही दोन्ही टोलेजंग, चार-चार टर्मिनल आणि दोन-दोन स्वतंत्र धावपट्ट्या असलेली विमानतळे सुरू केल्याने जगाचा हवाई नकाशा बदलेल.
प्रचंड लोकसंख्येच्या महानगरांत दोन आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेल्या मोजक्या महानगरांच्या क्लबमध्ये भारत जाऊन बसेल. आतापर्यंत ही स्थिती नव्हती. जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या टॉप 10 महानगरांत मुंबई येते. विमानतळ मात्र एकच! एकमेव विमानतळावरून धावू पाहणारे, झेपावू पाहणारे महानगर म्हणून मुंबईची तुलना दशकानुदशके ढाकासारख्या शहराशी होत आली. हा कलंक आता नवी मुंबई विमानतळाने पुसला आणि नोएडा विमानतळही तो उरलासुरला पुसून टाकणार. कारण, मुंबई आणि दिल्ली ही तशी जागतिक महानगरे. मात्र, आहे त्याच विमानतळावर भागवा, अशी त्यांची स्थिती आजवरच्या राजवटींनी करून ठेवली. उदाहरणेच द्यायची, तर न्यूयॉर्कला एक-दोन नव्हे तर जेएफके, नेवार्क आणि लागार्डिया अशी तीन आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत. लंडनदेखील हिथ्रो, गॅटविक आणि स्टॅन्स्टेड ही तीन जबरदस्त विमानतळे बाळगून आहे. टोकियोची हवाई वाहतूकदेखील दोन विमानतळात विभागली आहे. पॅरिसचेही तसेच. तिथे एकाच वेळी चार्ल्स आणि ऑर्ली विमानतळांवर सतत जग उतरते, चढते अन् उड्डाण घेते. या महानगरांच्या प्रतिष्ठित पंक्तीत ना मुंबई होती, ना दिल्ली. यंदाच्या हिवाळ्यात मात्र हा हवाई प्रवासाचा इतिहास बदलेल.
दिवाळीच्या आधी आणि नंतर उद्घाटन झालेल्या नवी मुंबई आणि नोएडा विमानतळांचे सोनेरी पान या इतिहासाला जोडले जाईल. एरव्ही मुंबईच्या वाहतूक कोंडीची खूप चर्चा होते. ही कोंडी फोडण्यासाठी कधी हा उड्डाणपूल, तर कधी तो उड्डाणपूल उभारला गेला. काही नवे, तर काही जुने पाडून नव्याने बांधले जात आहेत. लोकल रेल्वेच्या जोडीला मेट्रोही आणली गेली. मात्र, अख्ख्या महामुंबईतील प्रवासी ज्या एकमेव विमानतळावर लोटतात, त्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि या तळाच्या अंतराळात होणारी कोंडी कधीच कुणा सरकारच्या ऐरणीवर आली नव्हती.
पालघर आणि रायगडपर्यंत विस्तारलेल्या महामुंबईच्या विमान प्रवाशांना आतापर्यंत सहारा, विलेपार्ले, सांताक्रूझ या एका विमानतळावरील तीनच टर्मिनलचा पर्याय होता. बरे, प्रश्न केवळ टर्मिनलच्या संख्येचा नाही. या टर्मिनलवरून कितीही विमाने सुटली, तरी त्यांना उडण्यासाठी धावपट्टी एकच! पंक्तीला दोन; पण गणतीला ती एकच धरावी लागते. कारण, मुंबईच्या या दोन धावपट्ट्या एकमेकींना छेदून जातात. नवी मुंबई विमानतळाप्रमाणे त्या समांतर नाहीत. त्यामुळे धावपट्टी क्रमांक एकवरूनच मुंबईतली बहुतांशी विमाने उडतात. तासाला 46 ते 48 विमाने उड्डाण घेऊ शकतात, इतकीच या धावपट्टीची क्षमता आहे. मात्र, गरज म्हणून या धावपट्टीवरून तासाला कधी 54 कधी 55 उड्डाणेही केली जातात. 2023 च्या 11 नोव्हेंबरला तर चोवीस तासांत तब्बल 1,032 उड्डाणे नोंदवून या एकुलत्या धावपट्टीने जीवघेणा विक्रम नोंदवला.
आधी म्हटल्याप्रमाणे, ही विमान कोंडी कधी कुणाला दिसली नाही. दिसली ती फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना! तसा आपल्याकडे कुठल्याही प्रकल्पाचा, योजनेचा घटनाक्रम पार नेहरूंपासून सुरू होतो किंवा काँग्रेसच्या राजवटीत त्याची सुरुवात तरी झालेली असते. नवी मुंबई विमानतळही त्यास अपवाद कसे असेल? 1997 मध्ये मुंबईत आणखी एक विमानतळ उभारण्याची शक्यता अभ्यासण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाने समिती गठित केली. हा या विमानतळाचा आरंभबिंदू. तेव्हा मोदींची राजवट नक्कीच नव्हती.
2007 मध्ये केंद्राने तत्त्वतः मंजुरी दिली, तेव्हाही मोदी पंतप्रधान नव्हते. 2010 मध्ये संरक्षण मंत्रालयाने परवानगी दिली तेव्हाही मोदी दिल्लीत नव्हते. मात्र, तेव्हापासून महाराष्ट्राच्या मंत्रालयात ही फाईल पुढे सरकलीच नाही. महामुंबईला आणखी एक आंतरराष्ट्रीय विमानतळ देणार्या या फाईलवरची धूळ झटकण्यासाठी मोदींनाच केंद्रात सत्तेवर यावे लागले. पंतप्रधानांनी थेट मुख्य सचिवांना फोन करून ही फाईल पुढे सरकवण्याचे आदेश दिले. हे असे महाराष्ट्राच्या प्रशासकीय इतिहासात प्रथमच घडले. केंद्रात नरेंद्र मोदी, तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांची राजवट आली आणि म्हणून या प्रकल्पाला पंख लाभले. 9 वर्षांत भूमिपूजन ते उड्डाण असा प्रवास नवी मुंबईच्या विमानतळाने पाहिला.
जिथे मोदींनी भूमिपूजन केले, तिथेच मोदींचे विमान परवा उतरले. असे म्हणतात की, येत्या काही वर्षांत सर्व चार टर्मिनल सुरू झाली की, नवी मुंबई विमानतळ हे महामुंबईचे मुख्य विमानतळ होईल. याचा अर्थ मुंबईतील सारी विमाने नवी मुंबईकडे वळतील, असे नाही. आजवर मुंबईने नाइलाज म्हणून नाकारलेली विमाने आता नवी मुंबईत उतरणे सुरू होईल आणि तरीही ते महामुंबईचे मुख्य विमानतळ म्हणून पुढे येईल. आता याच न्यायाने महाराष्ट्राची अनेक शहरेही विमानसेवेच्या प्रतीक्षेत आहेत. मुंबईचा शेजार म्हणून नवी मुंबई झाली आणि आंतरराष्ट्रीय हवाई नकाशावर पोहोचली. या नव्या विमानतळाच्या परिसरात तिसरी मुंबई आकार घेत आहे. त्याचवेळी पालघरच्या वाढवण बंदर परिसरात चौथी मुंबई उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ज्यांच्या नावात मुंबई नाही अशा शहरांचे काय? पंतप्रधान मोदींचा स्पर्श ज्यांना होतो त्यांचे सोने होते, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबई विमानतळाच्या साक्षीने म्हणाले. महाराष्ट्राची अनेक सोन्यासारखी शहरेही या परीसस्पर्शाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांनाही प्रगतीचे पंख लाभू देत!