संपादकीय

नैसर्गिक आपत्ती आणि हतबलता

Arun Patil

एकीकडे मध्य आणि दक्षिण भारतात पावसाने दडी मारलेली असताना दुसरीकडे उत्तर भारतातील अनेक राज्यांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. विशेषतः हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात पावसाने मोठे नुकसान केले आहे. दिल्लीत तसा फारसा पाऊस पडत नाही; पण वरील राज्यांतील पावसाचे पाणी यमुना नदीत आले आणि त्यामुळे दिल्लीकरांनाही पुराचा सामना करावा लागला.

मानवी हस्तक्षेपामुळे हिमालय पर्वतरांगाचा बराच मोठा भाग संवेदनशील बनला आहे. उत्तराखंडमधील जोशी मठ येथे शेकडो घरांना पडलेले तडे हे त्याचे ताजे उदाहरण आहे. दहा वर्षांपूर्वी केदारनाथमध्ये आलेला महाप्रलय कोणीही विसरू शकत नाही. जवळपास त्याची पुनरावृत्ती यावेळी हिमाचलमध्ये झाली. सुदैवाने मनुष्यहानी कमी झाली असली, तरी आर्थिक हानी मात्र प्रचंड प्रमाणात झाली आहे. मान्सूनच्या पावसाला जून महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून सुरुवात झाली. आधी पूर्व भारतात आसाममध्ये मोठा पूर आला. तेथील स्थिती सावरत नाही, तोच उत्तर भारताला संकटाने कवेत घेतले.

हिमाचलमध्ये पर्यटनासाठी देश-विदेशातले लाखो लोक येत असतात. पर्यटकांनी बहरलेल्या या राज्यात गेल्या काही वर्षांत बेसुमार वृक्षतोड झाली असून प्रचंड बांधकामे झाली आहेत. पर्यटकांसाठी आलिशान हॉटेल्स बांधली जात आहेत आणि त्यासाठी झाडांची कत्तल केली जात आहे. राजधानी सिमलाची अवस्था तर मोठ्या महानगरासारखी झाली आहे. झाडे तोडल्याने डोंगरातले पाणी प्रचंड वेगाने खाली येते आणि वाटेत येईल त्याला उद्ध्वस्त करीत ते पुढे जाते. हिमाचलमध्ये यावेळी नेमके हेच झाले आहे. राज्यात 50 हजारांपेक्षा जास्त पर्यटकांची सुटका करावी लागली आहे. दरड कोसळल्यामुळे 15 हजार फूट उंचीवर 250 पर्यटक अडकले होते. त्यांची सुटका करताना प्रशासनाच्या नाकीनऊ आले.

हिमाचलच्या तुलनेत उत्तराखंडला तितका फटका बसला नाही; पण चारधामकडे जाणार्‍या मार्गांवर दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. पंजाबमध्ये यंदा अतिवृष्टी झाली. अमृतसर, चंदीगड, लुधियानासहित अन्य शहरांत नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने लोकांची दैना उडाली. शेतीचे नुकसान झाले ते वेगळेच. यमुना नदीला आलेल्या पुराने तर दिल्लीची पार दुर्दशा करून टाकली. पाच दशकांनंतर लाल किल्ल्याला पाण्याने वेढा टाकला. महात्मा गांधी यांचे समाधीस्थळ असलेला राजघाट, सर्वोच्च न्यायालयाचे प्रवेशद्वार, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, पोलीस मुख्यालय असलेल्या आयटीओ भागात पाण्याचे साम—ाज्य निर्माण झाले. पूर प्रभाव क्षेत्रातील 30 हजारांपेक्षा जास्त लोकांची प्रशासन व एनडीआरएफने सुटका केली. पुरासाठी दोषी कोण, या मुद्द्यावरून आता राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.

सुसज्ज होत असलेले लष्कर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच झालेला फ्रान्सचा दौरा देशाच्या लष्करी सुसज्जतेच्या द़ृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. फ्रान्सकडून 26 राफेल-एम विमाने तसेच स्कॉर्पिन पाणबुड्या खरेदी करण्याचा निर्णय संरक्षण परिषदेने घेतला आहे. राफेल-एम लढाऊ विमानामुळे नौदलाची शक्ती कित्येक पटीने वाढणार आहे. फ्रान्सच्या नॅशनल डे परेडमध्ये मोदी प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. एकप्रकारे देशाचा गौरव वाढविणारा हा क्षण होता. या परेडमध्ये भारतीय लष्कराचे काही जवानही सामील झाले होते. भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंध मजबूत होत असल्याचे हे द्योतक आहे. मोदी यांचा फ्रान्सने 'ग्रँड क्रॉस ऑफ दि लिजन ऑफ दि ऑनर' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव केला. आतापर्यंत सुमारे 14 देशांनी मोदी यांना नागरी पुरस्काराने गौरविले आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर अमेरिका आणि पश्चिमी देशांचे निर्बंध झुगारत भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी चालविली आहे. तथापि, असे असूनही चीनला शह देण्यासाठी अमेरिका आणि पश्चिमी देश भारताला जवळ करीत आहेत. वेगाने विकसित होत असलेली आर्थिक शक्ती म्हणूनही जागतिक पटलावर भारताचे महत्त्व वाढले आहे.

– श्रीराम जोशी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT