तानाजी खोत
1972 मध्ये ‘अपोलो-17’ मोहिमेद्वारे मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले होते. आता पाच दशकांनंतर ‘नासा’ची ‘आर्टेमिस-2’ मोहीम मानवाला पुन्हा एकदा चंद्राच्या कुशीत नेण्यासाठी सज्ज झाली आहे.फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या मोहिमेची रंगीत तालीम पार पडली; मात्र रॉकेटमध्ये इंधन भरताना झालेल्या एका तांत्रिक गळतीमुळे फेब्रुवारीतील नियोजित उड्डाण आता मार्च 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. आर्टेमिस-2 ही 10 दिवसांची एक चाचणी मोहीम आहे. यामध्ये चार अंतराळवीर चंद्रावर उतरणार नाहीत, तर चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून पुन्हा पृथ्वीवर सुरक्षित परत येतील. या मोहिमेसाठी जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट ‘एसएलएस’ आणि ‘ओरियन’ अंतराळयानाचा वापर केला जात आहे. या ऐतिहासिक प्रवासासाठी ‘नासा’ने चार अंतराळवीरांची निवड केली आहे. मोहिमेचे सारथ्य करणारे कमांडर रीड वाईजमन, पायलट व्हिक्टर ग्लोव्हर (जे चंद्राकडे जाणारे पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती ठरतील), मिशन स्पेशालिस्ट ख्रिस्तियाना कोच (ज्या चंद्राकडे झेप घेणार्या पहिल्या महिला ठरतील) आणि कॅनडाचे जेरेमी हॅन्सन यांचा यात समावेश आहे.
आता प्रश्न असा पडतो की, 50 वर्षांचा मोठा गॅप घेतल्यानंतर ‘नासा’ने आताच ही मोहीम का हाती घेतली? गेल्या काही वर्षांत झालेल्या संशोधनानुसार, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मोठ्या प्रमाणात बर्फ साचलेला आहे. या बर्फापासून पिण्याचे पाणी, ऑक्सिजन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रॉकेटसाठी लागणारे इंधन (हायड्रोजन) तयार करता येऊ शकते. चंद्रावरच इंधन मिळाले, तर चंद्र हा मंगळ ग्रहावर जाण्यासाठी एक ‘पेट्रोल पंप’ किंवा मध्यवर्ती केंद्र म्हणून वापरता येईल. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, चीनसोबतची अंतराळ स्पर्धा. चीन अत्यंत वेगाने आपली चांद्र मोहीम आखत आहे. त्यामुळे अवकाशातील आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी अमेरिकेला ही झेप घेणे आता अनिवार्य झाले आहे.
चीनने 2026 मध्ये आपल्या ‘चँग-ई 7’ मोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध—ुवावर पाण्याचा शोध घेण्याचे लक्ष्य ठेवले आहे, तर अमेरिका ‘आर्टेमिस-2’ द्वारे मानवी उपस्थिती पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. चीनचा वेग इतका प्रचंड आहे की, ते 2045 पर्यंत अमेरिकेला मागे टाकून जगातील सर्वात मोठी अंतराळ शक्ती बनण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यांनी स्वतःचे स्वतंत्र अंतराळस्थानक आधीच कार्यान्वित केले आहे, तर आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक आता निवृत्त होण्याच्या मार्गावर आहे.
आता मूळ प्रश्न हा उरतो की, मानवाला नेमकं काय हवंय? खरं तर, ही केवळ एका मोहिमेची तयारी नसून मानवी जिज्ञासेचा एक न संपणारा प्रवास आहे. मानवी मन हे मुळातच सीमा ओलांडण्यासाठी बनले आहे. पृथ्वीची निळी क्षितिजं ओलांडून जेव्हा आपण त्या काळ्याभोर अवकाशात डोकावतो, तेव्हा आपण केवळ नवीन ग्रह शोधत नसतो, तर विश्वाच्या विशालतेत आपले अस्तित्व काय आहे, याचा शोध घेत असतो. ही जिज्ञासाच आपल्याला सांगते की, आपण केवळ एका ग्रहापुरते मर्यादित राहण्यासाठी जन्माला आलेलो नाही. अज्ञात गोष्टींची भीती वाटण्याऐवजी त्याचं आकर्षण वाटणं, हीच मानवी प्रगतीची गुरुकिल्ली आहे. जोपर्यंत मनात प्रश्न आहेत, तोपर्यंत मानवाचे हे पाऊल थांबणार नाही.