शेरिंग टोबगे, पंतप्रधान, भूतान
नरेंद्र मोदी हे केवळ भारताचे नेतृत्व करणारे नेते नाहीत, तर माझ्यासाठी मार्गदर्शक आणि मोठ्या भावासारखे आहेत.
नवी दिल्लीत मी २७ जुलै २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो. त्याच्या दहा महिने आधी झालेल्या निवडणुकांमध्ये माझ्या पक्षाचा पराभव झाला होता. त्यामुळे मी लोकप्रतिनिधी राहिलो नव्हतो. मी ना पंतप्रधान होतो, ना खासदार होतो. त्यामुळे मी एक खासगी व्यक्ती म्हणून मोदींना भेटत होतो. माझ्या कार्यकाळात त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानले आणि मी हेही सांगितले की, ते कायम माझे मोठे बंधू राहतील. त्यांनी कायम मला धाकट्या बंधूप्रमाणे स्नेहपूर्ण वागणूक आणि प्रेम दिले.
मी त्यांना सुमारे १३ वर्षे गुजरातचा कार्यभार सांभाळताना पाहिले आहे. त्या काळात एक राज्य म्हणून गुजरात विकास, पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि अंमलबजावणी या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर एक महत्त्वाचे राज्य म्हणून चर्चिले जात होते. त्यानंतर ही महत्त्वाकांक्षा भारताच्या पातळीवर नेतांना मी त्यांना पाहिले.
मी त्यांना एक लोकसेवक म्हणूनही पाहिले आहे. शिस्तबद्ध, ऊर्जावान आणि असामान्य मेहनती; मात्र मला सर्वाधिक भावली ती म्हणजे देश आणि देशातील जनतेची सेवा करण्याप्रति त्यांची अढळ निष्ठा. त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांनी भारतीयांमध्ये स्वतःबद्दल आणि आपल्या देशाबद्दल एक दृढ आत्मविश्वास जागवला. भारतीयांना आपल्या देशाचा अधिक अभिमान वाटू लागला, देशाच्या क्षमतांबद्दल त्यांच्या आकांक्षा अधिक व्यापक झाल्या आणि जगात भारताचे स्थान अधिक आत्मविश्वासाने पाहण्याची भावना निर्माण झाली.
भारत जेवढा मजबूत होईल, तेवढा तो हे काम अधिक सक्षमपणे करू शकेल. विकसित भारत एक मोठी बाजारपेठ असेल. त्याकडे इतरांना देण्यासाठी अधिक भांडवल आणि तंत्रज्ञान असेल. जागतिक अजेंड्याला आकार देण्यासाठी, हा प्रदेश आणि ग्लोबल साऊथचे नेतृत्व करत त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जगासमोर अधिक प्रभाव पाडण्यासाठी भारत सक्षम होईल. माझ्यासाठी मात्र हे अधिक वैयक्तिक आहे. विकसित भारताचा अर्थ आहे, विकसित भूतान.
जून २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतरच्या काही आठवड्यांतच पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भूतानची निवड केली. त्यावेळी मी पंतप्रधान होतो आणि त्यांचे स्वागत करण्याची संधी मला मिळाली. त्या दौऱ्यादरम्यान त्यांनी दोन्ही देशांच्या संबंधाचे वर्णन केवळ तीन अक्षरांत केले होते. बी फॉर बी : भारत फॉर भूतान आणि भूतान फॉर भारत. हे शब्द अगदी सोपे असले, तरी अत्यंत महत्त्वाचे आणि व्यापक अर्थाचे आहेत आणि काही वर्षे मोदी या वचनाप्रमाणे जगत आहेत. म्हणूनच आमच्या ११व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान भारताने दिलेल्या मदतीमुळे माझ्या पहिल्या सरकारला महत्त्वाकांक्षी विकास कार्यक्रम राबवता आला. पंतप्रधान मोदी यांनी आमच्या १२व्या योजनेदरम्यानही ही व्यापक आणि उदार भागीदारी कायम ठेवली आणि म्हणूनच २०२४ मध्ये मी जेव्हा पुन्हा कार्यभार स्वीकारला, तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी आमच्या १३व्या योजनेसाठी भारताची मदत दुप्पट करून १०,००० कोटी रुपये केली. आज 'बी फोर बी'ची प्रचिती भूतानच्या सर्व भागांत येते. शाळा आणि रुग्णालये, रस्ते आणि पूल, जलविद्युत आणि तंत्रज्ञान, कृषी आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांत.
मात्र, भूतानचे महामहिम राजे यांची गेलेफू माईंडफुलनेस सिटीची संकल्पना साकारण्यासाठी भारताने दिलेल्या पाठिंब्याइतके 'बी फॉर बी'चे महत्त्व अन्य कोणत्याही क्षेत्रात दिसून येत नाही. पंतप्रधान मोदी यांनी यासाठी भारताचा पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे आणि रेल्वे जोडणी, सीमावर्ती पायाभूत सुविधा तसेच हवाई आणि डिजिटल संपर्क व्यवस्थेतील सुधारणा या माध्यमातून ही वचनबद्धता आता प्रत्यक्षात आकार घेत आहे. टाटा पॉवर, अदानी समूह, जेएसडब्ल्यू एनर्जी आणि इतर कंपन्या भूतानच्या आर्थिक परिवर्तनात गुंतवणूक करत आहेत, तर भारतातील आघाडीचे उद्योगजगताचे प्रतिनिधी जीएमसीमध्ये संस्थापक सदस्य म्हणून सहभागी झाले आहेत. त्यामुळे महामहिम राजांनी भूतानमधील त्यांच्या असाधारण योगदानाची दखल घेत पंतप्रधान मोदी यांना भूतानचा सर्वोच्च सन्मान 'ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो' प्रदान केला, तेव्हा भूतानच्या सर्व नागरिकांना आनंद झाला. हा सन्मान प्राप्त करणारे ते पहिले आणि एकमेव परदेशी नेते आहेत.
माझ्यासाठी त्यांचा प्रभाव वैयक्तिक पातळीवरही अत्यंत खोलवर राहिला आहे. मी पंतप्रधान मोदी यांच्याकडे दीर्घकाळापासून माझे मोठे भाऊ म्हणून पाहत आलो आहे आणि कालांतराने ते माझे मार्गदर्शकही झाले. मला सूचना देण्याची त्यांना कधीच गरज भासली नाही. लोकसेवक म्हणून त्यांचे आचरणच माझ्यासाठी पुरेसे मार्गदर्शक ठरले आहे.