अरुणा सरनाईक
नरक चतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला, अशी कथा आहे. नरकासुर हा उन्मत्त राजा होता. त्याने ब्रह्मदेवाची आराधना करून त्याच्याकडून वर मागून घेतला. त्यानंतर प्रजेवर अन्याय, अत्याचार करण्यास सुरुवात केली. अशा अत्याचारी नरकासुराचा श्रीकृष्णाने वध करून संकट दूर केले.
दिवाळी म्हणजे, अंधारातून उजेडाकडे नेणारा, प्रकाश देणारा, आनंद देणारा हा सण. प्रकाश वर्धिष्णु करणारा हा सण आहे. समद्धी आणि ऐक्याचा मेळ करणारा हा सण. हा सण अतिप्राचीन परंपरा असलेला आहे. दिवाळीचं वर्णन ऋग्वेद, बौद्ध, जैन, चाणक्यनीती यातही आढळतं. गुप्तकाळात इ. स. 200 ते 600 या दरम्यान दिवाळीचा उल्लेख यक्षरात्री या नावानं आढळतो. इ. स. 600 च्या सुमारास या सणाला ‘दीपप्रतिपदुत्सव’ असं म्हणत. कनोजचा राजा हर्षवर्धन याने आपल्या नागानंद या नाटकात दिवाळीला दीपमाला उत्सव असं म्हटलं आहे. 11 व्या शतकात श्रीपती नावाच्या ज्योतिष्याचार्याने आपल्या ज्योतिष्य रत्नमाला या ग्रंथावरील मराठी टीकेत दिवाळी हा शब्द वापरला आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत अनेक वेळा अनेक अर्थानी दिवाळी हा शब्द वापरला आहे. ते ज्ञानाची दिवाळी मानतात. ‘तैशी वाचा श्रोतयां ज्ञानाची! दिवाळी करी!’ असं ते म्हणतात.
बादशहा अकबरानेदेखील ‘ऐने दिवाळी’मध्ये दिवाळीचं वर्णन केलं आहे. हा सण व्यापार्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. त्यांची दिवाळी धनत्रयोदशीपासूनच सुरू होते आणि बलिप्रतिपदेला संपते. या पाच दिवसातला प्रत्येक दिवस शुभ मानला जातो. वह्या आणणे, हिशेब पूर्ण करणे, नवीन खातेवही लिहिण्यास सुरुवात ते या दिवसात करतात. त्याला ते चौघडिया किंवा शिवालिखित मुहूर्त म्हणतात.
दिवाळीच्या पाच दिवसांपैकी नरक चतुर्दशी हा दिवस क्रमाने तिसरा येतो. याच्या मागील कथा मोठी मनोरंजक आणि गमतीशीर आहे. प्राचीन काळी प्रागज्योतिशपूर म्हणजे आताचा आसाम किंवा भूतानच्या पलिकडील पर्वतांचा भाग होता. तेथे भूदेवीचा पुत्र नरकासुर राजा राज्य करत होता. नरकासुराला भौमासूर असेदेखील नाव होते. हे नाव त्याला आईच्या भूदेवी या नावावरून मिळाले असावे. त्याने ब्रह्मदेवाला जपतप करून प्रसन्न करून घेतले. त्यावेळी ब्रह्मदेवाने त्याला असा वर दिला की, तुला मृत्यू फक्त मातेकडूनच येईल. आई मुलाला मारणं शक्यच नाही, या विचारानं नरकासुराने अनेक अत्याचार करून प्रजेला त्रासून सोडले. याशिवाय 16,100 कन्यांवर अत्याचार करून त्यांना कारागृहात कैद केले.
सर्व लोक, देव मिळून श्रीकृष्णाला शरण गेले. कारागृहातील कैद असलेल्या कन्यांनी कृष्णाला पत्र पाठवून आपली यातून सुटका करण्याची विनंती केली. तेव्हा श्रीकृष्णाने नरकासुराशी युद्ध करायचे ठरवले. युद्धात त्याच्या रथाचे सारथ्य करण्यासाठी सत्यभामेला नेमले. कारण, ती पण कृष्णासारखी सारथ्य करण्यात निपुण होती. शिवाय, सत्यभामेला बरोबर घेण्यात कृष्णाची एक चाल होती. दोघात तुंबळ युद्ध झाले. नरकासुर उत्तम योद्धा होता. आपल्या युद्धनैपुण्याने त्याने कृष्णालादेखील काही क्षणांसाठी विस्मित केले. त्यामागेदेखील कृष्णाचे राजकारण असावे. यावेळी त्याने सत्यभामेला समोर करून नरकासुराचा वध केला. तो दिवस होता आश्विन वद्य चतुर्दशी. वेळ होती सूर्योदयापूर्वीचा काळ. मरताना नरकासुराने कृष्णाकडून वरदान मागितले. ते असे, या दिवशी जो कोणी सूर्योदयापूर्वी स्नान करेल त्याला नरकवास न मिळो. त्याच्या स्मरणार्थ या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करतात.
कारागृहातील कन्यांची मुक्तता कृष्णाने केली. त्या त्याला शरण गेल्या. लौकिक अर्थाने त्याने त्यांच्याशी विवाह केल्याचे दाखले आहेत; पण विचार करता श्रीकृष्ण त्यांचा पालनहार होता. उद्धारकर्ता होता. विवाह ही एक रूपकात्मक घटना असावी. नरकासुर वधानंतर श्रीकृष्ण सत्यभामेसह द्वारकेला परतला. त्याच्या स्वागतासाठी सगळी नगरी श्रृंगारली होती. दीपमाळा लावून त्याचे स्वागत केले गेले. त्याची स्मृती म्हणूनही हा दिवस साजरा करतात.
आता प्रश्न असा उद्भवतो की, कृष्णासारख्या पुरुषोत्तमाला नरकासुराच्या वधासाठी सत्यभामेची मदत का घ्यावी लागली? नरकासुराला असा वर मिळाला होता की, तुला तुझ्या आईच्या हातूनच मरण येईल आणि कोणतीच आई आपल्या मुलाच्या मरणाला कारणीभूत ठरणार नाही. या ठिकाणी असा विचार येतो की, स्त्री ही शेवटी माता म्हणूनच जास्त कार्यरत असते. या ठिकाणी सत्यभामेने भूदेवीची भूमिका घेतली असावी, असा एक विचार संभवतो. कारण, ‘कुमाता न जायते’ असं वचन आहे. तसंही मुलगा वाईट मार्गाने जात असेल, दुष्कृत्य करत असेल, तर त्याला शासन करण्याचा पहिला अधिकार हा मातेचाच असतो. प्रसंगी ती तो अधिकार मोठ्या हिमतीने आणि मनावर दगड ठेवून निभावते. हे आपण नरकासुराच्या कथेवरून जाणतो.
आजही या कथेची वर्तमान काळात नव्यानं विचार करण्याची आणि आचरणात आणण्याची गरज वाढू लागली आहे. आजच्या काळात प्रत्येक ठिकाणी जागोजागी असे नरकासूर जनतेला त्रास देत आहेत. याचे निवारण करण्यासाठी पुन्हा एकदा कृष्णाची सत्यभामेसह आवश्यकता आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी नराकसुराचे प्रतीक म्हणून कारिटाचे फळ पायाखाली घेऊन अभ्यंग स्नान करून, शेणामातीचा नरकासुर करून त्याच्यावर केरकचरा टाकून देतात. हा नरकासुराचा प्रतीकात्मक वध मानला जातो. या दिवशी प्रात:काळीदेखील मातीचे दिवे तेलवात लावून उजळतात.