नासाच्या दुर्बिणीतून पाहिल्यावर अंतराळात कधीतरी एक विशिष्ट वस्तू तरंगत दूरवर चमकत निघून गेली आणि व्हाईट हाऊसमध्ये तर्कवितर्क चालू झाले. भारतात झुरळ कट्ट्यावर राजकारण माजले आणि लगेच यूएफओ म्हणजेच यूएपी फाईल्स ट्रम्पनी खुल्या केल्याचे ऐकिवात आले. काय कनेक्शन लावावे का? नसेलही. झुरळ उडत असले तरी यूएफओशी कशी बरोबरी होईल? काय सांगावं या फायलीतून पण झुरळ निघालं असावं. अनेक ऑब्जेक्ट असे आहेत की, भास निर्माण करतात, असे फायलीतूनच निष्कर्ष निघाले. अमेरिकन तर्क लावून भीती घालण्यात पटाईत.
यूएफओ म्हणजे काय, अमेरिकेच्या लष्करी यंत्रणेशी काहीतरी या ऑब्जेक्टस्चा संबंध असावा असे फायलींतून शेवटी कळाले. पण काहींनी असे पण सांगितले की, ती झुरळं असावीत. जेन झींना एलियन रुल करतात. एक बाई भविष्य सांगत मुलाखतीत कळवळून म्हणाली. ट्रम्प पण एलियन आहे. त्याच्या हालचाली एलियनसारख्या आहेत. झुरळ हे एक उडणारे ऑब्जेक्ट आहे. परग्रहवासी असावे. मरते कुठे लगेच मारलं तरी. उडून जाते. वळवळत राहते. आपल्याला काही होणार नाही हे माहिती असल्याने या एलियननी झुरळ पार्टी स्थापित केली असावी, असे ट्रम्पने ऐनवेळी फाईल ओपन केल्याने भाकीत होत आहे. शिवाय झुरळांचा अमेरिकेत म्होरक्या असल्याने हे सहज शक्य आहे. तर्क लावत बसून निष्कर्ष शून्यच.
त्याचे झाले असे! उकाड्याचे दिवस. बाहेर अंगणात बिछाना टाकून मस्त झोप घ्यावी म्हणून पप्पू रात्री बाहेरच झोपला. पप्पूने एक तबकडी उडताना आकाशात पाहिली. आणि लाईट टीम टीम करत ते घिरट्या घालत भिरभिरत होते. पप्पूची उत्सुकता वाढली. त्याने डोळे विस्फारले आणि बाजूला ठेवलेला चष्मा डोळ्यावर लावला. तो काजवा होता. पण पप्पूने फुशारक्या मारण्यासाठी इंडिया ते इटलीपर्यंत यूएफओ पाहिल्याचा दावा केला आणि याला जबाबदार अमेरिकन आहेत. ते एलियन उराशी घेऊन बसलेत असं काहीतरी. आता शहाण्याने डोके खाजवावे. तबकडीचा म्हणजे यूएफओचा शोध कोणी लावला असावा. अशा अनेक पप्पूजीनी, ज्यांनी काजवे आणि झुरळ उडताना पाहिले. असे म्हणावे आणि स्वाहा करावे तूर्तास. पण यूएफओ हे गुप्त लष्करी ऑब्जेक्ट असण्याची शक्यता आहेत, जे अंतराळात युद्धाच्या काळातच दिसून येतात. (फाईल क्लोजड)