मला तिकीट मिळाले नाही. म्हणून रडत बसणारा मी कार्यकर्ता नाही. मी पक्षाचा साधा शिपाई आहे. उडी मार म्हटले की, मी उडी मारणार आहे. का म्हणून आमच्यात विचारायचे नसते. आदेशाचे सक्त पालन करायचे, हा मंत्र मी जपला आहे. मला नेते मंडळी जवळून ओळखतात; पण एबी फॉर्म वाटताना त्यांच्या लक्षातच येत नाही की, मी पक्षाचा सच्चा पाईक आहे. कदाचित हीच गोष्ट त्यांना खूप आवडत असावी. मला एबी फॉर्म दिला नाही तरी पक्षाचे काही नुकसान होणार नाही, हे त्यांना मनोमन वाटत असावे.
खरं तर, मी स्वप्नातसुद्धा दुसऱ्या पक्षात जात नाही. स्वप्नात जर एखाद्या पक्षाचे कार्यालय आडवे आले तर मी माझा रस्ताच बदलतो. मग प्रत्यक्षात मला कुठला पक्ष जवळ करेल? माझ्या बरोबरीचे पक्षातले लोक नगरसेवक झाले. नंतर आमदार झाले. नंतर मंत्रीही झाले. मी त्यांना ओळखतो. माझे त्यांचे अरे-तुरेचे संबंध आहेत; पण विशिष्ट मर्यादेपर्यंत! मी त्यांच्या ओळखीचा कधीही दुरुपयोग करत नाही. माझ्या रक्तातच नाही राव. माझ्या सुनेची बदली आमच्या गावी करायची होती; पण मी तत्त्वाशी इमान राखले. अहो चॅरिटी कुठून सुरू होते? आपल्या घरापासूनच का? म्हणून मी माझ्या दारावर पाटी लिहून ठेवलीय... कृपया नेमणूक वा बदलीसाठी कुठेही भीड घालू नये! ही गोष्ट इतकी व्हायरल झाली आहे की, बदलीसाठी कुणीही माझ्याकडे रद्दबदली करत नाही. कारण, त्यांना गॅरंटी आहे की, माझ्याकडे एखादे काम घेऊन गेलो तर ते होण्याची एक टक्कासुद्धा गॅरंटी नसते.
असा मी पक्षाचा तळमळीचा, तळागाळातला आणि (कायमस्वरूपी) गाळात आडलेला कार्यकर्ता! मला महापालिकेचे तिकीट नाकारण्यात आले. त्याची पक्षाला यत्किंचितही खंत वाटली नाही. मलाही वाटली नाही. कारण, पक्षातील महत्त्वाची भूमिका मी बजावत असतो- सतरंज्या उचलायची. लेकाचे सतरंजीवर बसतात. सभासंमेलने पार पाडतात. कुठले कुठले ठराव मंजूर करत असतात; पण बैठका आटोपल्यानंतर सतरंज्या तशाच टाकून जातात. त्या गोळा कुणी करायच्या! माझ्याच्याने ते बघवत नाही. मग मी एकटाच शांतपणाने त्या गोळा करतो, त्यांच्या घड्या घालतो आणि कपाटात एकावर एक रचून ठेवतो. गेल्या तीस वर्षांत कितीतरी सत्तांतरे झाली; पण कपाटातील एक सतरंजी इकडची तिकडे झाली नाही.