शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन मुंबईत दोन ठिकाणी साजरा झाला. शिवसेना कुणाची, या प्रश्नाचे उत्तर आपल्या आक्रमक राजकारणातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देताना दिसतात, तर दुसरे नेते उद्धव ठाकरे बचावात्मक पवित्र्यात दिसतात. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा मेळावा माटुंगा येथील षणमुखानंद सभागृहात, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा गोरेगाव नेस्कोच्या स्टेडियममध्ये. या दोन्ही मेळाव्यांनी हाच संदेश आणि सेनेच्या राजकारणाची दिशा राज्यातील कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केली. एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे नाव व धनुष्य बाण निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने दिल्यापासून गेली चार वर्षे ते पक्षाचा वर्धापन दिन जोरदार उत्साहाने, वाजत-गाजत साजरा करीत आहेत. उद्धव यांच्या ठाकरे सेनेचा वर्धापन दिन सालाबादाप्रमाणे साजरा होतो; पण तो जोर आणि जोम कुठेतरी हरवला. शिवसेनाप्रमुखांच्या विचाराचे आम्ही सच्चे वारसदार आहोत असा दावा आजही उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे करीत आहेत. दोन्ही पक्षांच्या व्यासपीठावर शिवसेनाप्रमुखांचे फोटो असतात. गेल्या चार वर्षांत राज्यात झालेल्या लोकसभा, विधानसभा, महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनतेने आपली पसंती शिंदे यांच्या शिवसेनेला दिली. उबाठा सेनेची अस्तित्वासाठी धडपड चालूच आहे, हेच चित्र वर्धापनदिनाला दिसले. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर ठाकरे सेनेला लागलेली ओहोटी अजून थांबायला तयार नाही. वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी दिल्लीत जाऊन बंडाचा झेंडा फडकवला व लोकसभा अध्यक्षांना पत्र देऊन ते सारे एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या दिशेने निघाले असल्याचा संदेश महाराष्ट्राला मिळाला. म्हणूनच त्या सहा खासदारांच्या फुटीचे सावट ठाकरे सेनेच्या वर्धापन दिनावर होते.
२०२२ मध्ये शिंदेंच्या नेतृत्वाखाली ४० आमदार फुटले तेव्हा तर उद्धव ठाकरे राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर बसलेले होते. तेव्हाही त्यांनी त्या आमदारांशी संवाद साधून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. चार वर्षांनी सहा खासदार फुटले तेव्हाही त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. शिवसेनाप्रमुखांनी मोठ्या विश्वासाने त्यांचा पक्ष आपल्या मुलाकडे सोपवला; पण तो त्यांना नीट सांभाळता येत नाही, हेच यानिमित्ताने दिसून आले. त्यांनी वर्धापनदिनाच्या मेळाव्यात पक्ष सोडून गेलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघांतील मतदारांची माफी मागितली. अर्थात, हा सहानुभूती मिळविण्याचा प्रकार होता. मुळात या सहा खासदारांना पक्ष सोडण्याची वेळ का आली, याचा त्यांनी विचार केला नसावा. शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव यांनी आत्मचिंतनासाठी कधी बैठक बोलवली नाही. सहा खासदार फुटल्यानंतर त्याची कारणे शोधण्यासाठी काही हालचाल केल्याचे दिसले नाही. केवळ त्यांना गद्दार म्हटले की, आपली जबाबदारी संपते? शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही; पण आमदार-खासदारांना हमीभाव ठरवला जातो, अशा आरोपांनी टाळ्या मिळतील; पण साध्य काय होणार? त्यांची गद्दारी केवळ पक्षाशी नाही, मतदारांशी आहे, शिवसेना सत्तेसाठी नाही, सत्ता शिवसेनेसाठी आहे, मी कुणाला भेटत नाही, मग ते खासदार निवडून कसे आले? लोकसभा निवडणूक काळात आपण रोज सहा ते दहा प्रचार सभा घेत होतो, या दाव्याला आजघडीला अर्थ नाही, याचसाठी की तसे असते, तर बंडखोरीचे उत्तर त्यातून मिळत नाही. पक्षाला लागलेली गळती ते रोखू शकले नाहीत, हे वास्तव. मला नेतृत्वाचा सोस नाही, मी खचणारा नाही, तुमच्या मनात जोपर्यंत विश्वास आहे, तोपर्यंत मी नेतृत्व करीन; पण ज्या क्षणी तुम्हाला वाटेल तेव्हा पद सोडेन, असे भावनिक आवाहन ठाकरेंनी केले खरे; पण प्रश्न नेतृत्व सोडण्याचा नसून ते सिद्ध करण्याचा आहे. पक्षप्रमुख म्हणून पायउतार होण्याची त्यांनी तयारी दर्शवली. अर्थात, स्वत: शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या कारकिर्दीत जे केले त्याचीच ही कॉपी होती, हे तमान जनतेला समजते. शिवसेनाप्रमुखांनी तीन वेगवेगळ्या वेळेला नेतृत्व सोडण्याचा मनोदय जाहीर केला होता, तेव्हा हजारो शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून त्याला विरोध केला. तसे उद्धव यांच्याबाबत घडले नाही. पक्षातील बहुतेक ताकदवान नेते उद्धव यांनी गमावले आहेत.
शिवसैनिकांची निष्ठा पक्षावर व ठाकरे नावावर असली, तरी त्यांना सदैव गृहित धरून राजकारण करता येणार नाही. शिवसेनाप्रमुखांच्या हयातीत भाजपशी युती कायम होती; पण उद्धव यांनी सूत्रे घेतल्यानंतर त्यांना युतीत आपण सडल्याचा साक्षात्कार झाला. सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार, असे ते नेहमी म्हणत; पण वेळ आल्यानंतर त्यांनी स्वत:च राजमुकुट धारण केला. चार वर्षांपूर्वी पक्षात फूट पडली तेव्हा खोके, रेडे, कोथळा, खंजीर, गद्दार, राडा अशी भाषा वापरली गेली. आता ‘ऑपरेशन तुडवा’ अशी धमकी दिली जात आहे. वर्धापन दिनाला पक्षाचे धोरण, कार्यक्रम, संघटना बांधणी यावर ठाकरेंनी काहीच भाष्य केले नाही. उलट शिंदे यांनी 'हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर बाकी है' असे जाहीर केले. हिम्मत असेल, तर पुढे या, तुडवायला पाय लागतात, असेही आव्हान दिले. सर्वात महत्त्वाचे माझा शिवसैनिक मोठा पाहिजे, त्यासाठी कुणाचा वशिला, चिठ्ठी, शिफारसीची गरज नाही, असे शिंदे यांनी सांगून मेळाव्यात चैतन्य निर्माण केले. ठाकरेंनी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण टाकली होती, ती आम्ही सोडवली असे शिंदेंनी सांगितले. दुसरीकडे काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता ठाकरेंनी फेटाळून लावली; पण ज्या काँग्रेसने शिवसेना फोडली त्या काँग्रेसचे ठाकरे गुणगान करतात, हे वर्धापनदिनाला दिसून आले. भावनेला हात घालून राजकारण करण्याचे दिवस संपले आहेत, हे ठाकरेंच्या अजून लक्षात आले नसावे. हे सारे राजकीय नाट्य ज्या पटलावर घडते आहे, ते त्यांना आधी समजून घ्यावे लागेल. शिवसेनेच्या या दोन मेळाव्यांनी केवळ शक्तिप्रदर्शन केले नाही, तर पक्षाच्या भविष्यातील राजकारणाची दिशादेखील स्पष्ट केली. एका बाजूला बाळासाहेबांच्या वारशावर दावा सांगणारे उद्धव ठाकरे आहेत, तर दुसऱ्या बाजूला सत्ता, संघटन आणि निवडणुकीतील यशाच्या बळावर आपला दावा सिद्ध करण्याचा प्रयत्न करणारे एकनाथ शिंदे आहेत. राजकारणात अखेरीस भावना आणि वास्तव यांचीच परीक्षा होत असते. कार्यकर्त्यांची निष्ठा, जनतेचा कौल आणि संघटनात्मक ताकद यांचा समतोल साधणारे नेतृत्वच टिकते. आगामी विविध निवडणुका दोन्ही गटांसाठी निर्णायक ठरणार आहेत. त्या निवडणुकांतून शिवसेनेच्या मूळ वारशावर, जनतेचा विश्वास नेमका कुणावर आहे, याचे उत्तर मिळेल. तोपर्यंत शिवसेनेतील वर्चस्वाची ही लढाई अधिक तीव्र होत जाणार, हे मात्र निश्चित!