शशिकांत सावंत
मुंबई-कोकण जलवाहतूक आता अत्याधुनिक रो-रो सेवेतून नव्या दमाने सुरू होत आहे. मुंबईतील भाऊचा धक्का ते विजयदुर्ग असा पाच तासांचा प्रवास 1 मार्च 2026 पासून सुरू होत असून, कोकणच्या पर्यटन व विकासाला नवी गती मिळणार आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात कोकण आणि मुंबई यांची नाळ जोडली गेली होती ती जलवाहतुकीने. जवळजवळ दोन हजार प्रवासी एकाच वेळी प्रवास करतील अशी बोटसेवा त्या काळात सुरू होती. ‘रामदास’ बोटीच्या सर्वात मोठ्या अपघातानंतर ही बोटसेवा बंद पडली. 1700 पेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी ही बोट 17 जुलै 1947 या दिवशी बुडाली. आता पुन्हा एकदा अत्याधुनिक रो-रो सेवेच्या माध्यमातून 1 मार्च 2026 रोजी ही बोटसेवा सुरू होत आहे. आपल्या गाडीसह कोकणात पोहोचता येईल, असा नवा प्रवास सुरू होत आहे.
मुंबईतील भाऊचा धक्का ते विजयदुर्ग असा पाच तासांचा प्रवास होणार आहे. मुंबईवरून सकाळी 8 वाजता सुटणारी ही रो-रो दुसर्या दिवशी सकाळी 12 वाजता पुन्हा येणार आहे. दोन्हीकडचा प्रवास हा प्रत्येकी पाच तास असल्याने जलद प्रवासाची संधी कोकणवासीयांना मिळणार आहे. यामुळे या सेवेची उत्सुकता आहे. मधल्या काळात चौगुले कंपनीकडून काही प्रमाणात कोकण-गोवा अशी बोटसेवा सुरू असली, तरी त्यात सातत्य नव्हते. नंतर ही सेवा प्रवासी नसल्याने नुकसानीत जाऊ लागली म्हणून ती बंद केली गेली. मात्र, आता शिमगोत्सवाच्या मुहूर्तावर ही बोटसेवा सुरू होत आहे. या सेवेमुळे सागरी पर्यटनालाही नवा आयाम मिळणार आहे. कोकण किनारपट्टीवरील पर्यटकांची संख्या पूर्वी 1 ते 2 लाखांपर्यंत असायची ती आता 10 ते 15 लाखांवर गेली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये वाढलेले पर्यटन या सेवेमुळे आणखी बहरेल.
विजयदुर्ग येथील जेट्टीचे सुशोभीकरण करून प्रवासी जेटीमध्ये रूपांतर केले आहे. भाऊचा धक्का येथेही जलवाहतुकीसाठी मोठे टर्मिनल्स उभे केले आहे. ते करताना वाढत्या जलवाहतुकीचा विचारही केला आहे. मुंबईच्या पूर्वेकडे असलेले हे बंदर आंतरराष्ट्रीय जहाजांच्या ये-जासाठी प्रसिद्ध आहे. या धक्क्याला 175 वर्षे पूर्ण झाली आहेत. डॉ. भाऊ दाजी लाड यांच्या पुढाकाराने हे बंदर बांधले गेल्याने त्याला ‘भाऊचा धक्का’ असे नाव पडले. इंग्रजांच्या सेवेत असलेले भाऊ यांनी स्वत:ची कंपनी तयार करून समुद्रात भराव टाकून हा धक्का तयार केला. त्याला आता आंतररष्ट्रीय स्वरूप आले आहे. चाकरमान्यांसाठी भाऊचा धक्का हे मुंबईचे प्रवेशद्वार झाले आहे. 19 व्या शतकामध्ये मुंबईत 18 पगड जाती-धर्माचे लोक येऊ लागले. त्याच काळात किनार्यावर बंदरे धक्के बांधण्यास प्रारंभ झाला. ससून डॉक, भाऊचा धक्का ही त्या काळापासून प्रचलित असलेली बंदरे आहेत. बदलत्या काळात कोकणात आणि गोव्यालाही जाण्यासाठी रेल्वे, नवे रस्ते मार्ग सुरू झाले असले तरी नव्या जलवाहतुकीमुळे या धक्क्याला वर्तमानातही नवी झळाळी येऊ लागली आहे. केंद्र सरकारच्या ‘सागरमाला’ प्रकल्पांतर्गत ससून डॉकचा कायापालट होणार आहे आणि केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या माध्यमातून भाऊचा धक्का हे मोठे टर्मिनल्स उभे राहत आहे. सागरमाला प्रकल्पातील हे टर्मिनल्स पर्यटकांसाठी मोठे केंद्र होणार आहे.
सध्या भाऊच्या धक्क्यावरून मांडवा येथे रो-रो सेवा सुरू आहे. त्याला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद आहे. याचाच विस्तार म्हणून भाऊचा धक्का ते विजयदुर्ग अशी दुसरी रो-रो सेवा सुरू होत आहे. विजयदुर्ग हे शिलाहारकालीन शहर असल्याचे पुरातन पुरावे आहेत. 17 व्या शतकात चंद्रराव मोरेंचा पराभव करून शिवाजी महाराजांनी कोकणातील मुलूख काबीज केला, त्यात विजयदुर्गही होते. विजयदुर्ग बंदरातून ब्रिटिश काळातही जलवाहतूक होत होती. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सुरू होणारी ही सेवा आता शिमगोत्सवाच्या निमित्ताने सुरू होत आहे. या ऐतिहासिक सेवेचा शुभारंभ कोकणचे पुत्र असलेले मत्स्य आणि बंदर विकासमंत्री नितेश राणे हे स्वत: प्रवास करून करणार आहेत. या सेवेला भरभरून साथ द्यायला हवी.