कोकणचा निर्मितीकार अशी ओळख असलेले परशुराम यांनी कधीकाळी समुद्र हटवून या प्रदेशाची निर्मिती केल्याचा इतिहास आहे; पण याच प्रदेशातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग निर्माण करण्यात 14 वर्षे अपुरी ठरली आहेत. अगदी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापासून आताचे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यापर्यंत सर्वांकडून आश्वासने अनेकदा मिळाली. 14 वर्षांत 1,400 पेक्षा अधिक मृत्यूचा काळा इतिहास यामागे पाहायला मिळत आहे. किमान आता तरी हा प्रश्न सुटेल, अशी आशा आहे. एकूण 550 कि.मी. लांबीच्या महामार्गाचा सुमारे 200 कि.मी.चा टप्पा अपूर्ण आहे. या कामाला गती मिळो हीच इच्छा..!
मुंबई-गोवा महामार्गाचे जुने दुखणे मागच्या पानावरून पुढे सुरूच आहे. काँग्रेस सरकारमध्ये त्यावेळचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण ते आताचे नव्याने झालेले सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यापर्यंत या प्रवासाने एक तपापेक्षा जास्त काळ पूर्ण केला आहे. अलीकडेच केंद्रीय दळणवळणमंत्री गडकरी यांनी हा महामार्ग पूर्ण करण्याची वाढीव मुदत मे महिन्याची दिली आहे; तर मंत्री भोसले यांनी डिसेंबरअखेरीस हा महामार्ग पूर्ण होईल, असे सांगितले आहे. सुरुवातीला 18 हजार कोटी खर्चाच्या या महामार्गाची किंमत आता चौपट झाली आहे. तरीही रायगडमध्ये वडखळ ते माणगाव आणि रत्नागिरीमध्ये खेड ते संगमेश्वर हा टप्पा रखडलेला आहे. विशेषत:, माणगाव बायपास जो सुमारे 15 कि.मी.पर्यंतचा आहे, तो पूर्णत: ठप्प आहे. इंदापूर ते माणगाव असा हा बायपास आहे.
मुख्य शहर वगळून महामार्ग बाहेरून काढण्याची रचना केली आहे. मात्र, ठेकेदाराने काम न केल्याने आणि संपादित जमीनमालक न्यायालयात गेल्याने हे काम रखडले आहे. यात आनंद मानावा अशी बाब म्हणजे, कशेडी हा सुमारे अडीच किलोमीटर बोगदा पूर्ण झाल्याने अपघात प्रवण कशेडी घाटाचा प्रवास आता करावा लागणार नाही. दोन्ही बोगद्यांचे काम पूर्ण झाल्याने येथील वाहतूक तरी सुरळीत होईल. सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी या महामार्गाचा दौरा करून काम पुढे नेण्यासाठी पाऊल उचलले आहे. यापूर्वी रवींद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते. त्यापूर्वी हे खाते चंद्रकांत पाटील यांच्याकडे होते आणि त्याआधी अशोक चव्हाण अशा पाच मंत्र्यांनी या महामार्गाच्या कामामध्ये लक्ष घातले होते. तरीही एनकेनप्रकारेन हे काम रखडत राहिले. आता मे महिन्याची म्हणजे तीन महिने पुढची तारीख नव्या सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी दिली आहे. मात्र, रखडलेला माणगाव बायपास आणि चिपळूणजवळील परशुराम घाटाचे काम पूर्ण होण्यास डिसेंबर उजाडणार आहे.
एकूणच 550 कि.मी.च्या या महामार्गाचा 200 कि.मी.चा भाग या ना त्या कारणाने अपुरा आहे. पणजी ते खारेपाटण हा टप्पा पूर्ण झाला आहे. खारेपाटण ते रत्नागिरी या टप्प्याचे 95 टक्के काम झाले आहे. रत्नागिरी ते खेड यादरम्यान 75 टक्के काम झाले आहे, तर पोलादपूर ते वडखळ या टप्प्यात 80 टक्के काम झाले. हे अपूर्ण काम किमान सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्णत्वाला जाईल आणि यावेळी गणेशोत्सवाला चाकरमान्यांना निर्विघ्न प्रवास करता येईल, अशी आशा आहे. हा महामार्ग पूर्ण झाला, तर सध्या बारा तास जे प्रवासाला लागतात तो वेळ सहा तासांवर येणार आहे. त्यामुळे इंधन आणि वेळ याची मोठी बचत यातून होऊ शकणार आहे. म्हणून या महामार्गाच्या कामाकडे राज्य आणि केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. 14 वर्षांच्या वनवासानंतर तरी या महामार्गावरील प्रवासाचा वनवास संपेल, अशी आहे.