मुंबई-गोवा महामार्ग हा विषय गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक चर्चेचा बनला आहे, याचे मुख्य कारण 15 वर्षे रखडलेले काम हे आहे. पळस्पे ते इंदापूर हा 84 किलोमीटरचा टप्पा आता काँक्रिटीकरणाचा होणार आहे. खरे तर या टप्प्याचे काम सुरू झाले ते 2004 मध्ये. त्यावेळी हा डांबरीकरणाचा टप्पा होता. मात्र, या ना त्या कारणाने हे काम गेली 15 वर्षे रखडलेले आहे.
आता 414 कोटी रुपये नव्याने मंजूर करून काँक्रिटीकरण केले जाणार आहे. याचा प्रारंभ नुकताच केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी केला. पहिला टप्पा पूर्ण होण्यास 14 वर्षे झाली तरी मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे काँक्रिटीकरणाचा सुरू होणारा टप्पा नेमका कधी पूर्ण होणार? याची सर्वांनाच उत्सुकता असणार आहे. या टप्प्यावरील सुकेळी खिंड येथील काम आजही अपूर्ण आहे.
मुंबई-गोवा महामार्ग हा शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिश राजवटीत बांधला गेला होता. त्या काळातील काही पुले आजही अस्तित्वात आहेत. हा महामार्ग चौपदरीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेऊन 2004 चाली या कामाला सुरुवात झाली. त्यावेळी पुढील दोन वर्षांत हे काम होणे अपेक्षित होते. म्हणजे 2016 ला पहिला टप्पा पळस्पे ते इंदापूर पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, ते आजही रखडलेले आहे. त्यानंतरचा टप्पा इंदापूर ते झाराप याचा प्रारंभ 2016 ला झाला. परंतु, हे कामही आजपर्यंत पूर्ण झालेले नाही. ठेकेदारांना तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली, काही कंपन्या कामही सोडून गेल्या. परंतु, रखडलेले काम तसेच आहे. याचा परिणाम हा महामार्ग सध्या प्रवासाला अत्यंत धोकादायक झाला आहे. अपघातग्रस्त महामार्ग असेही वर्णन या महामार्गाचे केले जाते. याची परिणती कोकणची बहुतांशी वाहतूक ही आज मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वरून कोल्हापूर मार्गे होत आहे. आता टोल महागल्यामुळे कोकणवासीयांना हा मार्गसुद्धा वापरणे खर्चिक होणार आहे. एका बाजूला अपघाताची भीती तर दुसर्या बाजूला वाढलेल्या खर्चाची चिंता अशा दुहेरी कात्रीत हा प्रवासी आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या इंदापूर-झाराप हा जवळपास साडेचारशे किलोमीटरचा टप्पा आहे. रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू होऊ न जवळपास सहा वर्षे झाली आहेत. या कामाचा प्रारंभ दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनीच केला होता. परंतु, हे काम आजही अपूर्ण आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव ते पोलादपूर या टप्प्याचे काम अपूर्ण आहे. तर दुसर्या बाजूला रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी ते लांजा हा टप्पाही अपूर्ण आहे. अपूर्ण असलेले काम हे जवळपास 250 किलोमीटरचे आहे आणि पुढील 150 किलोमीटरचा टप्पा हा पूर्ण झाला आहे. मात्र, अपुर्या रखडलेल्या कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अपघात होत असल्याने या महामार्गाचे नामकरण अपघातांचा महामार्ग, असे झाले आहे. आता नव्याने पळस्पे ते इंदापूर या टप्प्याचे काँक्रिटीकरण सुरू होत असताना जुना अनुभव लक्षात घेऊ न क्षमता असलेले ठेकेदारच नेमणे गरजेचे आहे.
मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणवासीयांच्या द़ृष्टीने महत्त्वाचा महामार्ग आहे. गेली 200 वर्ष या महामार्गावरून कोकणची नाळ जोडली गेलेली आहे. एका बाजूला कोकणातील सागरी महामार्ग 'ग्रीनफील्ड महामार्ग' अशा नव्या महामार्गाची घोषणा झाली आहे आणि दुसर्या बाजूला जो महामार्ग गेली 200 वर्षे कार्यरत आहे तो गेली पंधरा वर्षे रखडलेला आहे. हा विरोधाभास संपवण्यासाठी तरी या महामार्गाच्या कामाकडे लक्ष देण्याची गरज आहे. मुंबई आणि कोकण यांचे नाते वर्षानुवर्षाचे आहे. ज्यावेळी महामार्ग अस्तित्वात नव्हता, त्यावेळी सागरी वाहतुकीने मुंबई-कोकण जोडले गेले होते, भाऊचा धक्का ते गोव्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर जलवाहतूक चालायची. त्यानंतर ब्रिटिशकाळात या मुंबई गोवा महामार्गाची निर्मिती झाली.
त्यामुळे कोकण आणि मुंबईचे नाते हे अधिक द़ृढ झाले. आता रखडलेल्या महामार्गाच्या कामामुळे दळणवळणाच्या असलेल्या सुविधांवर मोठा परिणाम झाला आहे. या रखडलेल्या महामार्गाच्या कामाला किमान आता तरी गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ अधिवेशनात या महामार्गाची एक मार्गिका येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. तर पुढील वर्षात या महामार्गाचे काम पूर्ण होईल, अशी ग्वाही दिली आहे. आता जर या कामाला गती दिली तरच हे आश्वासन पूर्ण करता येणे शक्य आहे. एका बाजूला केंद्रीय दळणवळण मंत्र्यांनी काम पूर्ण होण्याची ग्वाही दिली आहे तर दुसर्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री या दोघांनीही काम पूर्ण होण्याची हमी दिली आहे. त्यामुळे किमान पुढील वर्षी तरी हे काम पूर्ण होईल, अशी आशा करायला हरकत नाही.
– शशिकांत सावंत