युवराज इंगवले
लग्न हा माणसाच्या आयुष्यातील महत्त्वाचा संस्कार मानला जातो. मग, त्याला सामान्य माणसापासून अगदी उच्च पदावरील व्यक्ती अपवाद नसते. युगांडाचे लष्करप्रमुख जनरल मुहुझी काईनरुगाबा यांनी तुर्किये देशाकडे दोन मागण्या केल्या आहेत. पहिली मागणी म्हणजे, सोमालियामध्ये इस्लामिक दहशतवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी युगांडाने दिलेल्या दीर्घकालीन लष्करी योगदानाबद्दल 1 अब्ज डॉलर्सची भरपाई द्यावी. दुसरी मागणी खूपच विनोदी असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ती मागणी म्हणजे, तुर्कियेतील सर्वात सुंदर महिला पत्नी म्हणून देण्यात यावी.
काईनरुगाबा हे युगांडाचे राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांचे पुत्र आहेत. नुकतेच त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये तुर्कियेवर सोमालियातील पायाभूत सुविधा प्रकल्प, तसेच मोगादिशूतील बंदर आणि विमानतळ संचालनातून लाभ घेतल्याचा आरोप केला. त्याचवेळी युगांडाने जवळपास दोन दशकांपासून अल कायदा संलग्न अल शबाब या दहशतवादी संघटनेविरुद्ध लढण्यासाठी मोठा सुरक्षा भार उचलला आहे, असे त्यांनी म्हटले. त्यांनी 1 अब्ज डॉलर्स ‘सुरक्षा लाभांश’ म्हणून मागितले आणि त्यासोबत वैयक्तिक विवाहाची मागणीही जोडली.
त्यांच्या पोस्टमध्ये ते म्हणतात की, तुर्कियेने 1 अब्ज डॉलर्सच्या वर द्यावे आणि मला त्या देशातील सर्वात सुंदर महिला पत्नी म्हणून हवी आहे! जर 30 दिवसांत ही मागणी पूर्ण झाली नाही, तर गंभीर राजकीय परिणाम होण्याची धमकी काईनरुगाबांनी दिली आहे. यामध्ये युगांडाची राजधानी कंपालातील तुर्कियेचे दूतावास बंद करण्याचाही समावेश आहे. तसेच तुर्किश एअरलाईन्सला युगांडाच्या हवाई क्षेत्रात उड्डाण करण्यास बंदी घालण्याची आणि तुर्कियेशी सर्व राजनैतिक संबंध तोडण्याची धमकी दिली आहे. ते म्हणतात की, तुर्किये आमच्या समस्यांकडे लक्ष देत नसेल, तर आम्ही 30 दिवसांत त्यांच्याशी राजनैतिक संबंध तोडू. त्यांनी युगांडा-तुर्किये संबंध खूपच गंभीर वळणावर असल्याचे सांगत सर्व युगांडावासीयांना तुर्कियेत प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, त्यांनी इस्रायलला पाठिंबा देत, मी माझ्या नेतृत्वाखाली 100000 युगांडन सैनिक इस्रायलमध्ये पाठवण्यास तयार आहे, असेही म्हटले आहे. काईनरुगाबांनी तुर्कियेकडे केलेल्या मागणीला मोठा विरोध होत असला, तरी अशा विचित्र आणि महिलांचा अवमान करणार्या मागण्या करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नाही.
ऑक्टोबर 2022 मध्ये त्यांनी ‘जगातील सर्वात सुंदर गायी’ असे वर्णन करत 100 अँकोले गायी इटलीला देऊन इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना लग्न करण्याची ऑफर दिली होती. रोमन लोकांनी आमच्या गायी नाकारल्या, तर आम्हाला रोम जिंकावे लागेल, अशी धमकीही त्यांनी दिली होती. या वक्तव्यानंतर त्यांच्या वडिलांनी राष्ट्राध्यक्ष मुसेवेनी यांनी त्यांच्या वतीने माफी मागितली होती आणि इतर देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केल्याबद्दल त्यांना फटकारलेही होते. तसेच 2022 मध्ये काईनरुगाबा यांनी केनियावर आक्रमण करण्याची धमकी दिली होती, ज्यामुळे त्यांना काही काळासाठी पदावरून हटवण्यात आले होते. एका देशाचा लष्करप्रमुख आणि राष्ट्राध्यक्षाचा पुत्र असलेल्या काईनरुगाबा यांचे वक्तव्य म्हणजे बालिशपणाचे लक्षणच मानावे लागेल.