पृथ्वीवर डासांची उत्पत्ती 30 दशलक्ष वर्षांपूर्वी झाली आहे Pudhari File Photo
संपादकीय

डासांची उत्पत्ती 30 दशलक्ष वर्षांपूर्वीची

देशभरात ‘झिका’चा प्रसार होऊ नये म्हणून विशेष खबरदारी

पुढारी वृत्तसेवा
उदय कुलकर्णी

देशभरात ‘झिका’चा प्रसार होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना नुकत्याच केंद्र सरकारने जारी केल्या आहेत. केवळ महाराष्ट्राचा विचार केला तर गेल्या काही दिवसांत ‘झिका’चे 8 रुग्ण मिळून आले आहेत. त्यांपैकी सात पुण्यातील, तर एक कोल्हापुरातील आहे! दुसरीकडे डेंग्यूच्या रुग्णांची संख्या पावसाळ्यामुळे वाढत आहे. या आजाराच्या लक्षणांमध्ये बदल होत असल्याचे कोल्हापुरातील वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याचाच अर्थ डेंग्यूच्या विषाणूंमध्ये म्युटेशनने बदल होत आहे, असा लावला जातो आहे.

उत्सुकता वाटली आणि डासांची माहिती जमवण्याचा प्रयत्न केला. लक्षात आले की, पृथ्वीवर डासांची उत्पत्ती 30 दशलक्ष वर्षांपूर्वी झाली आहे आणि मानवी संस्कृती निर्माण होऊन आता कशीबशी 6 हजार वर्षे होत आहेत. डासांच्या पृथ्वीवर साधारण 3700 जाती आहेत. यापैकी माणसांना त्रास देणार्‍या व संसर्ग पोहोचविणार्‍या जाती केवळ 6 आहेत. या जातींपैकी नर डास माणसाला फारसे चावत नाहीत. चावतात त्या माद्या. आयुष्याचा कालावधी पाहायचा तर त्यातही माद्या नरांना वरचढ आहेत. नर डासाचे आयुष्य 10 ते 12 दिवसांचे असते आणि मादी डास 6 ते 8आठवडे म्हणजे दोन महिने जगू शकतो. अंडी घालण्यासाठी डासाला जी प्रथिने हवी असतात, ती माणसाच्या रक्तातून सहजपणाने मिळू शकतात म्हणून या माद्या माणसांना चावतात.

डासांचा बंदोबस्त करण्यासाठी टेनिस रॅकेटसारख्या रॅकेटपासून रिपेलंटपर्यंत अनेक गोष्टी बाजारात उपलब्ध आहेत. आपण त्यांचा वापर करतोही; पण तरीही डास पूर्णपणे नष्ट झाले असे होत नाही. तुम्हीच सांगा, तुम्ही एका रात्री किती डास मारू शकता? डासांची मादी दोन महिन्यांच्या आयुष्यात किमान तीन वेळा अंडी घालते व ती अंडी घालते, तेव्हा त्या अंड्यांची संख्या 10-20 नव्हे, तर एका वेळी 300 इतकी असते. म्हणजे डासांची एक मादी 1 हजार नवे डास जन्माला घालत असते. साहजिकच डासांचा बंदोबस्त करण्याचे प्रयत्न अपुरे पडतात. एखादी डासाची मादी डेंग्यू किंवा झिकासारख्या आजाराने बाधित व्यक्तीला किंवा जनावराला चावते, तेव्हा ते विषाणू मादीत प्रवेश करतात. 8 ते 12 दिवसांनंतर ही मादी अन्य माणसाला चावली तर त्यामुळे त्या व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो. डास मारण्यासाठी अगरबत्ती लावली तरी डास मरतातच असे नाही, कारण पहिल्या टप्प्यात या अगरबत्तीच्या धुराने डास बेशुद्ध होतात; पण खोलीत हवा खेळती असेल, तर धुराची घनता कमी होऊन प्राणवायू मिळाला की, बेशुद्ध झालेले डास पुन्हा शुद्धीवर येतात.

रिपेलंटच्या बाबतीतही हेच आहे. रिपेलंटमध्ये विषारी रसायने असतात आणि दारे-खिडक्या बंद करून रिपेलंट लावल्यास त्याचा माणसांना त्रास होऊ शकतो आणि त्रास होऊ नये म्हणून दारे-खिडक्या उघड्या ठेवल्या तर डास पळून जातात. संसर्ग हा भाग वेगळा; पण एकाच वेळी डासांनी तुमच्यावर हल्ला केला तर डासांच्या रक्त शोषण्यामुळे तुमचा मृत्यू होऊ शकतो का? शरीराच्या एका चौरस इंचावर 680 डास एका वेळी चावले, अशा पद्धतीने संपूर्ण शरीरभर डास चावले तरच माणसाचा मृत्यू ओढवण्यासारखा प्रकार घडू शकतो; पण प्रत्यक्षात तसे कधी घडत नाही. जगामध्ये डासमुक्त असलेला असा एक तरी देश आहे का? डासांनी भंडावून सोडले म्हणून त्या देशात आपल्याला राहता येईल का? असा जगातएकच देश आहे आणि तो म्हणजे आईसलँड. त्या देशात डास का नाहीत, याचा शोध अजूनही घेतला जातो आहे. मुख्य भाग असा की, वातावरणातील बदल व जागतिक तापमानवाढीमुळे या देशातही डासांची उत्पत्ती सुरू होईल का, अशी भीती आता संशोधकांना वाटत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT