पहिला चहा | मूषक पार्टी झिंदाबाद 
संपादकीय

पहिला चहा | मूषक पार्टी झिंदाबाद

पुढारी वृत्तसेवा

एका जुन्या जीर्ण वाड्यातील बिळांच्या प्रशस्त जागेत उंदीर समुदायाची अखिल भारतीय सभा भरली आहे. उंदीर समाजाचे मान्यवर आणि प्रतिष्ठित उंदीर नेते उपस्थित आहेत. महामहोपाध्याय मूषकाचार्य, सम्राट मूषकसेन, गुदामजयतीर्थ मूषकश्रेष्ठी, युवा नेते मूषक रणवीर आदी नेत्यांसह वृद्ध, युवा मूषकांची भाऊगर्दी झाली होती. सभा पूर्ण भरताच मूषकाचार्य यांनी प्रस्तावना सुरू केली.

महामहोपाध्याय मूषकाचार्य : आपण प्राणीमात्रात सर्वोच्च कुळीचे आणि काय ही आमची दशा! क्षुद्र कीटकांनी आपल्यापुढे मजल मारावी आणि आम्ही नुसते बघत बसावे!

मूषक रणवीर : आचार्य, आपण सर्वोच्च कुळीचे म्हणविता. मग भलतेच काय सांगता!

आचार्य : बालका, गणेशाचे आपण वाहन. प्रथम आपणास नमस्कार. मग इतरांना.

रणवीर : ते पुराणातील ठीक. आधुनिक काळात तुमचे कर्तृत्व तरी काय?

आचार्य : काय ही नवी पिढी. तरुण मित्रा, मुंबईत जो स्वातंत्र्य लढा झाला, त्याचे केंद्रच आपण होतो ना!.

मूषकश्रेष्ठी : अहो, करायच्याच काय या कथा नि गोष्टी. आम्ही गुदामांचे राजे. या आमच्याकडे. हवे ते हवे ते हादडा. ते राजकारण चुलीत घाला ते.

रणवीर : थांबा, थांबा श्रेष्ठी, एक दिवस असा उजडेल की, तुमची गुदामे झुरळ आणि कसरी खाऊन टाकतील. .

मूषकसेन : काय म्हणतोस काय, रणवीर. आमचे सारे राज्यच खालसा होणार म्हणतोस?

रणवीर : आचार्य, तुमची उदाहरणे ठीक. पण सध्या आपले काहीच कर्तृत्व दिसत नाही.

आचार्य : रणवीरा, असे काय आभाळ कोसळले ते तर सांग.

रणवीर : आचार्य, झुरळ समाजाने आपली प्रचंड संघटना उभारली, सरकारला धक्का दिला आणि सारा तरुण त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. आपण असे काही केले का?

आचार्य : बरोबर बरोबर आहे. हा मुद्दा आमच्या ध्यानी नाही आला.

मूषकसेन : आचार्य, या तरुणाच्या मुद्द्यावर तत्काळ अ‍ॅक्शन घ्यायला पाहिजे.

सभेतून : होय, होय. ताबडतोब कृती करूया. मूषक समाजाचा विजय असो.

रणवीर : नुसत्या घोषणा नकोत. काम करा. सोशल मीडियावर पोस्ट टाका. अ. भा. मूषक जनता पक्ष दिल्लीपर्यंत गरजू दे नौबत.

आचार्य : वा, किती सोपी आहे ही युक्ती. चला तरुणांनो, वृद्धांनो, चला आपल्या पक्षाची धुमाळी उडवून देऊ या.

(सभेत जयजयकाराच्या घोषणा,

अ. भा. मूषक जनता पक्ष झिंदाबाद)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT