Monsoon Arrival 2026 | बळीराजाला दिलासा (Pudhari File Photo)
संपादकीय

Monsoon Arrival 2026 | बळीराजाला दिलासा

पुढारी वृत्तसेवा

अभूतपूर्व उष्णतेचा उन्हाळा अनुभवल्याने मान्सूनच्या आगमनाकडे महाराष्ट्र आगतिक होऊन डोळे लावून बसला होता. केरळमध्ये आगमन झाल्यानंतर सामान्यतः ८ दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो; पण यंदा जून महिन्याचा उत्तरार्ध सुरू होऊनही वरुणराजा रुसलेला होता. जागतिक पातळीवरील हवामानतज्ज्ञांकडून वर्तवण्यात येणारी सुपर अल निनोची शक्यता काळजी वाढवत होती. रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्यानंतर मृग नक्षत्रालाही पावसाने हजेरी न लावल्याने अन्नदाता पेरणीच्या चिंतेत होता. नागरी समाज उकाडा आणि पाणीटंचाईचे चटके सोसत होता. धोरणकर्ते दुष्काळ स्थितीचे नियोजन करत होते. या सर्वांना एकाच वेळी सुखावत मान्सून अखेरीस राज्यात दाखल झाला आणि चातकासारखी वाट पाहणारे सर्वच जण सुखावले.

अवघ्या २४ तासांमध्ये राज्याचा जवळपास ८० टक्क्यांहून अधिक भाग मान्सूनने व्यापला. बुधवारपर्यंत १०० टक्के भाग व्यापला असून पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यावरून मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू असल्याचे दिसते. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यास तळ गाठलेली धरणे पुन्हा खळाळू लागतील. यंदा मान्सून ६ जून रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला खरा; परंतु त्यानंतर अरबी समुद्रातील कमकुवत वारे आणि उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या उष्ण हवेमुळे तो तब्बल १३ दिवस रेंगाळला. हा खंड संपवून आता तो सक्रिय झाला आहे, ही दिलासादायक बाब. मान्सूनच्या प्रगतीचे हे चित्र जेवढे सुखावणारे आहे, तेवढेच ते सावध करणारेही आहे. उशिरा आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची पेरणी लांबणीवर पडली. आता पाऊस सक्रिय झाला असला, तरी शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी न करता जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्यावरच (किमान ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यावर) पेरणीचा निर्णय घेणे शहाणपणाचे ठरेल. कृषी विभागाने याबाबत सातत्याने मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. कारण, बियाणे आणि खतांचा खर्च पाहता छोट्या शेतकऱ्याला दुबार पेरणीचा फटका परवडणारा नाही.

दुसरीकडे शहरांमध्ये अतिवृष्टीच्या इशाऱ्यांचा वेध घेत आपत्ती निवारण विभागासह अन्य विभागांना तयार राहून नागरिकांनाही सातत्याने संदेश प्रणालींचा, माध्यमांचा वापर करून सजग राहण्याचे आवाहन करणे गरजेचे आहे. विशेषतः पुणे, मुंबईसारख्या महानगरांमध्ये प्रत्येक वर्षी पावसाळ्यात एखादी तरी मोठी दुर्घटना घडल्याचे दिसते. कारण, हवामान बदलांमुळे पावसाचा पॅटर्न बदलत चालला आहे. महिन्याभराचा पाऊस दोन ते तीन दिवसांत किंवा काही तासांत पडतो आणि पूरस्थिती निर्माण होते. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचे तापमान सातत्याने वाढत असल्यामुळे ढग वाहून नेण्याची आणि बाष्प धरून ठेवण्याची हवेची क्षमता बदलली आहे. परिणामी, अचानक एखाद्या विशिष्ट भागात ढगफुटीसदृश पाऊस होऊन हाहाकार माजतो. एकाचवेळी एका तालुक्यात पूर, तर शेजारच्याच तालुक्यात पावसाचा थेंबही नसतो. हवामानाचा हा लहरीपणा अंदाज वर्तवणाऱ्या यंत्रणांसाठीही मोठे आव्हान ठरत आहे. नागरी पाण्याचे नियोजन, धरणांचे दरवाजे उघडण्याचे नियम आणि शेतीचे वेळापत्रक हे जुन्या मान्सून पॅटर्नवर आधारित आहेत. अचानक येणाऱ्या महापुराला तोंड देण्यास शहरांमधील ब्रिटिशकालीन यंत्रणा किंवा जुनी ड्रेनेज प्रणाली सक्षम नाही.

बदलत्या काळात यांमध्ये सुधारणा कराव्या लागतील. पाऊस कधी येईल, कोणत्या भागात अतिवृष्टी होईल, याचा अंदाज बांधून चालणार नाही, तर बदलत्या पावसाशी कसे जुळवून घ्यायचे, याचे तंत्र शिकावे लागणार आहे. काँक्रीटचे साम्राज्य बनलेल्या शहरांमध्ये पावसाचे पाणी जमिनीत कसे मुरेल, पाण्याचा निचरा कसा होईल याचे आधुनिक नियोजन करावे लागेल. धरणांमधील साठा आणि विसर्ग याविषयी रिअल टाईम डेटा आणि एआयचा वापर करून पूर नियंत्रण यंत्रणा अधिक सक्षम करावी लागेल. महाराष्ट्रातील महत्त्वाचे धरण असणाऱ्या कोयना धरणात सध्या एकूण उपलब्ध पाणीसाठा १३.८४ टीएमसी, तर उपयुक्त पाणीसाठा ८.७२ टीएमसी आहे. हा पाणीसाठा पश्चिम महाराष्ट्रातील धरणांच्या एकूण क्षमतेपेक्षा जास्त आहे. यंदा मान्सूनचा अंदाज पाहता हे धरण पूर्ण भरणार की नाही, याबाबत साशंकता आहे. यंदा १ ते १६ जून पर्यंत राज्यात सामान्य सरासरीपेक्षा ७५ टक्के कमी पाऊस झाला. गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक कोरडा जून म्हणून या वर्षाची नोंद होईल.

२०२५ आणि २०२४ च्या तुलनेत यंदाची स्थिती चिंतानजक आहे. मेडन ज्युलियन ऑस्सिलेशन (एमजेओ) ही हवामान प्रणाली भारतीय मान्सूनच्या गतीवर आणि तीव्रतेवर थेट प्रभाव टाकते. ‘एमजेओ‌’च्या अनुकूल प्रभावामुळे यंदा अरबी समुद्रातून येणारे वारे अधिक वेगवान झाले आहेत. जूनच्या मध्यात मान्सून ज्या कमकुवत हवेच्या दाबामुळे रेंगाळला होता, ती कोंडी आता फुटली आहे. ढगांची घनता आणि गती वाढल्यामुळे मान्सूनचा पुढील प्रवास वेगाने होईल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या ज्या भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे, तिथे या अनुकूल प्रणालीमुळे मान्सून दाखल होण्यासाठी आणि सक्रिय होण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. आर्द्रा नक्षत्राच्या सुरुवातीलाच झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून खरीप पेरण्यांना गती मिळणार आहे.

पेरणी करू नये, जेणेकरून दुबार पेरणीचे संकट टाळता येईल. अल निनोचा प्रभाव असणाऱ्या वर्षातील मान्सूनचा इतिहास पाहिला असता उशिराचे आगमन, काही दिवसांच्या मध्यम वर्षावानंतर दडी मारणे हा लपाछपीचा खेळ चारही महिने सुरू राहतो, असे दिसते. या काळात शेतीचे मोठे नुकसान होते. कारण, पेरण्यासंदर्भातील निर्णयच नीटसे घेता येत नाहीत. कृषी खाते आणि हवामान खात्यावर यासंदर्भात मोठी जबाबदारी आहे. राज्यात सरासरीपेक्षा तब्बल ८५ टक्के कमी पाऊस झाला. गुजरातमध्ये ८४ टक्के पावसाची तूट आहे. मध्य प्रदेशात ५८ टक्के, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये ७१ टक्के आणि मेघालयात ८१ टक्के पावसाची घट आहे. ही तूट मोठी असून कृषी उत्पादनावर प्रतिकूल परिणाम करणारी आहे. पाणीटंचाईचे संकट कायम आहे. शहरांमध्ये पाणी कपात सुरू आहे. मान्सूनचे आगमन झाले की, पाणी कपात मागे घेतली जाते; पण त्याबरोबर पाणी वापराचे गांभीर्य मागे पडते आणि जल नियोजनातील काटेकोरपणा रेंगाळतो; पण यंदा अल निनोच्या पार्श्वभूमीवर असा हलगर्जीपणा पुढील काळातील अडचणी वाढवणारा ठरेल. त्यामु‍ळे पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवता कसा येईल आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर कसा करता येईल, याबाबत सर्वांनीच प्रयत्नशील राहायला हवे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT