संपादकीय

जिंदगी इम्तहान लेती है।

Arun Patil

दोनवेळच्या जेवणाचे पैसे ज्याच्याकडे नव्हते, जिथे जगण्याची भ्रांत होती, तिथे देशाचा सर्वोच्च मुलकी नोकरशहा बनण्याचे स्वप्न मोईन अहमद या जिगरबाज तरुणाने फुलवले. केवळ गरीब आहे म्हणून मी काहीच करू शकत नाही, अशी नकारात्मक भावना बाळगून हातपाय गाळून बसलेल्या तरुण-तरुणींनी मोईनपासून प्रेरित व्हावे, एवढे महान कार्य त्याने केले आहे. आयुष्यात ज्यांना काहीतरी भव्य-दिव्य करायचे आहे, परंतु परिस्थिती प्रतिकूल आहे, त्यांच्यासाठी मोईन अहमद हा एक आदर्श आहे.

'अगर किसी चीज को शिद्दत से चाहो, तो तुम्हे उसे मिलाने के लिए पुरी कायनात एक हो जाती है।' मोईन अहमद या आयएएस झालेल्या गरीब मुस्लिम तरुणाला ही म्हण लागू होते. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये बस ड्रायव्हर असलेल्या पित्याच्या या मुलाने शिक्षण गरिबीत घेतले. कॉलेजचे शिक्षणही जेमतेमच. हिंदी माध्यमातून तो शिकला. दिल्लीत वास्तव्यासाठी पैसे नव्हते म्हणून अडीच लाखांचे कर्ज काढले; परंतु प्रतिकूल परिस्थितीपुढे मोईनने हार पत्करली नाही. मुलकी सेवेच्या पूर्वपरीक्षेत तीनवेळा नापास होऊनही एखाद्या पहाडासारखा तो झुंजत राहिला आणि चौथ्या प्रयत्नात तो आयएएस झाला, तेही 296 वी रँक घेऊन. म्हणतात ना, 'झेपावणार्‍या पंखांना क्षितिज नसते!'

गरिबीत जगणारी माणसं आक्रमक असतात; कारण अस्तित्वासाठी ती संघर्ष करीत असतात. मानवी आक्रमकतेचा उगम अस्तित्वाच्या लढाईतच आहे. चार्ल्स डॉर्विनचा 'डॉर्विनिझम' सिद्धांतही हेच सांगतो. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सनदी अधिकारी होणार्‍या टॉपर विद्यार्थ्यांची नावे बघितली तर तुम्हाला यूपीएससीचा हिमालय पादाक्रांत करणार्‍या पिचलेल्या, परिस्थितीने गांजलेल्या तरुणांची भलीमोठी यादी दिसेल. त्यात तुम्हाला मनोजकुमार शर्मा दिसेल. पैशांसाठी आटाचक्कीत तासन् तास काम करणारा, शौचालय साफ करणारा, पेपरची रद्दी विकून मालकाला इमानदारीने पैसे देताना वारंवार चोर म्हणून अपमानित केला गेलेला आणि तरीही हिंमत न हारता प्रयत्नांची पराकाष्टा करून आयपीएस झालेला हा तरुण आता लाखोंचा प्रेरणास्रोत बनलेला दिसेल. याच जातकुळीतील आणखी एक नाव चमकत आहे- मोईन अहमद. आयएएस, पासिंग इयर 2022. रँक 296. जर आयएएस झाला नसता तर तो उत्तम क्रिकेटपटू नक्कीच बनला असता.

मुरादाबादमध्ये जन्मलेल्या मोईन यांचे कुटुंब सहा जणांचे. आई-वडील, एक बहीण आणि दोघे भाऊ. बस ड्रायव्हर असलेल्या वडिलांची महिन्याची कमाई जेमतेम 10 हजार रुपये. त्यामुळे मोईनने बारावीनंतर सन 2016 मध्ये मुरादाबादेत एक सायबर कॅफे सुरू केला. आयएएस अधिकारी बनण्याचा पक्का निर्धार त्याने केला होता. त्यामुळे सायबर कॅफे चालवताना त्यातून मिळणार्‍या मिळकतीतून त्याने काही पैशांची बचत केली होती. 2018 मध्ये मोईनने पहिल्यांदा यूपीएससीची पूर्वपरीक्षा दिली; परंतु तयारीसाठी केवळ सहा महिने अवधी मिळाल्याने पहिल्या प्रयत्नात तो नापास झाला. 2019 मध्ये त्याने दुसर्‍यांदा परीक्षा दिली. यावेळीही पूर्वपरीक्षेत त्याला यश आले नाही.

तिसर्‍या प्रयत्नातही हाती काही लागले नाही. इंग्रजीचे ज्ञान जेमतेम आणि उत्तर प्रदेशातील एका गावातून आलेला, त्यामुळे हिंदी भाषेवरच संपूर्ण परीक्षेची मदार होती. आता चौथा आणि शेवटचा एक प्रयत्न म्हणून नशीब आजमावण्याचा निर्णय मोईनने घेतला. पहाडाची छाती चिरण्याची ताकद ज्यांच्या मनगटात असते, ती माणसे नशीब आजमावत बसत नाहीत. हे साल होते 2021. यावेळी मोईनने थेट दिल्ली गाठली. द़ृष्टी आयएएस कोचिंगचे दार ठोठावले. पैशांच्या मागे धावणार्‍या बजबजपुरीत काही चांगली माणसे मोईनला भेटली. त्यात डॉ. विकास दिव्यकीर्ती यांचे नाव आदराने घ्यावे लागेल.

या विभूतीने मोईनला मोफत कोचिंग दिले. दिल्लीत ज्यांचे कोणी नाही, त्यांची वाली आहे 'अस्मिता'. अस्मिता योजनेतून गरीब विद्यार्थ्यांना दोन वेळच्या जेवणाची आणि राहण्याची मोफत व्यवस्था केली जाते. ही सोय मोईनची झाली; पण रोजच्या खर्चासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यासाठी त्याने अडीच लाखांचे कर्ज काढले आणि थेट भिडला. रात्रीचा दिवस करून, 'मॉक इंटरव्ह्यू' करीत, ग्रामीण विद्यार्थ्याच्या वर्तनातील चुका दुरुस्त करीत मोईन कामाला लागला. 2021 ते 2022 या दोन वर्षांत त्याने अभ्यासात सातत्य राखत प्रयत्नांची पराकाष्टा केली. दिल्लीच्या हिमालयाशी तो छातीचा कोट करून लढला आणि एकाच दमात त्याने पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा पास केली. याचवेळी त्याने मुलाखतीचे मैदानही मारले आणि आयएएस अधिकारी बनला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT