Smart Ring technology | डोक्यातील विचार टिपणारी स्मार्ट रिंग Pudhari File Photo
संपादकीय

Smart Ring technology | डोक्यातील विचार टिपणारी स्मार्ट रिंग

पुढारी वृत्तसेवा

आशिष शिंदे

आपल्या रोजच्या दैनंदिन धावपळीत अधूनमधून अनेकदा डोक्यात भन्नाट कल्पना, विचार चमकत असतात. रस्त्यावरून चालताना, प्रवासात, एखाद्या कॅफेत बसलेलो असताना किंवा अगदी ऑफिसमध्ये काम करत असताना अचानक डोक्यात एक कल्पना येते; पण त्यावेळी ना वेळ असतो, ना त्या कल्पनेवर विचार करण्याचा मूड. हातात मोबाईल असतो खरा; मात्र नोटस् उघडायचा कंटाळा येतो आणि ती भन्नाट कल्पना डोक्यातच संपते. यासाठीच लिओनार्डो दा विंची नेहमी आपल्या कमरेला वही अडकवून फिरत असे, अनुभव टिपण्यासाठी. सध्याच्या ‘गॅजेट वर्ल्ड’मध्ये अशी वही वगैरे कमरेला बांधण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही. कारण, एक अशी स्मार्ट रिंग तयार झाली आहे जी, बोटात घालताच तुमच्या डोक्यातील प्रत्येक कल्पना टिपेल.

या छोट्याशा रिंगमध्ये देण्यात आलेले हायटेक फिचर्स तुम्हाला थक्क करून सोडतील. अर्थात, सध्या सर्वांना ज्ञात असणार्‍या स्मार्ट रिंगसारखीच ही दिसते. कोणतीही स्क्रीन नाही, चमकधमक नाही; पण या साधेपणामागे दडलेले तंत्रज्ञान मात्र भन्नाट आहे. या रिंगमध्ये एक छोटासा मायक्रोफोन बसवण्यात आला आहे. तुम्ही रिंगवरील बटण दाबायचे आणि फक्त हळूच तुमचा विचार कुजबुजायचा. तो आवाज थेट फोनमध्ये सेव्ह होतो. कधी नोटस् म्हणून, कधी रिमाईंडर म्हणून, तर कधी फक्त एका यादीत साठवलेला विचार म्हणून. महत्त्वाची बाब म्हणजे, ही रिंग सतत तुमचे बोलणे रेकॉर्ड नाही करत. केवळ तुम्ही बटण दाबाल तेव्हाच ती सक्रिय होतेे, त्यामुळे प्रायव्हसीबाबत फारशी चिंता उरत नाही.

तुम्ही बटण दाबून हळूच तुमचा विचार बोललात की, तो आवाज डिजिटल ऑडिओ सिग्नलमध्ये रूपांतरित केला जातो. हा सिग्नल रिंगमध्ये तात्पुरता साठवला जातो आणि लगेचच ब्लूटूथद्वारे तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह होतो. या रिंगमध्ये कोणतीही स्क्रीन किंवा जड प्रोसेसर नाही. त्यामुळे बॅटरी वापर अत्यंत कमी होतो. रिंग फक्त आवाज टिपण्याचे आणि पाठवण्याचे काम करते. आवाजाचे टेक्स्टमध्ये रूपांतर, रिमाईंडर सेट करणे किंवा नोटस् तयार करणे ही सर्व प्रक्रिया फोनवरील सॉफ्टवेअरमध्ये होते.ही स्मार्ट रिंग विशेषतः लेखन करणारे, क्रिएटिव्ह काम करणारे, उद्योजक किंवा सतत नवीन कल्पना सुचणार्‍या लोकांसाठी उपयुक्त ठरू शकते. ही स्मार्ट रिंग तुमच्या बोटात घातल्यानंतर चालता चालता, पाळीव प्राण्याला फिरवताना, कॉफीचा मग हातात असतानाही डोक्यातील एकही कल्पना निसटणार नाही. हेच या रिंगचे मोठे वैशिष्ट्य आहे.

या रिंगची आणखी एक खास बाब म्हणजे, याला चार्जिंगची झंझट नाही. बहुतांश स्मार्ट गॅजेटस्प्रमाणे रोज चार्ज करा, नोटिफिकेशन येईल तेव्हा बॅटरी संपलेली असेल, असे प्रकार इथे नाहीत. या रिंगची बॅटरी वर्षानुवर्षे टिकते. त्यातच कोणतेही मासिक सबस्क्रिप्शन नाही. इंटरनेट नसले तरीही ही रिंग काम करते. यामध्ये म्युझिक कंट्रोल करणे, फोटो काढणे अशा सुविधादेखील आहेत. आता याच्या किमतीबाबत बोलायचे झाले, तर सध्या ही स्मार्ट रिंग प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असून, किंमत सुमारे 99 डॉलर म्हणजेच 8 हजार 250 रुपयांच्या घरात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT