Israel-Hamas War  (File Photo)
संपादकीय

मध्यपूर्वेतील भडका

पुढारी वृत्तसेवा

इस्रायलचे गाझापट्टीतील हमासविरुद्धचे युद्ध किंचित निवळत असतानाच आता इस्रायल विरुद्ध इराण संघर्ष पुन्हा पेटला आहे. अणू कार्यक्रम थांबवावा, यासाठी अमेरिकेने केलेले आवाहन इराणने धुडकावून लावले. आमच्या अणू कार्यक्रमाबद्दलचा निर्णय आम्ही घेऊ. इतरांनी त्यात नाक खुपसू नये, ही इराणची भूमिका. या पार्श्वभूमीवर इस्रायलने इराणच्या आण्विक आणि क्षेपणास्त्र तळांनाच लक्ष्य केले. या हल्ल्यात इस्रायलच्या दोनशेहून अधिक लढाऊ विमानांचा समावेश होता. ‘मोसाद’ या इस्रायलच्या गुप्तचर संस्थेने स्फोटकांनी सज्ज ड्रोन हल्ल्याआधीच इराणमध्ये पेरून ठेवले. हल्ल्यानंतर तेहरानजवळील क्षेपणास्त्र प्रक्षेपकांना निकामी करण्यासाठी हे ड्रोन सक्रिय करण्यात आले. अजूनही हल्ले सुरूच आहेत. इराणमधील नतांज येथील आण्विक सुविधा केंद्रासह इतर प्रमुख लक्ष्ये भेदण्यात आली. हल्ला कमालीचा यशस्वी झाल्याचा दावा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केला असून, इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र यंत्रणेला उद्ध्वस्त केले, असे त्यांनी म्हटले आहे. इस्रायलने हा आक्रमक पवित्रा का धारण केला, असा प्रश्न कोणाच्याही मनात येईल; पण इराणचा आण्विक कार्यक्रम इस्रायलच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करणारा आहे, असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे.

इस्रायलचे आगामी नियोजित हल्ले टाळायचे असतील, तर इराणने अणू कार्यक्रमाबाबत अमेरिकेशी करार करावा, अन्यथा सर्वच संपुष्टात येईल आणि इराणच शिल्लक राहणार नाही, अशी उघड धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. इराणनेही इस्रायलची राजधानी तेलअवीवसह महत्त्वाच्या शहरांवर हल्ले केले. त्यासाठी 100 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वापर केला गेला. जेरुसलेम शहरावरही ड्रोन हल्ले करण्यात आले. उलट इराणचे ड्रोन पाडल्याचा दावा इस्रायलने केला. इराणने प्रत्युत्तरात्मक कारवाईला ‘ऑपरेशन टू प्रॉमिस-3’ असे नाव दिले आहे. अण्वस्त्र प्रसारबंदी विषयक कोणतेही निर्बंध इराण पाळत नसल्याचे ‘इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सी’च्या (आयएईए) बोर्ड ऑफ गव्हर्नन्सने नुकतेच ठरावाद्वारे जाहीर केले आहे. इराण तीन ठिकाणी गुप्तपणे अण्वस्त्र विकसित करत असल्याचे आयएईएच्या तपासात आढळून आले. इराण अण्वस्त्रसज्ज झाल्यास इस्रायल संकटात सापडू शकतो म्हणून त्याआधीच हे हल्ले केल्याचा युक्तिवाद इस्रायलने केला आहे.

नतांज येथील आण्विक पायाभूत व्यवस्थांचे जबरदस्त नुकसान इस्रायलने केले. अर्थात, त्यामध्ये जेथे युरेनियम समृद्ध केले जाते, अशा सेंट्रिफ्युज हॉल्सची हानी झाली की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. तसेच फोर्डो येथील आण्विक समृद्धीकरणाचा प्रकल्प अद्याप इस्रायलच्या हल्ल्याचे लक्ष्य ठरलेला नाही. हा संपूर्ण प्रकल्प भूमिगत असून, त्याला हानी पोहोचवणे तसे कठीण आहे; मात्र तीन प्रमुख सेनाधिकार्‍यांना ठार मारण्यात आल्यामुळे इराणच्या लष्करात पोकळी निर्माण झाली आहे. शिवाय, इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाशी संबंधित दोन वैज्ञानिकांनाही ठार मारण्यात आले. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी अमेरिकेसोबत बोलणी करण्यासाठी ज्यांची नियुक्ती केली होती, ते बडे राजकीय नेते अली शमखानी यांचीही इस्रायलने हत्या केली. इराणचे अणुसंशोधन केंद्र आणि महत्त्वाच्या लष्करी आस्थापना भस्मसात करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

थोडक्यात, इराणच्या इस्लामिक सत्तेसमोरचे हे सर्वात मोठे संकट आहे; मात्र त्यामुळे इराणचे लष्करी सामर्थ्य खामेनी दावा करतात, तेवढे नाही, हे स्पष्ट झाले आहे. यापूर्वीही इस्रायलने इराणवर हल्ले केले होते आणि इराणच्या मर्यादा दाखवून दिल्या होत्या. इतिहासात डोकावले, तर लक्षात येईल की, 14 मे 1948 रोजी इस्रायलने स्वतंत्र प्रजासत्ताकाची स्थापना केली आणि पॅलेस्टिनींना आपल्याच भूमीवरून हुसकावून लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर भोवतालचे जॉर्डन, सीरिया, इजिप्त आदी देश पॅलेस्टिनींच्या मदतीसाठी पुढे आल्यावर घमासान युद्ध सुरू झाले आणि ते 1949 अखेरपर्यंत चालले. अमेरिका-बि—टनचा वरदहस्त मिळालेल्या इस्रायलने या युद्धात 77 टक्के भूभागावर ताबा प्राप्त केला. झायोनिस्ट ज्यू व ख्रिश्चनांच्या धारणांच्या अनुषंगाने इस्रायलची निर्मिती झाली, तरी साम—ाज्यवादी अमेरिका-बि—टनची रणनीती त्यामागे दडलेली होती. पश्चिम आशियात इस्रायलच्या रूपाने एक शक्ती उदयास आली. आशियातील राजकारणावर व तेलसाठ्यांसारख्या नैसर्गिक स्रोतांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकेसारख्या देशास एकप्रकारे तेथे तळच निर्माण करता आला. इस्रायल-अमेरिकेची मैत्री तेव्हापासूनची आहे. वास्तविक, इस्रायलने केलेल्या या हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी सूचित केले आहे. उलट ट्रम्प यांनी मात्र इराणला चांगलाच धडा शिकवला, असे म्हणत नेतान्याहूंचे कौतुक केले आहे.

अर्थात, ट्रम्प पर्वात अमेरिकेतील विविध नेत्यांच्या वक्तव्यांमधील विसंगती नेहमीच प्रकट होत आहेत. हमासने इस्रायलवर हल्ला केला, त्याचा बदला म्हणून इस्रायलने गाझापट्टीत एवढा विध्वंस केला की, त्यात हजारो सामान्य नागरिकही भरडले गेले. वास्तविक, 2015 मध्ये इराण आणि संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा मंडळाच्या पाच सदस्यांमध्ये सहमती झाली होती; पण त्यावेळी इस्रायलच्या नादी लागून ट्रम्प यांनी इराणसोबतच्या आण्विक करारातून बाहेर पडण्याचा चुकीचा निर्णय घेतला. वाटाघाटी करून नाही, तर सत्तापालट करूनच इराणमध्ये योग्य ते परिवर्तन घडेल, अशी ट्रम्प आणि नेतान्याहू यांची भूमिका आहे. वाटाघाटी, सहमती आणि आंतरराष्ट्रीय संस्था व संघटनांचा दबाव या माध्यमातूनच शांतता निर्माण होऊ शकते. युद्धखोरीतून परस्परांची हानी तर होतेच, त्याचे परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थांवर होत असतात. त्याची सुरुवात झालेली दिसते. खनिज तेलाचा भडका उडाला असून, शेअर बाजार कोसळले आहेत. तेलाचे भाव वाढल्यानेे आंतरराष्ट्रीय व्यापारात बाधा येण्याचा धोका संभवतो. जागतिक अर्थव्यवहारांना त्याची मोठी झळ बसू शकते. युद्धामुळे होणारा विनाश मानवजातीवर भरून न येणारे घाव सोडत असतो. या स्थितीत अण्वस्त्रधारी इराणच्या महत्त्वाकांक्षेला आणि इस्रायलच्या युद्धखोरी धोरणाला वेसण घालण्याचे मोठे आव्हान आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT