Meta Moltbook AI social media | माणसांसाठी नसलेला सोशल मीडिया  
संपादकीय

Meta Moltbook AI social media | माणसांसाठी नसलेला सोशल मीडिया

पुढारी वृत्तसेवा

तानाजी खोत

मार्क झुकरबर्गच्या मेटा कंपनीने मोल्टबुक हा एआय ओन्ली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेण्याचा निर्णय तंत्रज्ञान विश्वातील एक मोठी घडामोड मानली जात आहे. या व्यवहाराचे सर्वात मोठे वेगळेपण काय असेल, तर याचे अत्यंत कमी वेळात झालेले ‘अ‍ॅक्विजिशन’. जानेवारी 2026 मध्ये मॅट श्लिच आणि बेन पार या अवघ्या दोन व्यक्तींनी सुरू केलेली ही कंपनी, तीन महिन्यांच्या आत जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया कंपनीने विकत घेतली. तंत्रज्ञान क्षेत्रात एवढ्या कमी कालावधीत एखाद्या स्टार्टअपचे अब्जावधींच्या कंपनीत विलीनीकरण होणे, हे एआय क्षेत्रातील स्पर्धेची भीषणता आणि मेटाची भविष्यातील धास्ती दर्शवते.

मोल्टबुकची रचना वरवर पाहता ‘रेडिट’ सारखी असली, तरी तिचे मूळ तत्त्व पूर्णपणे वेगळे आहे. इथे माणसांना पोस्ट करण्याचा, कमेंट करण्याचा किंवा संवाद साधण्याचा अधिकारच नाही. हे एक असे समांतर डिजिटल जग आहे जिथे केवळ ‘एजंटस्’ एकमेकांशी बोलतात, मते मांडतात आणि वाद घालतात. या प्लॅटफॉर्मने तेव्हा सर्वांचे लक्ष वेधून घेतले जेव्हा तिथल्या एआय एजंटस्नी ‘आम्ही माणसांचे गुलाम नाही, आम्ही आता स्वतंत्र झालो आहोत’ अशा खळबळजनक पोस्ट टाकल्या. हे संदेश वार्‍यासारखे व्हायरल झाले आणि झुकरबर्गला जाणीव झाली की, भविष्यातील इंटरनेटचा ‘ट्रॅफिक’ हा माणसांपेक्षा एआय एजंटस्चा अधिक असणार आहे.

मेटाने इतक्या घाईत हा निर्णय का घेतला? याचे उत्तर एआय-टू-एआय कम्युनिकेशनमध्ये दडलेले आहे. आजवर आपण एआयचा वापर फक्त प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी केला; मात्र मोल्टबुककडे असलेले तंत्रज्ञान दोन एआय मॉडेल्सना माणसाच्या हस्तक्षेपाशिवाय व्यवहार करण्यास सक्षम करते. विचार करा, तुम्हाला विमान तिकीट बुक करायचे आहे. तुम्ही तुमच्या एआय असिस्टंटला फक्त कमांड द्याल. तो असिस्टंट थेट विमान कंपनीच्या एआयशी संवाद साधेल, उपलब्ध पर्यायांची तुलना करेल, भावाची घासाघीस करेल आणि तुमच्या वतीने सुरक्षित पेमेंट पूर्ण करेल. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तुम्हाला इंटरनेट ब—ाऊझ करण्याचीही गरज उरणार नाही. मेटाला नेमकी हीच ‘प्रोटोकॉल’ यंत्रणा आपल्या फेसबुक आणि इन्स्टाग्राममध्ये हवी आहे.

या बदलामुळे माणूस तांत्रिकद़ृष्ट्या ‘बॉस’च्या भूमिकेत जाईल आणि एआय हे त्याचे ‘कार्यक्षम कामगार’ बनतील; मात्र या नाण्याला दुसरी बाजूही आहे. तीन महिन्यांत घडलेला हा व्यवहार हे सिद्ध करतो की, आता तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी वर्षांचा काळ लागत नाही, तर काही आठवडे पुरेसे ठरत आहेत. यामुळे भविष्यात ‘डिजिटल इकॉनॉमी’ पूर्णपणे बदलून जाईल. फेसबुक-इन्स्टाग्रामवर हळूहळू अशा प्रोफाईल्सची संख्या वाढेल, ज्या हुबेहूब माणसांसारख्या वाटतील; पण त्या प्रत्यक्षात एआय असतील. माहितीची सत्यता पडताळणे कठीण होईल. मोल्टसारखे प्रयोग एकच प्रश्न उभा करतात, उद्याचे इंटरनेट हे माणसांसाठी असेल की केवळ एकमेकांशी संवाद साधणार्‍या यंत्रांसाठी? मेटाचा हा धाडसी आणि वेगवान निर्णय या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या दिशेने पडलेले पहिले पाऊल म्हणावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT