मकर संक्रांतीच्या निमित्ताने सूर्याच्या उत्तरायणासोबतच माणसाच्या जीवनातही सकारात्मकतेचे, गोडव्याचे आणि नव्या सुरुवातीचे पर्व सुरू होते.
कॅलेंडरीय नववर्षामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांतीचा सण म्हणजे भारतीय संस्कृतीतील चैतन्याचा आणि मांगल्याचा एक आगळावेगळा उत्सव होय. हिवाळ्याच्या कडाक्याच्या थंडीत निसर्ग निस्तब्ध झालेला असताना सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि मकर संक्रांतीचे आगमन होते. खगोलशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि सामाजिक सौहार्द यांचा एक अपूर्व संगम म्हणून या सणाकडे पाहिले जाते. भारतीय पंचांगानुसार मकर संक्रांत दरवर्षी साधारणपणे 14 किंवा 15 जानेवारीलाच येते. याचे गणित सौर स्थितीवर आधारित असते. सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याला मकर संक्रांत असे संबोधले जाते.
मकर संक्रांतनिमित्ताने होणारे सूर्याचे हे संक्रमण सर्वदूर उत्साहात साजरे केले जाते. या दिवसापासून दिवस मोठा होऊ लागतो आणि रात्र लहान होऊ लागते. थंडीच्या दिवसात मानवी शरीरातील जठराग्नी प्रदीप्त झालेला असतो आणि शरीराला अधिक उष्णतेची गरज असते. अशावेळी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तीळ आणि गूळ यांसारख्या स्निग्ध पदार्थांचे सेवन करण्याची परंपरा पूर्वजांनी अत्यंत विचारपूर्वक आखली आहे. तीळ हे उष्ण गुणधर्माचे असतात आणि त्यामध्ये मुबलक प्रमाणात तेल असते, तर गूळ हा शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतो. या दोन्ही घटकांच्या मिश्रणातून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हिवाळ्यातील कोरड्या हवेपासून त्वचेचे संरक्षण होते. कोणतेही शुभ कार्य उत्तरायणात करावे, असा एक संकेत आहे. एक सण आणि एक पुण्यपर्व म्हणून मकर संक्रातीला फार महत्त्व आहे. उत्तरायणाचा आरंभदिन म्हणून संक्रातीला अयन संक्रांत असेही नाव आहे.
मकर संक्रांतीला मकर संक्रांतदेवीची पूजा केली जाते. हे देवीचे रौद्ररूप आहे. ही देवी एखाद्या वाहनावर बसून येते. वाहनासोबत ती अवस्था, शस्त्र, अलंकार आणि वस्त्रही बदलते. बदलते वाहन आणि सोबतच्या वस्तू काही घटनांच्या सूचक मानल्या जातात. मकर संक्रांतदेवी ज्या दिशेकडून येते तेथे समृद्धी मिळते. ज्या दिशेकडे जाते तेव्हा ती तिसऱ्याच दिशेकडे पाहते. ती ज्या दिशेकडे जाते आणि पाहते त्या दिशेकडे संकटे येतात, असे मानतात.
उत्तर भारतात या दिवशी डाळ-भात यांची खिचडी बनवली जाते. हिला संक्रांत खिचडी असेही म्हटले जाते. बंगालमध्ये काकवीत तीळ घालून तिळुआ नावाचा पदार्थ, तसेच तांदळाच्या पिठात तूप-साखर घालून केलेला पिष्टक नावाचा पदार्थ बनवतात. बंगालमध्ये संक्रांतीला तिळुआ संक्रांत किंवा पिष्टक संक्रांत म्हणतात. कोकणात इडली आणि नारळाच्या रसात गूळ घालून तयार केलेले पदार्थ खातात. देशावर गुळाच्या पोळीचे महत्त्व असते. तिळगूळ देऊन परस्पर स्नेहसंबंध दृढ केले जातात. या सणाच्या निमित्ताने नवी सून, जावई, लहान मुलं यांचं खास कौतुक केलं जातं. संक्रांतीच्या निमित्ताने नव्या सुनेला हलव्याच्या दागिन्यांनी सजवून तिचं विशेष कौतुक केलं जातं. जावयालाही हलव्याची अंगठी, फेटा आणि इतर भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. त्याचबरोबर लहान मुलांचं बोरन्हाण कररून त्यांच्या अंगावर हलव्याचे आकर्षक दागिने घालण्याची पद्धत आहे.
संक्रांतीला विशेषत्वाने काळ्या रंगाचे महत्त्व अनन्यसाधारण मानले गेले आहे. याद्वारे लोकांच्या मनातील काळ्या रंगाची अभद्रता दूर केली आहे. संक्रांतीनिमित्त वाटला जाणारा तिळगूळ हा मनातील सारे दुःख, नकारात्मकता, किलमिषे दूर सारून नात्यांमधील गोडवा वाढीस लावतो. मनाचे बंध जोडतो. यातून तणाव निवळतात आणि आनंदाचे नवे पर्व सुरू होते. हाच खरा संक्रांतीचा संदेश आहे.