Tadaka Article | देवा तुझे किती सुंदर आकाश! Pudhari File Photo
संपादकीय

Tadaka Article | देवा तुझे किती सुंदर आकाश!

पुढारी वृत्तसेवा

कुणी तरी म्हटलंय की, सौंदर्य वस्तूमध्ये नसते, तर ते बघणार्‍याच्या द़ृष्टीमध्ये असते. बघणार्‍याच्या मनःस्थितीवर असते. त्यांच्या रुचीवर असते. परिस्थितीनुसार ते बदलत असते. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर उद्धोसेनजींची द़ृष्टी आणि द़ृष्टिकोनही बदललेला दिसतोय. आधी त्यांचा प्रचलित देवांवर विश्वास होता; परंतु प्रचारात असलेल्या देवावर यत्किंचितही नव्हता; पण आता सगळेच देव त्यांना देवासारखे वाटू लागले आहेत. माणसाला देवाची आठवण सुखात येत नाही. दुःखात येते. म्हणून हे देवा मला कायम दुःख दे. म्हणजे तुझी आठवण मला सतत येईल, असे एक भक्त म्हणतो.

देवाभाऊंमुळे सगळे तथाकथित लौकिक, अलौकिक देव आता निश्रम झाले आहेत. त्यामुळे जे काही नवसबिवस केले पाहिजेत ते याच देवाचे केले पाहिजेत.

सध्या उद्धोसेनजींचे मन सगळ्या देवांकडून परावृत्त झाल्याचे दिसते. म्हणून ते निराशेने नव्हे, तर मोठ्या आशेने म्हणतात, देवाची इच्छा असेल, तर मुंबईचा महापौर शिवसेनेचाच होईल. देवा (भाऊ) लाही खूप आनंद झाला. एका नास्तिकाचे रूपांतर एका आस्तिकामध्ये झाल्यासारखे वाटले. केवढा मोठा करिष्मा! पण, देवाने आपला विवेक प्रयत्नपूर्वक सावरला. आपल्या अनुयायांना सांगितले. नाही! नाही! देवाची इच्छा फिक्स आहे. महापौर हा आपलाच होणार आहे. युतीचाच होणार! बाजूला उभ्या असलेल्या ठाणेकरांना आनंदाची उकळी फुटली. ते मनातल्या मनात म्हणत होते. खरंच शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे. शिवसेना म्हणजे आपलीच शिवसेना. अंतर्यामी देवा (भाऊ) ते. ठाणेकरांचा भाव त्यांनी ओळखला. ते त्वरित म्हणाले, आता मुंबईचा महापौर हा भाजपचाच होईल.

तरीही उद्धोसेनजी आशावादी होते. ठाणेकरांची शिवसेना देवाला डोईजड झाली, तर आपण तयारीत राहायला पाहिजे. पहिली अडीच वर्षे, जर आपल्याला सुटली, तर देवा तुझे किती सुंदर आकाशऽ सुंदर प्रकाश देवा तुझा! देवाचे काही सांगता येत नाही. देवाने दिले तर छप्पर फाडके देतो म्हणतात...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT