लग्न : एक इव्हेंट Pudhari File Photo
संपादकीय

लग्न : एक इव्हेंट

पुढारी वृत्तसेवा

पन्नास वर्षांपूर्वी ग्रामीण भागामध्ये लग्न लावण्याचा सोहळा अत्यंत साधा, सोपा असायचा. घरासमोरील अंगणात किंवा गावातील मोठ्या पटांगणात मातीचे बोहले उभे केले जायचे. या बोहल्यावर उभे राहून नवरा-नवरीचे लग्न लागत असे. नवरदेव डोक्याला बाशिंग लावून आणि नवरी पदर नाकापर्यंत घेऊन उभी असायची. काळ बदलला तसा यात मोकळेपणा येत गेला. अर्थात, या बदलत्या स्वरूपाचेही स्वागत केले गेले.

त्यानंतर लग्न कार्यालयात लागण्यास सुरुवात झाली आणि तिथून पुढे अतिशय श्रीमंत लोकांमुळे ती रिसॉर्टवर लागायला लागली. रिसॉर्टवर लग्न लावण्याचा मुख्य उद्देश केवळ प्रतिष्ठित लोकांनीच लग्नाला यावे असा असावा, असे वाटते. ज्याच्याकडे कार आहे तोच रिसॉर्टपर्यंत पोहोचू शकतो. मुलीकडचे दोन दिवस आधी येतात. मुलाकडचेही लग्नाच्या आधीच्या दिवशी तिथे पोहोचतात. कारंजी आजूबाजूला उडत असताना स्विमिंग पूलच्या आसपास लग्न लागते. लग्न हा एक संस्कार म्हटले, तर त्यातील संस्कार हा भाग संपून आता तो इव्हेंट झाला आहे, असे आपल्या लक्षात येईल. फोटोग्राफर, व्हिडीओग्राफर, मेंदी लावणार्‍या कलाकार, महिला मेकअप करणार्‍या महिला या सर्वांना मोठा व्यवसाय मिळत असतो.

लग्नाच्या आधीच्या दिवशी हळद लावली जाते. हा हळदीचा कार्यक्रम आता एक इव्हेंट झाला आहे. नवरदेव नवरी आणि एकंदरीतच हळदीला उपस्थित असणार्‍या सर्व महिला आणि पुरुष पिवळ्याधमक हळदीच्या रंगाचे पेहराव घालून आलेले असतात. सर्वत्र हळद पडल्यासारखे भासते.

लग्न होण्यापूर्वी चार-पाच दिवस आधी मुलीकडच्या लोकांकडे मेंदीचा कार्यक्रम असाच सर्वसंमत झाला आहे. त्या दिवशी साऊंड सिस्टीम लावून नाचगाणे केले जाते. त्याच वेळेला एका कोपर्‍यात मेंदी लावणार्‍या महिला आर्टिस्ट आलेल्या असतात. लग्नामध्ये असाच आणखी एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे एन्ट्री. पूर्वी नवरा आणि नवरीचे मामा त्यांना घेऊन प्रमुख मंचावर येत असत. आता नवरा आणि नवरी दोघे मिळून एन्ट्री करतात. ती पण बर्‍याचदा सजवलेल्या रथामध्ये असते आणि त्याच्या भोवती असंख्य भुईनळे पेटवले जातात. आता लग्न हा सोहळा किंवा संस्कार राहिलेला नसून इव्हेंट झालेला आहे, असे आपल्या लक्षात येईल. बर्‍याचदा इव्हेंट मॅनेजर असतो. एकदा का इव्हेंट मॅनेजर नेमला की, बाकी सर्व प्रक्रिया तांत्रिक द़ृष्ट्या उपचार म्हणून पार पाडली जाते. असंख्य लोकांना वेगवेगळे व्यवसाय देणारा असा हा लग्नाचा इव्हेंट आजकाल सर्वत्र पाहायला मिळत आहे. आजकाल सर्व काही गोष्टींचा इव्हेंट झाला आहे. लोकांकडे पैसा खूप आल्याने सर्वत्रच इव्हेंट झाला आहे. अगदी बारावे घालावयाचे असल्यास हॉल बूक केला जातो आणि इव्हेंट केला जातो. अर्थात, यामागे खरे तर दिखावाच अधिक असतो, हे प्रकर्षाने दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT