शंतनू चिंचाळकर
दहावी-बारावीच्या निकालात गुणांच्या फुगवट्यामुळे विचित्र परिस्थिती उद्भवली आहे. 85 ते 90 टक्के गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांनाही आता आवडीच्या कॉलेजमध्ये किंवा शाखेत प्रवेश मिळेल, याची खात्री राहिलेली नाही.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकालाचा टक्का मागील वर्षाच्या तुलनेत घसरला असला, तरी 90 टक्क्यांच्या पुढे गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. गुणांच्या या फुगवट्यामुळे विचित्र परिस्थिती उद्भवली आहे. 85 ते 90 टक्के गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांनाही आता आवडीच्या कॉलेजमध्ये किंवा शाखेत प्रवेश मिळेल, याची खात्री राहिलेली नाही. विद्यार्थ्यांचे गुण वाढले, पण महाविद्यालयांमधील जागांची संख्या मर्यादितच राहिली. त्यामुळे कट ऑफ गगनाला भिडले आहेत. विशेषतः मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांमधील नामांकित महाविद्यालयांमध्ये 95 टक्क्यांवर प्रवेश थांबत आहेत. वैद्यकीय (एमबीबीएस) आणि अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) क्षेत्रातील स्पर्धा तर इतकी टोकाला गेली आहे की, एका गुणाच्या फरकाने विद्यार्थी गुणांच्या क्रमवारीत शेकडो क्रमांकांनी मागे जात आहे. बोर्डाचेच गुण नव्हे, तर नीट (एनईईटी) आणि सीईटीसारख्या स्पर्धा परीक्षांमधील प्रवेशासाठी असलेली आवश्यक टक्केवारी आणि त्यानंतर निर्माण होणारी गुणवत्ता यादी यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना सुरुंग लागत आहे.
दुर्दैवाने बहुतांश विद्यार्थी आजही केवळ एका साचेबद्ध वृत्तीने किंवा सामाजिक दबावापोटी ठरावीक दोन-तीन पारंपरिक क्षेत्रांच्या मागेच आंधळेपणाने धावताना दिसतात. याच संकुचित मानसिकतेमुळे ते इतर नावीन्यपूर्ण आणि भविष्यात मोठी झेप घेऊ शकणार्या अभ्यासक्रमांकडे ढुंकूनही पाहात नाहीत. वास्तविक अनेक आधुनिक व्यावसायिक अभ्यासक्रमांची माहितीच ग्रामीण किंवा निमशहरी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही आणि ही माहिती असणारेही त्याकडे केवळ एक दुय्यम पर्याय म्हणून बघतात. हीच अनास्था त्यांच्या करिअरच्या वाटा भविष्यात अधिक कठीण आणि आव्हानात्मक बनवत आहे.
विद्यार्थी स्वतःच्या पारंपरिक चौकटीबाहेर पडून वैश्विक गरजांचा विचार करत नाहीत, तोपर्यंत प्रवेशाची चिंता आणि पालकांवरील दडपण वाढतच राहणार आहे. केवळ डॉक्टर किंवा इंजिनिअर होणे म्हणजे यशस्वी करिअर घडणे नाही, हे आता समजून घेण्याची वेळ आली आहे. बदलत्या जगाच्या गरजा लक्षात घेता सध्याच्या तंत्रज्ञानप्रधान युगात डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी आणि फॉरेन्सिक सायन्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवाहाबरोबर वाहून न जाता स्वतःची आवड, नैसर्गिक कल आणि कौशल्याचा वस्तुनिष्ठ विचार करून या नव्या वाटा आत्मविश्वासाने चोखाळायला हव्यात. तरच ते या कट ऑफच्या गर्दीतून बाहेर पडून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकतील. 90 टक्के मिळवणारा प्रत्येक मुलगा सर्जन बनण्यासाठीच जन्मलेला नसतो.
वास्तविक शिक्षण म्हणजे केवळ पदवी किंवा मोठा पगार मिळवणे नसून संकटांचा सामना करण्याची क्षमता मिळवणे होय. कट ऑफच्या स्पर्धेत मागे पडलो म्हणजे आयुष्य संपले असे न मानता इतर उपलब्ध संधींचा विचार करणे हेच खरे शहाणपण आहे. पालकांनी स्वतःच्या अपेक्षांचे ओझे मुलांवर न टाकता आधार द्यायला हवा. ‘गुण कितीही असोत, आम्ही तुझ्यासोबत आहोत’ हा विश्वास मुलाला अशा संकटातून वाचवू शकतो. आपण यशाची व्याख्या केवळ गुणांवरून ठरवणार नाही, त्याच दिवशी खर्या अर्थाने या समस्या सुटतील आणि मुलांचे होणारे नुकसान थांबेल. दहावी-बारावीचा निकाल चांगला लागला म्हणून केवळ पालकांच्या अट्टाहासापोटी पाल्यांनी आपल्याला न झेपणार्या अभ्यासक्रमांकडे वळू नये. नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळो न मिळो, आपले भविष्य निवडलेल्या आपल्या आवडत्या विषयात आपण किती रस घेतो यावर अवलंबून आहे, याचा विद्यार्थ्यांनी विचार करणे आवश्यक आहे.