मार्जार पुराण pudhari photo
संपादकीय

मार्जार पुराण

पुढारी वृत्तसेवा

शहरांमधील लोक आजकाल काहीही पाळत आहेत. तुम्हाला वाटत असेल की, लोक श्रावण किंवा गुरुवारचे उपवास पाळत आहेत. तसे नाही, आम्ही प्राण्यांबद्दल बोलत आहोत. कोणत्याही लहान-मोठ्या शहरात तुम्ही सकाळी फिरायला गेलात, तर सोबत कुत्रा घेऊन फिरायला जाणारे लोक तुम्हाला दिसतील. हे श्वान त्या कुटुंबाचा एक भाग झालेले असतात. एक वेळ घरातील ज्येष्ठ लोकांवर खर्च करणार नाहीत; परंतु पाळलेल्या कुत्र्या-मांजरांबद्दल लोकांचे इतके अतीव प्रेम आहे की, त्यासाठी कितीही रुपये खर्च करायला ते मागे-पुढे पाहत नाहीत. जे कुत्रा पाळत नाहीत, त्या लोकांना हे सगळे विचित्र वाटेल. एक वेळ कुत्रा पाळणे समजू शकते. कारण, कुत्रा हा माणसाबरोबर खूप चांगल्या प्रकारची वागणूक ठेवतो. ताणतणावप्रसंगी घरामध्ये श्वान असेल, तर हृदयविकाराचे धोकेसुद्धा टळतात, असे दिसून आले आहे. लोक मांजर का पाळत असावेत, हे रहस्य मात्र आम्हास अद्यापही उलगडलेले नाही.

पाळल्या जाणार्‍या कुत्रा आणि मांजर या दोन प्राण्यांमध्ये मूलत: काही साम्य नाही. हे दोन भिन्न प्रवृत्तीचे प्राणी आहेत. कुत्रा माणसाला जीव लावतो, कुटुंबाचा एक सदस्य होऊन जातो. मांजर मात्र माणसाला अजिबात जीव लावत नाही. मांजर कुळातील सगळे प्राणी हे एकटे राहणारे आणि माणसाची फारशी संगत न आवडणारे असतात. मांजरी किंवा बोके पाळलेल्या लोकांच्या हातावर, पायावर या प्राण्यांनी ओरखडलेले व्रण असतात. ज्याच्या वागण्याचा कुठलाही अंदाज येऊ शकत नाही असा प्राणी म्हणजे मांजर. मांजरांना माणसाचा स्पर्श फारसा आवडत नाही.

मांजर स्वतःला नेहमी स्वच्छ ठेवण्याच्या प्रयत्नात असतात. तुम्ही एखादे मांजर निवांत कुठे बसले असेल, तर पाहा. ते नेहमी जिभेने पाय आणि शरीर चाटत असते. याचा उद्देश फक्त आपले शरीर स्वच्छ ठेवणे हाच असतो. स्वच्छतेची प्रतीक असलेली मांजरे खूप लोक आवडीने पाळतात.आता तुम्हाला वाटेल की, आज मांजराचा विषय काय आहे? एक-दोन मांजरे किंवा अगदीच डझनभर मांजरे पाळली, तरी हरकत नाही; परंतु पुण्यातील हडपसर भागामध्ये एका व्यक्तीने फ्लॅटमध्ये तब्बल साडेतीनशे मांजरे पाळलेली आहेत. या सोसायटीमधील इतर रहिवाशांनी भरपूर तक्रारी करून पाहिल्या; परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. मांजर हा प्राणी निशाचर असतो आणि सूर्य मावळल्यानंतर तो सक्रिय होतो.

साहजिकच माणसांच्या झोपण्याच्या वेळेला मांजरे जागी असतात आणि मोठमोठ्याने आरडाओरडा करत असतात. बाजूचे रहिवासी कंटाळले आणि त्यांनी तक्रारी करायला सुरुवात केली. पशुसंवर्धन खात्याने या घराची पाहणी केली तेव्हा तिथे तब्बल साडेतीनशे मांजरे पाळल्याचे दिसून आले. संबंधित मालक मांजरांची जशी जमेल तशी देखभाल करत होते; परंतु तरीही इतकी मांजरे त्याही एका फ्लॅटमध्ये सांभाळणे ही जवळपास अशक्य गोष्ट आहे. शिवाय प्रत्येक प्राण्याचे आपले वास असतात, दुर्गंधी असते, त्यांची पण खाण्यापिण्याची आबाळ होत असते. या खात्याने संबंधित व्यक्तीला मांजरे इतरत्र शिफ्ट करण्यास सांगितले आहे.एकंदरीत पाळीव प्राणी पाळणार्‍यांची संख्या वाढत असल्याचे पाहून आपल्या मनात असा प्रश्न येतो की, लोक माणसांना जीव न लावता प्राण्यांना का जीव लावत आहेत?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT