Marine life under threat | सागरी जीवन गुदमरतेय Pudhari File Photo
संपादकीय

Marine life under threat | सागरी जीवन गुदमरतेय

पुढारी वृत्तसेवा

रंगनाथ कोकणे, पर्यावरण अभ्यासक

सागरी जीवन आणि इको सिस्टीम (परिसंस्था) विस्कळीत होत असल्याबद्दल शास्त्रज्ञांनी वेळोवेळी जगाला सावध केले. मात्र मानवाचा हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा यामुळे सागरी जीवन गुदमरताना दिसून येत आहे. पॅरिसमध्ये झालेल्या हवामान बदल आणि पर्यावरण केंद्रित संयुक्त राष्ट्रांच्या महासागर संमेलनात एका आकड्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

बेकायदा मार्गाने मासेमारी करणे, प्लास्टिक प्रदूषण, हवामान बदलामुळे सागरी जीव आणि जैवविविधतेवर संकटाचे ढग जमा होऊ लागले आहेत. अशावेळी समुद्रासोबतच जागतिक लोकसंख्येचे भविष्य वाचविण्यासाठी आता गांभीर्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण सरकारी यंत्रणा, व्यावसायिक संरक्षक आणि मच्छीमारांसाठी प्राधान्यक्रम ठरवून दिलेले असतानाही नफा कमावण्याच्या नादात कोणीही प्रामाणिकपणे जबाबदारी सांभाळताना दिसत नाही आणि ते अंमलात आणण्याची मानसिकता नाही. यामुळे बेछूटपणे सागरी जीवांची शिकार केली जात असून दुसरीकडे समुद्रात प्रदूषणाची पातळी वाढताना दिसतेय. हवामान बदलाचा परिणाम या समस्येला अधिक गंभीर रूप देत आहे. पॅरिस करारात वाढत्या जागतिक तापमानात घट करण्यासाठी ध्येय निश्चित केलेले असतानाही भूमध्य सागरातील तापमान वाढीचा वेग हा जागतिक सरासरीच्या तुलनेत 20 टक्के अधिक झाला. समुद्राची इको सिस्टीम सुरक्षित राहण्याबाबत खरोखरच प्रयत्न होतील का? की संकल्प आणि जाहीरनाम्यापुरतीच पर्यावरणाविषयीची तळमळ मर्यादित राहते? या गोष्टी देशांवर आणि संघटनेच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहेत. सागराचा वापर करण्याच्या पद्धतीत झालेला बदल हा केवळ मासेमारीपुरतीच मर्यादित नाही तर ते पकडण्याच्या पद्धतीशीही संबंधित आहे. सध्या 60 टक्क्यांपेक्षा अधिक सागरी जीव बळी पडत आहेत. एका अंदाजानुसार, 2040 पर्यंत प्लास्टिकचे प्रदूषण सध्याच्या स्थितीपेक्षा दुप्पट होईल. दरवर्षी समुद्रात टाकण्यात येणारा प्लास्टिकच्या कचर्‍याचे प्रमाण 2.3 ते 3.7 कोटी टनपर्यंत पोचेल.

मायक्रोप्लास्टिक नावाचा राक्षस हा केवळ सागरी जीवाच्या मानगुटीवर बसलेला नाही तर आपल्या भोजनातही सामील झाला आहे. जगभरातील शास्त्रज्ञ विघटन होणार्‍या प्लास्टिकची निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे नैसर्गिकरीत्या संपणारा आणि पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही यादृष्टीने त्याचा शोध घेतला जात आहे. जागतिक जनजीवन सुरळीत ठेवण्यासाठी समुद्राचे योगदान आहे. हवामान बदलामुळे निर्माण होणार्‍या संकटापासून मानवी जीवन सुरक्षित ठेवण्याचे काम समुद्र करतो, पण त्यांच्या संरक्षण कामात मानवी प्रयत्न हवेत आणि त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि आर्थिक स्रोतांचा अभाव दिसून येतो.

एका आकलनानुसार, समुद्रात प्रवाळ आणि इको सिस्टीम सुरक्षित ठेवण्यासाठी वार्षिक सुमारे 175 अब्ज डॉलरची गरज असून सध्या केवळ 10 अब्ज डॉलरचाच निधी दिला जात आहेे. दरवर्षी सुमारे 1.2 कोटी टन प्लास्टिक समुद्राच्या पोटात जाते. जागतिक पातळीवर माशाचे प्रमाण 1970 मध्ये सुरक्षित स्थितीच्या पातळीच्या 90 टक्के होते आणि ते 2021 मध्ये कमी होत 62 टक्क्यांवर आले आहे. 2017 च्या पहिल्या समुद्र परिषदेनंतर आजपर्यंत हजारो प्रमाणात संकल्प करण्यात आले. परंतु परिणाम काहीच दिसत नाहीत. जैवविविधतेच्या संरक्षणावर 2022 मध्ये करारानुसार 2030 पर्यंत किमान तीस टक्के सागरी अणि पृथ्वीवर असलेली इको सिस्टीम सुरक्षित ठेवण्यावर भर दिला. या दिशेने प्रभावीपणे काम करण्याची आणि प्रयत्न करण्याची गरज असून जेणेकरून ध्येयप्राप्ती होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT