मार्को रुबिओ--- अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ---भारतात क्वाडच्या बैठकीनिमित्त आले. काही करार असे केले की, पुन्हा त्यांना भारतात पाहुणचारासाठी बोलवावे की नको असे झाले. सगळे करार आपल्या बाजूने. ते परवडणारे आहे की नाही याचा विचारही त्यांनी भारतीयांना करू न देता एक लांबलचक करारपत्रच तयार ठेवले. हे पाकिस्तानी धोरण तर नाही ना? याची चिंता भारताला लागून राहिली. कारण, अमेरिका पाकला पाक (ए टू झेड या अर्थी) मदत करतो. स्वतःकडे अनेक अधिकार राखून ठेऊन अमेरिकेच्या सुरक्षेची जबाबदारी घेणारे मार्को रुबिओ भारतीय तत्त्वांशी थोडेच मिळते जुळते घेणार? त्यांनी बैठकीदरम्यान तात्याला अमेरिकेत फोन घुमवला. थोडे वळचणीला जात,“तात्या बैठक चालूच आहे. मी तो गारगोटीसारखा दिसणारा पदार्थ- म्हणजे पेठा खात आहे. (तिकडून ट्रम्पने शिवी हासडली की काय माहिती नाही; पण मार्कोच्या चेहर्यावर त्याचे रिमार्क दिसून आले)काळजी नसावी. इकडे सर्व वातावरण ठीक आहे, उकाडा सोडला तर. ओके. ठेवतो फोन.” तातडीने संवाद थांबला म्हणजे करारात काहीतरी झोल. महत्त्वाचे बोलणे टाळले असावे जे आधीच ठरलेले. मोदी साहेबांनी ट्रम्पच्या आमंत्रणाला लाथ घालून त्यांची जिरवावी हेच योग्य आहे. इंधन टंचाईमुळे हा प्रस्ताव हिताचा वाटला तरी अहिताची दरी भारताला पार करावी लागणार आणि सातासमुद्रापल्याड तात्या काहीतरी वात्रट खोड्या काढणार, हे स्पष्टदिसत होते. तात्यामध्ये आता झुरळ संचारले तर जाम किडे बाहेर पडतील आणि हित राहिले बाजूला झुरळ मारायला हिट पण नाही मिळणार. कारण, हे संचारी झुरळ आहे. त्याला देशभक्तीची उदी हातात ठेऊन मोदी साहेबांनी अफजल्या समजून ट्रम्पूला मिठी मारली पाहिजे तर ते मागे हटेल. हा करार देशाच्या हिताचा व्हावा यासाठी अमेरिकेला गुळाच्या ढेपा आणि क्विंटलभर कांदे भेट म्हणून दिल्यास विषय सोपा होईल असे शेतकर्यांचे मत झाल्याने रुबिओला चिंता पडली की, ही अमेरिकेस न लागणारी गोष्ट भारतात ठेऊन आपण परागंदा होऊ. इथे पेठा गारगोटीसारखा दिसतो हा कांदा बॉम्ब असू शकतो. काही सांगता यायचं नाही. ट्रम्प तात्याने काही सुधारित अटी करारात नमूद कराव्यात नाहीतर आमची ही भारत भेट वाया जाईल, असं काहीसं मार्कोच्या चेहर्यावर उमटलं आणि मार्को तीव्र उकाड्याने घामाने डबडबून गेला.