उमेश काळे
दोन महिन्यांच्या खंडानंतर मराठवाड्यात पावसाची चिन्हे असताना हवामानतज्ज्ञांचे अंदाज फोल ठरवित वरुणराजाने दिलेल्या हुलकावणीमुळे या विभागात दुष्काळी स्थिती निर्माण होईल, असे चित्र दिसत आहे. आता किमान रब्बी हंगाम तरी हाताशी लागावा आणि पिण्याच्या पाण्याची समस्या सुटावी म्हणून दोन-तीन चांगले पाऊस पडावेत, अशी अपेक्षा आहे.
तब्बल दोन महिन्यांनंतर आकाशात काळे ढग जमले होते. आता जोरदार, मेघगर्जनेसह पावसाचे आगमन होईल, असे वाटत असतानाच क्षणभरातच ढग विरतात, पावसाचा एखादा फटका पडतो आणि वरुणराजा पुन्हा पाठ फिरवितो. सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यात असणारे हे चित्र! अनेक ठिकाणी गणरायाचे आगमन पावसात झाले खरे; पण पाऊस पडला केवळ मृदगंधासाठी की काय, असेच वाटावे! पावसाने पुन्हा हुलकावणी दिली.
बर्यापैकी पाऊस पडला नाही, तर ‘धोंडी धोंडी पाणी दे... दायदाणा पिकू दे... धोंडी गेली गगनात, पाणी आलं अंगणात...’ हे लोकगीत म्हणून गावातील पोरांना कडुलिंबाच्या फांद्या लावणे, त्यांची बेडकासह मिरवणूक काढणे ही या भागातील परंपरा. यंदा अनेक गावांत धोंडीचे प्रयोग झाले. कुठे महादेवाला जलाभिषेक झाला, कुठे आषाढीला विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली गेली, तर मुस्लीम बांधवांनीही पावसासाठी विशेष नमाज अदा केली. धर्माच्या सीमा ओलांडून सगळ्यांनाचा आस होती पाण्याची; मात्र वरुणराजाचा रुसवा काही केल्या दूर झाला नाही. खरीप हंगाम हातातून निसटला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, हळद, मका अशी पिके पाण्याअभावी करपली. हिरवीगार दिसायला हवीत अशी शेते आता पिवळसर, रखरखीत, कोरडी झाली आहेत. काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकांवर रोटाव्हेटर फिरवून आपल्या आशा जमिनीत गाडल्या आहेत. पावसाअभावी खरीप हंगामातील ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत मोठी तूट आहे. नद्या, नाले, तलाव, छोटी धरणे आणि विहिरी अजूनही तहानलेल्या आहेत. हवामान खात्याचे आणि तज्ज्ञांचे अंदाजही फोल ठरले आहेत. त्यामुळे शेतकर्यांसमारे केवळ आर्थिक संकटच नव्हे, तर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही उभा ठाकला आहे. मराठवाड्यातील जायकवाडीसह अकरा मोठ्या धरणांवर मोठा ग्रामीण आणि शहरी भाग अवलंबून आहे.
नाशिक परिसरातील पावसामुळे जायकवाडी आणि पुढील काही धरणांना दिलासा मिळाला असला, तरी अन्य धरणांतील पाणीसाठा चिंताजनक आहे. अपेक्षित ६७९ मिलिमीटरच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ४०५ मिलिमीटर पाऊस झाला असून ४१ टक्के तूट आहे. मागील तीन महिन्यांत चाळीसहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वास्तव परिस्थितीची भीषणता दर्शविते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांतील ६१ गावे आणि ४६ वाड्यांत १२६ टँकरने अजूनही पाणीपुरवठा सुरू असून, पुढील काळात या संख्येत वाढ होईल, असे दिसते. टँकरव्यतिरिक्त ४२६ विहिरींचे अधिग्रहण केले आहे.
जायकवाडी धरण भरलेले असले, तरी वाढते बाष्पीभवन ही नवी चिंता आहे. छत्रपती संभाजीनगरला आठ दिवस पुरेल एवढ्या पाण्याचे बाष्पीभवन दररोज होत आहे. जलसिंचन अभ्यासकांच्या मते सामान्यतः उन्हाळ्याच्या सुरुवातीला धरणातून दररोज १.१० द.ल.घ.मी., तर एप्रिल-मे महिन्यांत १.८० ते २ द.ल.घ.मी. पाण्याची वाफ होते. यंदा मात्र सप्टेंबरमध्येच उन्हाचे चटके बसत असल्याने मे महिन्यासारखे बाष्पीभवन सुरू झाले आहे. अजून ऑक्टोबर हीट सुरू झाल्यानतर हे प्रमाण आणखी वाढणार आहे. उद्या पशुधनासाठी चारा-पाणी, उद्योगांसाठी पाणी आणि गावागावांत आवश्यक पाण्याची समस्या उग्र बनण्याची भीती आहे. ही परिस्थिती पाहिल्यावर रानकवी ना. धों. महानोरांच्या ओळी सहज डोळ्यांसमोर येतात. ‘या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे...’
खरंच, आज मराठवाड्याची मागणी फार मोठी नाही. आभाळाने आपल्या पदरातून थोडेसे दान द्यावे, एवढीच अपेक्षा आहे. निसर्गाने असहकार पुकारल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होतात. अशावेळी सत्ताधारी मंडळी आम्ही दुष्काळ निवारणासाठी किती प्रयत्न करतोय, हे सांगतात, तर विरोधक सरकार अपयशी ठरल्याचे आरोप करतात. अशा आरोप -प्रत्यारोपांतून काही साध्य होत नाही. हा भाग कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी अनेक घोषणा आतापर्यंत झाल्या आहेत. त्याची अंमलबजावणी जलदगतीने कशी होईल, हे पाहिले पाहिजे. प्रत्येक गावात जलसंधारणाच्या मोहिमा राबवून गाव जलसाक्षर हाेण्यासाठी सरकारी पातळीवर जनता, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न झाले पाहिजेत.