मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असली, तरी ती प्रथम महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईत मराठी भाषिकांचे राज्य आणि वर्चस्व असले पाहिजे, अशी सामान्यजनांचीही भावना आहे. पाहुण्यांचे स्वागतच आहे; पण त्यांनी स्थानिक संस्कृतीत मिसळून जावे आणि स्वतःचा व महाराष्ट्राचा विकास करावा, हीच येथील संस्कृती. फाळणीनंतर पंजाबी आणि सिंधी लोक स्थायिक झाले. मोटार गॅरेज, वाहतूक आणि खरेदी-विक्रीचा व्यापार करू लागले. त्यानंतर दाक्षिणात्य येऊन मुंबई व अन्यत्र सरकारी नोकर्या करू लागले. 1970च्या दशकानंतर बिहार, उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांतून परप्रांतीयांचा ओघ वाढू लागला. त्या राज्यांत विकास खुंटल्याने नोकरी-धंद्यासाठी तेथील गोरगरीब मुंबईत काम करू लागला; पण अलीकडील काळात उत्तर भारतीय, गुजराती व्यापारी आणि मराठी भाषिकांतील वादाच्या निमित्ताने मराठी-अमराठी दरी वाढते आहे. गेल्या काही वर्षांपासून मराठी भाषिक आणि परप्रांतीयांमध्ये किरकोळ कारणावरून चकमकी होऊ लागल्या आहेत.
मराठी भाषा बोलण्याच्या मुद्द्यावरून मनसे कार्यकर्त्यांकडून अलीकडेच हिंदी भाषिक व्यापार्याला मारहाण झाली. या घटनेच्या निषेधार्थ हिंदी भाषिक व्यापार्यांनी मोर्चा काढला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मंगळवारी मुंबईलगतच्या मीरा रोडमध्ये मनसे आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाने काढलेल्या मोर्चात मराठी भाषिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे 5 जुलै रोजी एकत्र आले होते. ही पार्श्वभूमी त्यामागे होती.
मराठी माणसांची एकजूट व्हावी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण व्हावे, असे उद्गार त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी काढले होते. राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय राज्य सरकारने कोणासाठी घेतला? सत्ता आहे म्हणून आम्ही कोणतेही निर्णय लादणार, असे वाटत असेल, तर तुमची सत्ता विधानसभेत आहे, तर आमची रस्त्यावर आहे, असा इशारा तेव्हा राज ठाकरे यांनी दिला होता. वास्तविक, मनसेकडून एकाच हिंदी भाषक व्यापार्याला मारहाण झाली होती. त्याने अरेरावीची भाषा केली म्हणून त्याला मनसैनिकांनी चोप दिला होता; पण खासकरून हिंदी भाषेतील प्रसारमाध्यमांनी जणू काही सरसकट परप्रांतीयांना अकारण झोडपले जात असल्याचे खोटे चित्र रंगवले. त्यातच सुशील केडिया नावाच्या शेअर दलालाने राज यांच्याबद्दल एकेरीत उद्गार काढले. त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली व केडियाने माफी मागितली. ठाण्यामध्ये एका मराठी माणसाला परप्रांतीयांनी किरकोळ कारणावरून गुरासारखे मारले, तेव्हा ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे यांच्या कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला; पण महाराष्ट्रातच मराठी माणसावर याप्रकारे हल्ले होत आहेत.
परभाषक फेरीवालेही पालिकेच्या अधिकार्यांवर हात उगारत असतात. याबद्दल हिंदी माध्यमांनी कधीही आवाज उठवलेला नाही. मीरा रोड-भाईंदर परिसरात पोलिसांनी व्यापार्यांना मोर्चा काढण्यास सहज परवानगी दिली; पण परप्रांतीयांच्या दादागिरीचा निषेध व्यक्त करण्यासाठी मराठी एकीकरण समिती तसेच ठाकरे सेना आणि मनसे यांना मोर्चासाठी पोलिसांकडून परवानगी नाकारली गेली. परवानगी दिली असती, तर काहीही बिघडले नसते. मोर्चा शांततेने पार पडला. त्यामध्ये स्थानिक उत्तर भारतीयांविरुद्ध कोणत्याही प्रक्षोभक घोषणा दिल्या गेल्या नाहीत. मोर्चा पार पडल्यानंतर व्यापार्यांच्या दुकानांवर ना दगडफेक झाली, ना कोणाला मारहाण झाली. मोर्चाच्या आदल्या दिवशीच मध्यरात्री मनसे व ठाकरे सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांना अटक झाली.
मोर्चा परिसरात कोणत्याही पक्षाशी संबंध नसलेल्या काही मराठीप्रेमी स्त्रियाही पत्रकारांजवळ भावना व्यक्त करत असताना त्यांना तेथून हुसकावले गेले. काहीजणांना ताब्यातही घेतले गेले. परिवहनमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनीही मीरा-भाईंदर येथील दडपशाहीचा निषेध केला आणि आंदोलनस्थाला भेट दिली; मात्र त्यांच्या मतदारसंघात भाईंदरचा काही भाग येतो. त्यामुळे केवळ राजकारण करण्यासाठी ते आले आहेत, असे वाटून मोर्चेकरांनी त्यांच्या विरोधात घोषणा देत त्यांना पळवून लावले.
हिंदी भाषासक्ती असो किंवा हा मोर्चा असो, गेल्या विधानसभा निवडणूक प्रचारावेळी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांना काही गुजरातीबहुल हाऊसिंग सोसायट्यांमध्ये प्रवेश नाकारला गेला. मुंबईत विशिष्ट धर्मीयांची बहुसंख्या असलेल्या घरांच्या संकुलांमध्ये मांसाहार करणार्यांना जागा दिली जात नाही, अशा तक्रारी आहेत. अनेक ठिकाणी मासे घेऊन येणार्या कोळिणींना सोसायटीत प्रवेश नाकारला जातो. काही बँकांत वा अन्य आस्थापनांमध्ये मराठी भाषेतून माहिती देण्यास नकार देणे, मराठी व महाराष्ट्राबद्दल कर्मचार्यांनी अवमानजनक उद्गार काढणे यामुळे मराठी भाषिकांत असंतोष आहे. मीरा-भाईंदरमध्ये याचाच कुठेतरी स्फोट झाला असावा. वास्तविक, हिंदी भाषा वा उत्तर भारतीयांचे महाराष्ट्राशी खूप जुने संबंध आहेत. विनोबा भावे, काका कालेलकर, बाबुराव पराडकर, माधवराव सप्रे, गजानन माधव मुक्तिबोध अशा अनेकांनी हिंदीत लेखन तसेच पत्रकारिता केली; पण जेव्हा मुंबईत राहून महाराष्ट्राविरोधात बोलले जाते, मराठी अस्मितेला आव्हान दिले जाते तेव्हा त्याची प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. त्यातच भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी, ‘तुम्ही लोक आमच्या पैशावर जगता. तुम्ही एकदा महाराष्ट्राबाहेर या, तुम्हाला आपटून आपटून मारू’ असे संतापजनक उद्गार काढल्यामुळेही मराठी मणूस खवळून उठला.
मराठी व बिगरमराठी भाषक यांच्यातील सलोखा कायम राहावा, यासाठी सरकारने त्याचप्रमाणे राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. भाषेच्या प्रश्नावरून दंगली होता कामा नयेत. भाषा-भाषांमध्ये ‘का रे दुरावा’, अशी स्थिती असता कामा नये. भाषिक वादात कोणाचे राजकारण साध्य होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. ती घेताना मराठी अस्मिता जपलीच गेली पाहिजे. ही जबाबदारी तमाम मराठी बांधवांची आहे.