pudhari tadka article | मराठी माणसा... 
संपादकीय

pudhari tadka article | मराठी माणसा...

पुढारी वृत्तसेवा

स्थळ : मराठी मुलुखात

वेळ : सकाळची

ऊठ ऊठ मराठी मान्सा झोपलायस काय? जागा हो. उशाजवळ गाठोडे घेऊन झोपलायस? चोर येऊन कधी दरोडा घालतील तुला समजणारसुद्धा नाही. तुझं गठडंच नव्हे तर आक्खी मुंबईसुद्धा पळवून नेतील. अरे ऊठ...

हे ऐकून फुटपाथावर झोपलेला रामा खाडकन जागा झाला. उठला आणि चार आळोखे-पिळोखे दिले. तंबाखू काढली. जरा वाईच मळली आणि तोंडात टाकून म्हणाला, च्या मायला कोन वरडाय लागलंय फाटे फाटे. साखरझोप मोडली ची भना.

तवा शेजारी झोपलेला शिवा बी उठला नि म्हनला, दोघं भाऊ वरडत गेल्याली म्या बघिटली. ती म्हणीती, रात्र वैर्‍याची हाय. मराठी मान्सा झोपू नगोस.

वैरी म्हनल्यावर रामा आठवाय लागला. एकतीस डिसेंबरला गेलेली शुद्ध अजून आलेली नाही. आजूबाजूलाही येणारी-जाणारी कोणच शुद्धीत दिसत नव्हती आणि जागं व्हा म्हून कुणाला सांगीत हुती ती दोघं.

फार फार विचार केल्यावर शिवा म्हणाला, रामा लेका कार्पोरेशनची विलेक्शन लागली न्हवं.

त्यावर रामा बोलला, मग काय झालं. मराठी मान्सानं कशापायी जागं र्‍हायलं पायजे. तुमी लेकानो सकाळी धा वाजता उठणार यात आम्हास्नी जागं र्‍हावा म्हणणार. रामाला हे काय गणित समजलं नाही. तेव्हा वाटलं बिबट्या आलाय मुंबैत, तवा जागं र्‍हावा म्हंत्यात. शेवटी ही साधी मराठी माणसं. उच्च कोटीच्या मराठी माणसांचे विच्यार यांच्या कसे लक्षात येणार. मुंबई गुजरातमध्ये कधी तरी जाणार असा भास या दोघा भावांना कायम होत असतो.

रामा म्हणाला, मग आम्हाला का ताप. आम्हाला खायला कोंडा नि निजेला धोंडा रग्गड हाय. खड्यात एक बीएमडब्ल्यू कार आली आणि उठा उठा निवडणूक आली. झोपू नका वैरी सुसाट सुटलाय...चा गलका उठला.

रामाने मान उंच करून बघितले तर गाडीत ते दोघे भाऊ दिसले. थर्मासमधून गरमागरम चहा पीत होते. रामा मनातल्या मनात म्हणाला, असेच असते आमचे भाऊबंद धुरंधर आणि श्रीमंत. आम्हीही रात्री जागून दिवसा पडलो असतो निवांत लोळत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT