‘ग्रंथात अथवा पुस्तकात राहून भाषा जिवंत राहणार नाही, ती बोलली जाईल, तेव्हाच जिवंत राहील,’ असे अतिशय वास्तव उद्गार नवी दिल्लीत पार पडलेल्या अठ्याण्णवव्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी काढले आहेत. मराठी साहित्य संमेलन नेहमीप्रमाणे आणि अपेक्षेप्रमाणे थाटामाटात आणि उत्साहात पार पडले. नेहमीचे कार्यक्रम आणि सोपस्कार झाले. अशा साहित्य संमेलनाच्या सोहळ्यातून काय आणि किती साध्य होते, हा प्रश्न बाजूला ठेवला तरी साहित्य क्षेत्रातील सरदार, शिलेदार आणि रसिक वाचक एकत्र येतात, काही आदान-प्रदान होते; पण मराठी भाषेच्या वृद्धी आणि विकासासाठी अशा संमेलनाचा हातभार किती लागतो, याचे उत्तर बहुधा संदिग्धच असेल. मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पहिल्याच संमेलनात अध्यक्षा डॉ. भवाळकर यांनी मराठी भाषेच्या विद्यमान स्थितीवर अचूक बोट ठेवले आहे. त्यांचे हे उद्गार औचित्यपूर्ण आहेत शिवाय भावी काळातील मराठी भाषेच्या स्थितीबद्दल इशारा देणारेही आहेत. त्यामुळे त्याची गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे.
भाकरी का करपली, घोडा का अडला आणि पान का सडले, या तिन्ही प्रश्नांचे एकच उत्तर येते. ते म्हणजे न फिरविल्याने! म्हणजेच प्रवाही न राहिल्याने. मराठी भाषेची सद्यस्थिती लक्षात घेता, ती प्रवाही राहिली आहे का, याबाबत निश्चितपणाने होकारात्मक उत्तर देणे कठीण आहे. मराठी भाषेतील शब्दसंख्या घटत असल्याचे विदारक वास्तव समोर आले असताना मराठी भाषा समृद्ध आणि अधिक विकसित होत आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरणार आहे.
1857 मध्ये मोत्सवर्थ यांनी मराठी शब्दकोश तयार केला. त्यात 60 हजार शब्द होते. 1932 मध्ये मराठी शब्दकोशाचे आठ खंड प्रकाशित झाले. त्यामधील शब्दसंख्या एक लाख 30 हजारांवर होती. बारा वर्षांपूर्वी म्हणजे 2013 मध्ये प्रकाशित झालेल्या मराठी शब्दकोशातील शब्दसंख्या 1 लाख 13 हजार एवढी होती. 17 हजार शब्दांची घट झाली. म्हणजे सुमारे 80 वर्षांत मराठी भाषेत 13 टक्के शब्दांची घट झाली. मराठी भाषा प्रवाहित असती, तर नवे नवे शब्द प्रचलित होऊन शब्दसंख्या वाढली असती. याचाच अर्थ आपल्या बोलण्यातील आणि रोजच्या वापरातील शब्द कमी होत गेले. मराठी बोलणार्यांची संख्या कमी झाली. डॉ. भवाळकर यांचे निरीक्षण अगदी अचूक आहे, हेच या आकडेवारीतून स्पष्ट होते.
मराठीची शब्दसंख्या कमी होत असताना विज्ञान, तंत्रज्ञानाची भाषा समजली जाणार्या अर्थात ज्ञानभाषा इंग्रजी भाषेची समृद्धी डोळे दीपवणारी आहे. ऑक्सफर्डच्या अलीकडील शब्दकोशात सहा लाख इंग्रजी शब्द आहेत, तर कॉलिन्सच्या शब्दकोशात तब्बल 7 लाख 50 हजार इंग्रजी शब्दसंख्या आहे. इंग्रजीने फ्रेंच, जर्मन, पोर्तुगीज, इटालियन, स्पॅनिश, रशियन अशा युरोपियन भाषांतील शब्द आत्मसात केलेच शिवाय ज्या ज्या देशात इंग्रजांनी वसाहती केल्या, राजवटी स्थापन केल्या, त्या त्या देशातील, प्रांतातील अनेक शब्दही आपल्या भाषेत प्रचलित केले. अरबी, फार्सी, तुर्की, उर्दूसह मराठीतील घेराव, बंदसारख्या शब्दांनी इंग्रजी भाषेची व्याप्ती वाढलेली आहे.
गेल्या 50-60 वर्षांत आर्थिक, औद्योगिक बदल होत गेले. ग्रामीण भागात फार मोठे संक्रमण झाले. बलुतेदार, अलुतेदार जवळजवळ संपुष्टात आले. सर्वच क्षेत्रात कमी जास्त प्रमाणात स्थित्यंतरे झाली. त्याचा परिणाम 60-70 वर्षांपूर्वीचे शब्द विस्मरणात आणि अडगळीत जाण्यात झाला. साधे स्वयंपाक घरातील शब्द घ्या. जाते, पाटा-वरवंटा, खलबत्ता, चूल, वैल, घंगाळ, बंब, होन, उखळ, मुसळ, मुगल हे शब्द नव्या पिढीला अपरिचित आहेत आणि जुनी पिढीही ते शब्द विसरत चालली आहे. 1970 च्या दशकापासून गेल्या 50/60 वर्षांत तंत्रज्ञान आणि विज्ञानाने गरुडझेप घेतली. भारतात 1980 च्या दशकात संगणक युगाचा प्रवेश झाला आणि आता ‘एआय’ची महाक्रांती उंबरठ्यावर आहे. या अनुषंगाने या तंत्र विज्ञानाची परिभाषा असलेले इंग्रजी शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे रूढ झाले आहेत. मोबाईलवर भ्र्रमणध्वनी असा मराठी प्रतिशब्द असला, तरी तो कोणी वापरत नाही. मोबाईलबरोबर, व्हॉटस्अॅप, यूट्यूब, रिंगटोन असे अनेक शब्द आता लोकांच्या नित्य बोलण्यात आले आहेत. असे नवे शब्द वापरात आले असले, तरी एकूणच मराठी भाषेचा म्हणून दैनंदिन जीवनातील वापर कमी होत चालला आहे.
मुंबई महानगरात एकेकाळी म्हणजे संयुक्त महाराष्ट्र लढ्यावेळी मराठी भाषिकांची संख्या 45 टक्के होती. ती आता 28 टक्क्यांवर आली आहे. महानगर मुंबईत टॅक्सीपासून पानपट्टीपर्यंत, दुकानापासून मॉलपर्यंत आणि साध्या हॉटेलपासून फाईव्ह स्टार हॉटेलपर्यंत हिंदी हीच मुख्य संवादाची भाषा बनली आहे आणि भाजी बाजारातही मराठी शब्द चुकूनच ऐकू येतो. नागपूर महानगरावर प्रथमपासून हिंदीचा पगडा आहे. त्यात बदल नाही. आता मुंबईप्रमाणे ठाणे, पालघर भागातही हिंदी भाषा मराठीची जागा घेऊ पाहत आहे. पुणे हे मराठी भाषेचे प्रमाण मानले जाणारे शहर; पण अलीकडे ‘आयटी’मुळे पुण्यातही हिंदीचा चंचुप्रवेश होत आहे. मराठवाड्यात छ. संभाजीनगरसह काही भागांत हिंदी, उर्दूचा प्रादुर्भाव आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या साधारणपणे 20 ते 25 टक्के भागात, प्रदेशात दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर कमी होत चालला आहे. दैनंदिन संभाषणात मराठी नाही, तर मग त्या भागातील, प्रदेशातील दुकानावरचे फलक, जाहिरातीची होर्डिंग्ज ही हिंदी आणि इंग्रजीत असली, तरी नवल वाटण्याचे कारण नाही.
एकेकाळी मराठी मासिके आणि नियतकालिके ही मराठी भाषा समृद्ध करणारी वाचकप्रिय साधने होती. आता त्यांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. दिवाळी वार्षिकातून त्याची काही चुणूक दिसते; पण अशा वार्षिकांचा खपही पूर्वीच्या खपाच्या तुलनेत कमी झाल्याचे जाणवत आहे. विसाव्या शतकात अनेक अतिरथी, महारथी साहित्यिक, नाटककार, कवी आणि निबंधकारांनी सरस्वतीचा दरबार समृद्ध झाला होता. आता या दरबारात त्यांची उणीव भासत आहे. साहित्य क्षेत्राबरोबर मराठी चित्रसृष्टीने आणि रंगभूमीने यापूर्वी निर्माण केलेले मानदंड आता अपवाद वगळता दिसत नाहीत. मराठी भाषेच्या भरभराटीला जो घुणा लागला, त्याला अशी काही कारणे आहेत.
देशातील प्रमुख 22 भाषांत मराठीचा क्रमांक तिसरा आहे. देशातील दहा टक्के लोक मराठी बोलतात; पण मराठी शब्दसंख्येची घसरण होत राहिली, तर आणखी काही वर्षांनी मराठीचे तिसरे स्थान दुसरी भाषा घेण्याची भीती आहे. काही वर्षांपूर्वी वृत्तपत्रे आणि नियतकालिके यामध्ये दर्जेदार मराठीचा वापर होत असे. प्रसंगानुसार चपखल म्हणी आणि वाक्प्रचारांचा उपयोग होत असे. आता प्रसिद्ध होणार्या मराठी बातम्यांत आणि लेखांत मराठी व्याकरणाचा अचूक वापर, अचूक मराठी शब्द यांची उणीव जाणवते, असा काही वेळा अनुभव येतो. महाविद्यालयात आणि विद्यापीठात मराठी विषय घेणारे विद्यार्थी दुर्मीळ होत आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांतून शिकणार्या नव्या पिढीचा संवाद आता इंग्रजीतूनच होऊ लागला आहे. इंग्रजी माध्यमाला विरोध असायचे कारणच नाही; पण मराठी भाषेचे संरक्षण आणि संवर्धन होणे आवश्यकच आहे.
ज्ञानियांचा राजा श्री ज्ञानदेव यांनी 1290 मध्ये श्री ज्ञानेश्वरी लिहिली. त्या आधी 1284 मध्ये म्हाईंभट यांनी श्री चक्रधरस्वामींच्या लीला वर्णणारेे लीळाचरित्र लिहिले होते. 1287 मध्ये महदंबेने धवळे (पूर्वार्ध) लिहिले होते. तेराव्या शतकाअखेर अत्यंत समृद्ध असे मराठी भाषेतील ग्रंथ निर्माण झाले होते. मराठी भाषेचे वैभव या ग्रंथातून प्रकट झाले होते. त्या आधी बाराव्या शतकात मुकुंदराज यांनी विवेकसिंधु लिहिल्याचे म्हटले जाते, तर त्याआधी अकराव्या शतकात श्रीपती या ज्योतिष पंडिताने ज्योतिष रत्नमाला नावाचा ज्योतिषविषयक ग्रंथ लिहिल्याचे म्हटले जाते. मात्र, या दोन्ही ग्रंथांच्या काळाविषयी तज्ज्ञांमध्ये दुमत आहे. ही ग्रंथनिर्मिती चौदाव्या शतकातील असल्याचे म्हटले जाते.
महाराष्ट्र आणि कर्नाटकात उपलब्ध झालेल्या शिलालेखांवरूनही मराठी भाषेचे प्राचीनत्व लक्षात येते. श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वर मूर्तीच्या तळभागी एका शिलेवर ‘श्री चावुंडराये करवियले, श्री गंगराजे सुत्ताले करवियले’ असा मराठी भाषेतील शिलालेख आहे. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांच्या मते हा शिलालेख 983 चा आहे. पुणे जिल्ह्यातील सासवडजवळील पूर येथील 1285 चा यादवकालीन शिलालेख, पंढरपूर येथील 1189 मधील विठ्ठल मंदिराच्या स्थापनेसंबंधीचा शिलालेख, त्यानंतर तिथलाच 1273 चा विठ्ठल मंदिर जीर्णोद्धाराचा शिलालेख, अंबाजोगाई मंदिराच्या प्रवेशद्वारावरील 1240 मधील दोन शिलालेख असे अनेक शिलालेख मराठी भाषेची प्रदीर्घ परंपरा स्पष्ट करणारे आहेत.
शिलालेखांतून मराठी भाषेची लिखित मोहर दहाव्या शतकापासून असल्याचे दिसून येते. बोली भाषा लिखित स्वरूपात यायला आणि पुढे भाषेने व्यावहारिक स्वरूप धारण करायला दोनशे-अडीचशे वर्षांचा काळ जातो, असे म्हणता येईल. या हिशेबाने किमान नवव्या शतकात मराठी भाषा व्यवहारात अस्तित्वात होती, असा तर्क करता येतो. काही तज्ज्ञांच्या मते मराठी भाषेचे अस्तित्व याही खूप मागे जाऊ शकते. तत्कालीन संस्कृत नाटकातून ‘महाराष्ट्रीक’ असे पात्र असून या पात्राच्या तोंडी मराठी वाक्य असे. मराठी भाषेची अशी शेकडो वर्षांची उज्ज्वल परंपरा आहे. ती अधिक वैभवशाली व्हावी, चिरकाल टिकाऊ आणि ज्ञान भाषेच्या दिशेने तिची वाटचाल व्हावी, या द़ृष्टीने सर्वंकष प्रयत्न होणे अगत्याचे आहे. डॉ. तारा भवाळकर यांच्या इशार्यातून हा बोध घ्यायला हवा.