शाबास मनू..! pudhari File Photo
संपादकीय

शाबास मनू..!

पुढारी वृत्तसेवा

पॅरिसमध्ये ऑलिम्पिकला सुरुवात झाली. आपण भारतीय लोकांना ऑलिम्पिक सुरू झाल्यानंतर इतर देशांनी किती पदके मिळवली आणि पदकांच्या यादीमध्ये आपण किती खाली आहोत, हे पाहण्याची सवय झालेली आहे. यावर्षी मात्र आपली सुरुवात झकास आणि उमेद वाढविणारी झाली. ऑलिम्पिक नेमबाजीमधील भारताची बारा वर्षांपासूनची प्रतीक्षा संपवित मनू भाकरने पॅरिसमध्ये दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक कमावले. शाबास मनू! तुझे आणि आम्हा सर्व भारतीय लोकांचे अभिनंदन! तू आपल्या देशाच्या अभिमानाचा विषय झाली आहेस. ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत पदक जिंकणारी ती पहिली महिला ठरली आहे. सिल्व्हर आणि गोल्ड मेडल तिच्यापासून फक्त 0.1 गुणाने हुकले. वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. ऑलिम्पिक ही जागतिक स्पर्धा असते आणि तिथून तिसर्‍या क्रमांकाचे कांस्यपदक आणणे तितकेच महत्त्वाचे आहे.

खरं तर, हे पदक गतऑलिम्पिकमध्ये तिला मिळायला हवे होते; परंतु तिच्या पिस्तुलामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते मिळू शकले नाही. हिंमत न हारता सलग चार वर्षे घोर तपश्चर्या करून यावर्षी तिने हे पदक खेचून आणले आहे. आपल्या रांगड्या मराठी भाषेत सांगायचे म्हणजे तिने ‘नेम धरून पदकाचा गेम केला आहे’ असे म्हणता येईल. कठोर परिश्रम करत तिने हे यश मिळवले आहे. अटीतटीच्या प्रसंगी स्थितप्रज्ञ राहण्याचे आणि एकाग्रतेने खेळण्याचे कौशल्य तिने भगवद्गीतेमधून प्राप्त केले आहे, असे नमूद केले आहे.

आपण सर्वांना असे वाटत होते की, नेम धरून गेम करण्याचे कौशल्य फक्त राजकारणी मंडळीकडेच आहे की काय? सध्या राजकारणाचा धुमाकूळ देशभर आणि विशेषत: आपल्या महाराष्ट्रात जोरात सुरू आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत कोण कोणाचा गेम करणार, याची चर्चा रंगात आली आहे. युती आणि आघाडीच्या राजकारणामध्ये नेम धरण्याला फार महत्त्व असते. युतीमधील एखादा मतदारसंघ म्हणजे आपल्याला पाहिजे असलेला मतदारसंघ दुसर्‍या पक्षाला जाणार असेल, तर भावी उमेदवार तिथून थेट उठतो आणि आघाडीच्या एखाद्या पक्षात जाऊन बसतो. असे काही अस्वस्थ उमेदवार इतर पक्षांमध्ये आहेत का? यावर सर्व पक्षांच्या पक्षश्रेष्ठींचा नेम असतो म्हणजेच लक्ष असते. अस्वस्थ उमेदवाराला ‘उमेदवारी मिळेल’ अशा प्रकारचा गळ टाकला जातो. उमेदवारही काही कच्च्या गुरूचे चेले नसतात. ते गळाला लावलेल्या आमिषाचा मोह न करता आपले आपण स्वच्छंद विहार करत असतात. दोन-तीनदा आमदार राहिलेले लोक गळाला लावलेले खाद्य खाताना आपल्या गळ्याला कुठलीही इजा होणार नाही, याची काळजी घेत असतात. बरेच उमेदवार गळ लावणार्‍या मालकाला झुकांडी देत असतात. काही मुरब्बी राजकारणी गळ, दोरी आणि त्याला लावलेले भक्ष्य असे सगळेच पळवून नेऊन दुसर्‍या पक्षात जात असतात. त्यांचेही कौशल्य वाखाणण्यासारखे असते. असो.

असे राज्यभर आणि देशभर नेम धरून गेम केले जात असताना मनू भाकरने मात्र थेट ऑलिम्पिकमध्ये आपल्याला पदक मिळवून दिले आहे. मनू भाकरचे मनःपूर्वक अभिनंदन आणि सर्व भारतीय संघाला आभाळभर शुभेच्छा!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT