उमेश कुमार
राजकारणातील वंशवाद आणि पुत्रमोह यांची चर्चा नवी नाही; मात्र राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नातेसंबंधांकडे पाहताना राजकारणापलीकडे एका आईची दूरदृष्टी, नेतृत्वावरील विश्वास आणि दीर्घकालीन विचारसरणीही समजून घ्यावी लागते.
राजकारणात तत्त्वे बदलतात, घोषणा बदलतात, आघाड्या बदलतात; पण काही गोष्टी मात्र बदलत नाहीत. त्यापैकी एक म्हणजे नातेसंबंधांचा प्रभाव. राजकारण जितके सार्वजनिक असते, तितकेच त्यातील निर्णय वैयक्तिकही असतात. सत्ताकारणात घेतले जाणारे अनेक निर्णय कुटुंब, विश्वास आणि भावनांच्या पायावर उभे असतात. त्यामुळे एखाद्या नेत्यावर आपल्या मुलाला, मुलीला, पुतण्याला किंवा कुटुंबातील इतर सदस्याला पुढे आणल्याचा आरोप झाला, तर ती चर्चा केवळ राजकारणापुरती मर्यादित राहत नाही. सध्या पश्चिम बंगालच्या राजकारणात अशीच चर्चा सुरू आहे. तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाकडे अनेक जण ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या नात्याच्या दृष्टिकोनातून पाहत आहेत. अभिषेक हे ममतांचे पुत्र नसून पुतणे आहेत; मात्र राजकारणात रक्ताच्या नात्यांपेक्षा विश्वासाला अधिक महत्त्व असते. ममता यांनी अनेक वर्षे त्यांना आपल्या सर्वात विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक मानले आहे. त्यामुळे पक्षात असंतोषाच्या बातम्या समोर आल्या की, बोटे सर्वप्रथम अभिषेक यांच्याकडेच वळतात.
परंतु, राजकारणात जे दिसते तेच संपूर्ण सत्य असत नाही. पक्षांतर्गत मतभेदांच्या मागे केवळ व्यक्तिमत्त्वांचा संघर्ष नसतो. बदलती राजकीय समीकरणेही असतात. सत्ता बदलली की निष्ठाही बदलतात. अनेक नेते राजकीय भवितव्याची सुरक्षितता शोधू लागतात आणि त्यासाठी एखाद्या कारणाची गरज भासते. अशावेळी एखादा चेहरा असंतोषाचे प्रतीक बनवला जातो. तृणमूल काँग्रेसमधील सध्याच्या घडामोडींची कहाणी ही दिसते तितकी सरळ नसावी.
भारतीय राजकारणात कुटुंब आणि राजकारण यांचे नाते नवीन नाही. वंशवादाची चर्चा असो किंवा पुत्रमोहाची, गांधी कुटुंबाचा उल्लेख केल्याशिवाय ती चर्चा पूर्ण होत नाही. सोनिया गांधी यांच्याबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केला गेला की, त्यांनी राहुल गांधी यांना सातत्याने पुढे केले, तर प्रियांका गांधी यांना बराच काळ सक्रिय राजकारणापासून दूर ठेवले. टीकाकार याला पुत्रमोह म्हणतात, तर समर्थक याला राजकीय रणनीती मानतात. प्रियांका गांधी यांच्या राजकीय क्षमतेबद्दल फारशा शंका व्यक्त केल्या जात नाहीत. सार्वजनिक व्यासपीठांवरील त्यांची उपस्थिती, भाषेवरील पकड, उत्तर देण्याची शैली आणि राजकीय आक्रमकता यामुळे त्यांनी अनेकदा लोकांना प्रभावित केले. संसदेतील त्यांच्या भाषणांची चर्चा होते. विरोधी पक्षातील नेतेसुद्धा त्यांचे भाषण गांभीर्याने ऐकतात. काँग्रेसमध्येही अनेकांचे मत आहे की, प्रियांका यांना अधिक मोठी भूमिका खूप आधी मिळायला हवी होती. मग, प्रश्न उभा राहतो, असे का झाले नाही? याचे उत्तर कदाचित राजकारणात नसून एका आईच्या दृष्टिकोनात दडलेले असू शकते.
असे म्हणतात की, मुलांना सर्वाधिक ओळखणारी व्यक्ती म्हणजे आई. त्यांच्या ताकदी, कमकुवतपणा, आवडी-निवडी आणि मर्यादा तिलाच सर्वाधिक ठाऊक असतात. संजय गांधी यांच्या अकाली निधनानंतर इंदिरा गांधींसमोर मोठा प्रश्न उभा राहिला. राजीव गांधींना राजकारणात येण्याची इच्छा नव्हती; परंतु इंदिरा गांधींनी घाई केली नाही. राजकारण लादता येत नाही, त्यात रस निर्माण करावा लागतो, हे त्यांना ठाऊक होते. त्यांनी एका कर्मचाऱ्याला राजीव गांधींसोबत काम करण्यास सांगितले. सुरुवातीला पक्षाच्या फायली त्यांच्यासमोर ठेवल्या; पण त्या फायली पडून राहत. त्यानंतर रायबरेलीतील लोकांची पत्रे राजीव गांधींसमोर ठेवली जाऊ लागली; पण त्याकडेही दुर्लक्ष झाले. मग, इंदिरा गांधींनी शेकडो पत्रांऐवजी लोकांच्या वेदना, संघर्ष आणि जिद्दीच्या कथा असलेली दोन-तीन पत्रे निवडून ठेवण्यास सांगितले. एकेदिवशी राजीव गांधींनी त्यांपैकी एक पत्र उचलले आणि पूर्ण वाचले. मग, दुसरे, नंतर तिसरे. हळूहळू त्यांची उत्सुकता वाढली. ते पत्रांना उत्तरही देऊ लागले. त्या लोकांना भेटण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. याच क्षणापासून त्यांच्या राजकीय प्रवासाची खरी सुरुवात झाली.
राहुल गांधीदेखील राजकारणात फार उत्साहाने आले नव्हते. २००४ आणि २००९ मध्ये ते खासदार म्हणून निवडून आले; मात्र दीर्घकाळ त्यांच्यावर राजकारणाबाबत गंभीर नसल्याचे आरोप होत राहिले. भाजपने तर त्यांना ‘पप्पू’ या प्रतिमेत बांधण्याचा प्रयत्न केला आणि तो बराच काळ यशस्वीही ठरला; मात्र राजकारणात वेळ हा सर्वात मोठा शिक्षक असतो. २०१४ च्या पराभवानंतर राहुल गांधी हळूहळू बदलले. त्यांनी यात्रा काढल्या. शेतकरी, युवक आणि सामाजिक संघटनांमध्ये वेळ घालवला. संसदेत अधिक सक्रिय झाले आणि विरोधी राजकारणाचा प्रमुख चेहरा बनले. आज त्यांच्याशी सहमत असो वा नसो, ते भारतीय राजकारणातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. याच ठिकाणी पुत्रमोहाचा प्रश्न पुन्हा उभा राहतो. सोनिया गांधी यांनी राहुल गांधींवर गरजेपेक्षा अधिक विश्वास ठेवला का? की इतरांना उशिरा दिसलेली क्षमता त्यांनी आधीच ओळखली होती? हा प्रश्न जितका राजकीय आहे, तितकाच मानवीही आहे.
प्रियांका गांधी यांच्या राजकीय भूमिकेबद्दल काँग्रेसमध्ये कायम उत्सुकता राहिली. त्यांच्या वाढत्या सक्रियतेमुळे हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे की, त्यांना आधीच पुढे का आणले गेले नाही? याचे उत्तर राजकारणाच्या व्यवहारात दडलेले असू शकते. प्रत्येक नेत्याची स्वतःची शैली असते. कोणी संघटना उभी करतो, कोणी जनसभांमध्ये गर्दी खेचतो, कोणी रणनीती आखतो तर कोणी संघर्षाचे प्रतीक बनतो. कुटुंबातील दोन व्यक्तींच्या भूमिका सारख्याच असतील, असे नाही. तसेच जो अधिक लोकप्रिय दिसतो तोच संघटनेसाठी सर्वात योग्य असेल, असेही नाही.
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या दोघांच्याही भूमिका विकसित होत आहेत. एक व्यापक विरोधी राजकारणाचा चेहरा बनण्याचा प्रयत्न करीत आहे, तर दुसरी जनतेत आणि कार्यकर्त्यांमध्ये स्वतःची ओळख मजबूत करत आहे. काँग्रेसमध्ये सत्तासंतुलनाची एक वेगळी रचना दिसते. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका आहेत. काँग्रेसला सत्तेत पुनरागमनाची आशा आहे. पक्षाने छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची पंजाब प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे, जे प्रियांका गांधी यांच्या गटातील मानले जाते. त्याचबरोबर अजय माकन, मीनाक्षी नटराजन आणि भजनलाल जाटव हे राहुल गांधींचे निकटवर्तीयदेखील निरीक्षक आहे. यातून एक स्पष्ट राजकीय संदेश दिसतो. प्रियांका गांधी जितक्या सक्रिय होतील, तितक्याच त्यांच्या राजकारणाची संघटनात्मक चौकटीत कसोटीही लागेल. हे केवळ भाऊ-बहिणीचे नाते नाही, तर नेतृत्व आणि जबाबदारीचेही नाते आहे. कदाचित याच कारणामुळे सोनिया गांधी यांनी अनेक वर्षे राहुल गांधींवरील विश्वास कायम ठेवला. त्यांनी राजकारणाचे मूल्यांकन केवळ लोकप्रियतेच्या कसोटीवर केले नाही, तर संयम, सातत्य आणि दीर्घकालीन तयारीच्या निकषांवर केले. इतिहास त्यांच्या निर्णयाला योग्य ठरवेल की अयोग्य, हे भविष्यात कळेल; पण एवढे निश्चित आहे की, प्रियांका यांच्या तुलनेत राहुल गांधींना सातत्याने पुढे करण्यामागे केवळ पुत्रमोह नव्हता. त्यामागे एका आईची समज, एका राजकीय कुटुंबाचा अनुभव आणि नेतृत्वाबद्दलची दीर्घकालीन दृष्टीही दडलेली असू शकते. अखेरीस असेच म्हणावे लागेल की, आईच्या नजरेतून फार थोड्या गोष्टी सुटतात. अनेकदा ती आपल्या मुलांमध्ये ते पाहते, जे जगाला खूप उशिरा समजते.