शशिकांत सावंत
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिलेल्या मराठा आरमाराचा वारसा आजही भारतीय नौदलाच्या सामर्थ्यातून जिवंत आहे. ‘आयएनएस मालवण’ युद्धनौका हा इतिहास, वर्तमान आणि आत्मनिर्भर भारताचा अभिमानास्पद संगम आहे.
छत्रपती शिवरायांच्या आरमाराचा वारसा आणि स्मृती दाखवणारी मालवण युद्धनौका भारतीय नौदलात अलीकडेच दाखल झाली. कोचिन शिपयार्ड लिमिटेडने ही पाणबुडी विरोधी युद्धनौका तयार केली आहे. त्याला 'मालवण' असे नाव देण्यामागेही इतिहासाच्या स्मृती आहेत. छत्रपती शिवरायांच्या आरमाराच्या स्मृती जपाव्यात हा उद्देश यामागे आहे. आत्मनिर्भर भारताच्या उपक्रमांतर्गत स्वदेशी संरक्षण उत्पादनांना चालना देण्याच्या उद्देशाने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सागरी सामर्थ्य वाढविण्यासाठी छत्रपती शिवरायांनी त्या काळात कल्याण, सिंधुदुर्ग आणि अलिबाग ते विजयदुर्ग असा सागरी सामर्थ्याचा सेतू तयार केला होता. कोकण किनारपट्टीवरील हे शिवरायांचे नौदल भारतीय इतिहासातील पहिले नौदल होते आणि म्हणूनच त्यावेळी मराठी राज्याला बळ मिळाले होते. त्याच्या स्मृती आजही नौदल जागवत आहे.
कोकण किनारपट्टी ही अनेकदा परकीय हल्ल्यांचे केंद्र ठरली. रायगड शेखाडी येथे पाकिस्तानातून स्फोटके आणून मुंबईत १२ मार्च १९९३ रोजी साखळी बॉम्बस्फोट घडवले गेले. यात अनेकजणांचा मृत्यू झाला. त्यानंतर २६/११ वेळी कसाबने मुंबईमार्गे प्रवेश करून दहशतवादी हल्ला घडविला. या हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीरपणे पुढे आला आणि नौदलाच्या सामर्थ्याच्या प्रश्नावर गंभीरपणे विचार सुरू झाला. यातूनच भारतीय नौदलामध्ये सामर्थ्यशाली युद्धनौका सामील झाल्या. त्यातीलच एक ही युद्धनौका आहे. समुद्रमार्गे होणाऱ्या हल्ल्यांना यामुळे वचक बसणार आहे. ७८ मीटर लांब आणि ९०० टन वजनाची ‘मालवण’ ही पाणबुडी उथळ किनारी पाण्यात कार्यरत शत्रूला नामोहरण करेल, यात शंका नाही.
युद्धनौकेच्या बहुतांश स्वदेशी बनावटीच्या सेन्सर आणि शस्त्रास्त्र प्रणालीमध्ये डीआरडीओने विकसित केलेले ‘अभय’ हल-माऊंटेड सोनार, एक लो फ्रिक्वेन्सी व्हेरिएबल डेप्थ सोनार, हलके टॉर्पेडो, पाणबुडीविरोधी रॉकेट लाँचर, सुरुंग, एक ३० मिमी मुख्य तोफ आणि १२.७ मिमी रिमोटने चालवल्या जाणाऱ्या तोफा यांचा समावेश आहे. नौदलाच्या हेलिकॉप्टर आणि विमानांच्या समन्वयाने ही जहाजे पाण्याखालील निगराणी, सुरुंग पेरणी, शोध आणि बचाव कार्ये तसेच कमी तीव्रतेच्या सागरी मोहिमांसाठीदेखील सज्ज राहू शकतात.
खरं तर, भारतीय नौदलाच्या ताफ्यात मालवण युद्धनौका दाखल झाली आणि अनेक शतकानंतर स्वत:चे आरमार सक्षमपणे उभारणारे भारतीय राजा अशी ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या मालवणमधील सिंधदुर्ग किल्ल्यावर आरमाराचा तळ बांधून दक्षिणेकडील गोव्यात प्रस्थापित सागरी शक्ती असलेल्या पोर्तुगिजांवर वचक बसविण्याची दिशा निश्चित केली. म्हणूनच हा आरमाराच्या प्रमुख युद्धनौकेला 'मालवण' हे नाव दिले गेले आहे. यानिमित्ताने कोकणातील सागरी शक्तीच्या वाटा अधिक भक्कम होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५७ मध्ये कल्याण बंदरात आरमाराची उभारणी करायला सुरुवात केली. ते भक्कम करण्यासाठी जलदुर्ग बांधले. त्यातील महत्त्वाचे दुर्ग सिंधुदुर्ग, विजयदुर्ग हे होते. मराठा आरमाराचा सिंधुदुर्ग किल्ला मुकुटमणी होता. १६६४ मध्ये महाराजांनी मालवणला भेट दिली होती आणि त्यांच्या नजरेत भरलेल्या या जागेवरील कुरट्यांच्या बेटांमध्ये जलदुर्गाची निर्मिती करण्याचे निश्चित झाले. यामुळे मराठा आरमाराला बळकटी मिळाली. म्हणूनच कोकण किनारपट्टीला विशेषत: मालवणला भारतीय आरामारात मोठे महत्त्व आहे.
मराठा आरमाराची पहिली सागरी मोहीम मालवणहून निघाली. ८ फेब्रुवारी १६६५ रोजी स्वराज्याचे आरमार कर्नाटक किनाऱ्यावरील बसनूर बंदराच्या दिशेने रवाना झाले. त्यावेळी मराठा आरमारात ८५ लहान नौका होत्या. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने त्या काळात जाणले, त्याची प्रेरणा नौदलाला आजही मिळत आहे. आयएनएस मालवणवरील शस्त्रास्त्रे ही स्वदेशी बनावटीची आहेत. अशा सक्षम युद्धनौकेचे नाते कोकणच्या किनारपट्टीशी जोडले गेले आहे. हाच आपल्यासाठी अभिमानाचा भाग आहे. कोकणचा ७२० किलोमीटरचा किनारा अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. म्हणूनच या किनारपट्टीवरील सुरक्षा अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. इतिहास आणि वर्तमानाची सांगड घालत कोकणची ओळख सांगणारी मालवण युद्धनौका नौदलात दाखल होणे हा कोकणसाठी अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा दिवस आहे.