महायुतीतच झुंजी Pudhari File Photo
संपादकीय

Mahayuti Internal Clashes | महायुतीतच झुंजी

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या एकेकाळच्या बालेकिल्ल्यावर महायुतीने आपला झेंडा लावला.

पुढारी वृत्तसेवा

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या एकेकाळच्या बालेकिल्ल्यावर महायुतीने आपला झेंडा लावला. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील नगरपालिका व नगर पंचायतीच्या निवडणुकीत महायुतीतच झुंजी लागल्याचे चित्र आहे.

चंद्रशेखर माताडे

काँग्रेस - राष्ट्रवादीच्या एकेकाळच्या बालेकिल्ल्यावर महायुतीने लोकसभा व विधानसभेला यश मिळविले. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील नगरपालिका व नगर पंचायतीच्या निवडणुकीत महायुतीतच झुंजी लागल्याचे चित्र आहे. कोल्हापुरात राजकीयद़ृष्ट्या जागरूक समजल्या जाणार्‍या कागलमध्ये राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादीकडून त्यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविलेले समरजित घाटगे 11 वर्षांचे वैर विसरून एकत्र आले आहेत. त्यामुळे अनेक नेत्यांची कोंडी झाली आहे. तर जयसिंगपूरमध्ये सतेज पाटील व धनंजय महाडिक या कट्टर राजकीय शत्रूंचे समर्थक एकत्र आले आहेत. गडहिंग्लजला विचारधारा वेगळी असलेले जनता दल व भाजप एकत्र आले असून चंदगडला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत. पन्हाळा व मलकापूर येथे बिनविरोधची अपेक्षा ठेवलेल्या जनसुराज्य शक्तीचे विनय कोरे यांना धक्का बसला आहे. तर शिरोळ, जयसिंगपूर व कुरुंदवाडमध्ये आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना घेरले आहे.

कागल, मुरगूड, जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड, पन्हाळा, मलकापूर, वडगाव, हातकणंगले, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, हुपरी येथे निवडणूक होत आहे. प्रत्येक नगरपालिका-नगर पंचायतीतील राजकीय चित्र वेगवेगळे आहे. त्या त्या स्थानिक पातळीवर राजकीय हिशेब पूर्ण करण्यासाठी पूर्ण तयारी झाली आहे. मतदारांना या आघाड्या करण्यामागील कारणे पटवून देण्याचे इंगित नेत्यांना चांगलेच माहीत असल्यामुळे त्यांना यामध्ये कोणताच धोका वाटत नाही.

सांगलीत पक्षांचा सोयीस्कर वापर करण्यात सगळेच पुढे आहेत. ईश्वरपूर, आष्टा, जत, तासगाव, विटा, पलूस या सहा नगरपालिका व शिराळा, आटपाडी या नगर पंचायतीत निवडणूक होत आहे. ईश्वरपूरमध्ये काँग्रेस, ठाकरे शिवसेना एकही उमेदवार देऊ शकलेली नाही तर महायुती व शरद पवार राष्ट्रवादीत बंडखोरीची लागण झाली आहे. विटा येथे नगराध्यक्षपदासाठी शिवसेना व भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवारीने चुरस वाढली आहे. तिहेरी लढतीत बाजी कुणाची याकडे लक्ष लागले आहे. विट्यात महायुती विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी असा सामना होत आहे.

आटपाडी - तासगावला भाजप-शिवसेना विरुद्ध चार पक्षांच्या संयुक्त तीर्थक्षेत्र आघाडीतील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तेथे नगराध्यक्षपदासाठी दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र आले आहेत. तासगावला थेट नगराध्यक्षपदाच्या निवडीतील दोन उमेदवारांनी ऐनवेळी मैदान सोडल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. आष्टा येथे महायुतीत फूट पडली आहे. शिंदे शिवसेना येथे स्वतंत्रपणे लढत असल्याने चुरस वाढली आहे. जतला काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना अशी चौरंगी लढत होत आहे. पलूसला नगराध्यपदासाठी चौरंगी लढत होत असून महायुती फिसकटली आहे.

सातार्‍यात महायुतीमध्येच लढत पाहायला मिळत आहे, तर कराडमध्ये महायुती व महाविकास आघाडीतही फूट पडली आहे. उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे भोसले यांचे मनोमिलन झाले आहे. त्यांच्यासमोर बंडखोरी मोडून काढण्याचे आव्हान आहे. भाजप व महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कराडमध्ये भाजपला रोखण्यासाठी शरद पवार राष्ट्रवादीने शिंदे शिवसेनेला पाठिंबा दिल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे; तर काँग्रेस तेथे स्वबळावर लढत आहे. मलकापूरला भाजपविरोधात राष्ट्रवादी, ठाकरे शिवसेना, काँग्रेस व समविचारी पक्षांची आघाडी अशी लढत होत आहे. म्हसवडला भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना आहे. मेढ्यात भाजप व शिंदे शिवसेनेतच मुकाबला होत आहे. पाचगणीमध्ये खरा सामना अपक्षांमध्येच आहे. फलटणला नगराध्यक्ष पदासाठी नाईक निंबाळकर घराण्यात थेट लढत लक्षवेधी ठरली आहे. महाबळेश्वर कायमच चर्चेत राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT